Manoj Jarange Patil Sakal
मराठवाडा

Maratha Reservation : 'जुनाट मंत्र्यांच्या दबावाला सरकारने बळी पडू नये' जरांगे-पाटील यांचा घणाघात

शासनाकडे मराठा कुणबी नोंदी सापडल्या. ओबीसी आरक्षणामध्ये मराठा आहे. तरीही मराठा आरक्षण न देण्याचा चंग मंत्री छगन भुजबळ यांनी बांधला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जालना - शासनाकडे मराठा कुणबी नोंदी सापडल्या. ओबीसी आरक्षणामध्ये मराठा आहे. तरीही मराठा आरक्षण न देण्याचा चंग मंत्री छगन भुजबळ यांनी बांधला आहे. मागील अनेक वर्षांपासून सरकारने त्यांच्या दबावाखाली येऊन मराठा कुणबी नोंदी दाबून ठेवल्या. आता सरकारने या जुनाट ‘कुजलेल्या’ मंत्र्यांच्या दबावाला बळी पडून पुन्हा डाव रचू नये. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय सुटी नाही.

मराठा आरक्षण ओबीसीमधून घेणार, तुम्हाला काय करायचे ते करा, असा इशारा मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांना दिला. येथे शुक्रवारी (ता.एक) झालेल्या सभेत जरांगे यांनी भुजबळ यांचा एकेरी उल्लेख करीत घणाघात केला.

सभेपूर्वी जरांगे यांचा सहभाग असलेली फेरी शहरातून काढण्यात आली. ती चार तास चालली. त्यामुळे दुपार जाहीर झालेली सभा सायंकाळी सुरू झाली. सभेत जरांगे यांनी एकेरी उल्लेख करीत भुजबळ यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘शासनाकडे मराठा कुणबी नोंदी आढळल्या आहेत. आतापर्यंत ३२ लाख मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्रे मिळाली आहेत.

भुजबळ यांच्या दबावाखाली राज्य शासनाने अनेक वर्षांपासून या नोंदी दाबून ठेवल्या. मराठा आणि ओबीसी समाज गुण्यागोविंदाने राहत असताना त्यांच्या दंगली भडकवण्याचे काम ‘वाया गेलेला मंत्री’ भुजबळ यांनी केले. तरी सरकार त्यांना सोबत घेऊन फिरत आहे. सरकारनेच त्यांना जातीयवाद करण्यास सांगितले का? घटनात्मक पदावर असताना कायदा पायदळी तुडविण्याचे काम ते करीत आहेत.

महापुरुषांच्या जाती काढून राजद्रोहासारखा प्रकार करणारा एवढ्या खालच्या दर्जाचा मंत्री राज्याने यापूर्वी कधीच पाहिला नाही. शासनाने या एकट्याच्या दबावाखाली येऊन मराठा समाजाचा घात केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाठ मराठा समाजाशी आहे’.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या शब्दाला मान देऊन आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीपर्यंत मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिले नाही, तर ते सरकारला पेलणार नाही, असेही जरांगे म्हणाले.

गुन्हे मागे घ्या, शब्द पाळा

‘आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेऊ, कोणाला अटक होणार नाही असा शब्द मंत्री उदय सामंत, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री संदीपान भुमरे, पालकमंत्री अतुल सावे यांनी सरकारच्या वतीने दिला होता. तरीही अंतरवाली सराटी येथील घटनेत आमच्या लोकांना अटक का केली? न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर पुन्हा पोलिस कोठडी कशी मिळाली?

बीडमध्ये आमच्या लोकांना पोलिसांकडून अटक केली जात आहे. त्यांना अटक करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले की पोलिस स्वतःहून अटक करीत आहेत, याचे उत्तर सरकारने तत्काळ द्यावे. पुढील दोन दिवसांमध्ये अंतरवाली सराटी येथील गुन्हे व पुढील एका महिन्यात राज्यातील गुन्हे मागे घ्यावेत. सरकारने पुन्हा नवीन डाव रचू नये.

अन्यथा तुम्ही ‘विश्वासघातकी’ यादीत जाऊन बसाल. आमच्यावर लाठीमार करणाऱ्या पोलिस अधीक्षकांची बदली करून बढती दिली. आता पुन्हा तीन महिन्यांनंतर आमचे लोक अटक करून या अधिकाऱ्यांना बढती देणार का’, असा सवाल जरांगेंनी केला.

लातूरला सभा होणारच

लातूर येथे असे काय झाले की तिथे कलम १४४ लागू केले? सरकारने समाजाचा रोष पत्करू नये. लातूर येथेही सभा होणार. मराठा समाजाने २४ डिसेंबरपर्यंत शांततेत आंदोलन करावे. उग्र आंदोलनाला माझे समर्थन नाही. २४ डिसेंबरनंतर राज्यातील सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळणार, असेही जरांगे यांनी सांगितले.

मुंडे, कुचे यांच्यावर टीका

आंदोलनादरम्यान मध्यस्थी करण्यासाठी आमदार नारायण कुचे शिष्टमंडळात होते. मात्र, हिंगोलीच्या ओबीसी मेळाव्यात, कुचे, मंत्री रावसाहेब दानवे यांना आम्ही त्रास दिला, असा उल्लेख जुनाट ‘कुजलेला ’ मंत्री करतो. आम्ही त्यांना कधी त्रास दिला? त्यांना ही दोन नावे कोणी दिले? आमदार कुचे आमच्यासोबत रोज बोलतात आणि तिकडे ओबीसी नेत्याकडे काड्या लावतात. कुचे यांच्यामुळे दोन वेळा मध्यस्थी झाली.

पण तिकडे ओबीसी नेत्याकडे वेगळेच बोलतात. बीडचे आमचे लोक धनंजय मुंडेंना गुंतविणार आहेत, असे आमदार कुचे यांनी आम्हाला सांगितले. हे जर खोटे असेल तर दोन महिन्यांपासूनच्या आमदार कुचे आणि माझे फोन रेकॉर्डिंग तपासा. आमदार कुचे यांनी आमचा गेम करू नये, नाही तर ऊस तोडायला जावे लागले, असा इशारा जरांगे यांनी दिला.

ओबीसीमधील इतर घटकांवर अन्याय का?

स्वतःला ओबीसी नेता म्हणून मिरवताना २००९ ते २०१४ पर्यंत ओबीसी महामंडळातील ८० टक्के हिस्सा ‘याने’ एकट्याने खाल्ला तर २० टक्के हिस्सा इतर ओबीसीमधील जातींना दिला. धनगर समाज केवळ सभेला गर्दी करण्यासाठी हवा, मात्र त्यांच्या आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करत नाहीत, अशी टीकाही जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर केली.

तर मुंबई अस्वच्छ होईल

जर २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर मुंबईला यावे लागेल. माझ्यासोबत किमान दोन कोटी मराठे येतील. आम्ही मुंबईत आल्यावर काहीच करणार नाही फक्त मुंबई कशी आहे, ते बघू. येताना घरच्या भाकरी आणू, पण दुसऱ्या दिवशी एवढ्या लोकांना शौचालय मिळणार नाही. त्यामुळे मुंबई अस्वच्छ करण्याची आमची इच्छा नाही, असेही जरांगे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT