इस्माईल शेख
मी फोटोग्राफी, व्हीडीओ शुटींगच्या व्यवसायानिमित्त उमरग्यात वास्तव्यास होतो. तेव्हा मी २६ वर्षांचा होतो. भूकंप झाल्यानंतर स्वतःच्या ट्रकमध्ये काही स्वयंसेवकांना घेऊन सकाळी साडेसहाला भूकंपाचा केंद्रबिंदू असलेले एकोंडी (लोहारा) गाव गाठले. गावात एकही उंबरठा दिसत नव्हता, फक्त दगड मातीचे डोंगर दिसत होते.
आमची टीम पहिल्यांदा या गावात गेल्याने, ‘साहेब, वाचवा हो.. आमचे एवढे लोक अडकले आहेत,’ अशी एकच आर्त हा ऐकायला येत होती. ज्यांना काढणे शक्य आहे, अशा ३० ते ३२ लोकांना आम्ही ढिगाऱ्यांबाहेर काढले. तेथून मी स्वतः दुचाकीवरून किल्लारी गाठले, तेथील मुख्य चौकात बघ्यांची गर्दी होती, मधली बाजू मृतदेहांनी खचाखच भरली होती. हे चित्र पाहून शूटींगसाठीचा माझा हात थरथर कापत होता.
वाहनांतून मृतदेह पाठवली जात होती. सकाळी अकराच्या सुमारास सास्तूरला बचावकार्य सुरु होते. शांतेश्वर विद्यालयाच्या पटांगणातील मृतदेहांची भलीमोठी रांग पाहून मन सुन्न झाले होते.
तब्बल २४ दिवस भूकंपग्रस्त भागात फिरलो. या काळात जात-पात, धर्म, पक्ष, सरकार, मी मोठा, तो मोठा असा एकही शब्द ऐकायला मिळाला नाही. नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी स्वयंसेवक, प्रशासन आणि नागरिकांनी एकजूट दाखवली. कालांतराने पुनर्वसनाचे काम झाले, घरे मिळाली. पण गावपण हरवले, याचीही खंत वाटते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.