परभणी : विश्वशांतीसाठी संताची भूमिका सर्वांत महत्त्वाची आहे. विज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावी, असे संतांचे विचार होते. त्यानुसार सध्याच्या विज्ञान युगातही मराठी संतांचे विचार हे मानव जातीला उपयोगी पडत आहेत. विज्ञानाला संत साहित्याची अमोल जोड दिल्यास विश्वशांतीच्या मार्गाने आपण मार्गक्रमण करू, असे मत अकराव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. तुकाराम महाराज गरुड ठाकूरबुवा (दैठणकर) यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. तुकाराम महाराज गरुड म्हणाले, मानव संसाधन विकास महत्त्वाचा आहे. संतांना विश्वशांतीची चिंता होती. त्याकाळीही महाराष्ट्रातील सर्व संतांनी विश्वकल्याण व मानव जातीच्या उद्धारासाठी प्रबोधनाचे काम केले व त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून हेच साध्य केले. संत साहित्य आज एकविसाव्या शतकातही उपयोगी पडत आहे.
विज्ञान सोडा असे संत कधीही सांगत नव्हते. विज्ञानाच्या माध्यमातून निरनिराळे संशोधन होणे गरजेचे आहे. विज्ञान, अध्यात्म व साहित्य या तीन गोष्टी मानव जीवनाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
विज्ञानाची कास धरत असताना त्याचा दुरुपयोग होऊ नये याची काळजी घेतली गेली पाहिजे, हा विचार संत साहित्यातून वाचायला मिळतो. त्यामुळे विश्वशांतीसाठी सध्या मराठी संत साहित्याची नितांत गरज आहे.
परभणी : महाराष्ट्रातील साहित्य संस्कृतीचा पाया संत साहित्याने रचला आहे. मराठी संत साहित्य हे जगमान्य म्हणून ओळखले जाते, एवढा सन्मान महाराष्ट्राला संत साहित्याने मिळून दिला आहे. संत साहित्यातून सुसंस्कारित समाजनिर्मितीचे काम झाले आहे, असे प्रतिपादन रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी केले.
वारकरी साहित्य परिषदेतर्फे येथे रविवारी अकराव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन भुमरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष तुकाराम महाराज गरुड ठाकूरबुवा (दैठणकर), आमदार भरत गोगावले, स्वागताध्यक्ष आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, डॉ. राहुल पाटील, सुरेश वरपुडकर, माजी खासदार अॅड. तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख,
भाजप जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, चैतन्य महाराज कबीरबुवा, बाळासाहेब मोहिते पाटील, ज्ञानेश्वर माऊली दाभाडे, श्रीकांत महाराज गरुड ठाकूरबुवा, जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलिस अधीक्षक रागसुधा आर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर आदी व्यासपीठावर होते. माजी संमेलनाध्यक्ष बाळासाहेब महाराज देहूकर यांनी ठाकूरबुवांकडे पदाची सूत्रे दिली.
संत साहित्यातून मोठ्या प्रमाणात समाजप्रबोधनाचे काम झाले आहे, होत आहे. त्यामुळे संत साहित्य हे कधीही न बुडणारी गाथा आहे. संत साहित्य हे महाराष्ट्राला मिळाले वरदान आहे, असे भुमरे म्हणाले. विठ्ठल पाटील यांनी प्रास्ताविकात संमेलन आयोजनामागील भूमिका विशद केली.
गंगाखेडला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे संत जनाबाई यांचे जन्मस्थळ आहे. त्यामुळे या गावाच्या विकासासाठी तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, विविध विकासासाठी राज्य शासनाने ५० कोटींचा निधी द्यावा अशी मागणी डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केली. गंगाखेड शहरातील संत जनाबाई देवस्थानाजवळच एक अद्ययावत स्मारक उभारून त्यात संत जनाबाईचे साहित्य, त्यांच्या आठवणी जतन करून ठेवाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
वारकरी विठ्ठल पुरस्काराचे वितरण
वारकरी साहित्य परिषदे पुरस्कृत वारकरी विठ्ठल पुरस्काराचे वितरण मंत्री भुमरे यांच्या हस्ते झाला. वारकरी संप्रदायासाठी राज्यात अमूल्य कार्य केल्याबद्दल (कै.) काव्यतीर्थ मनोहर महाराज गोसावी यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला. श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा- दिंडी सोहळ्याचे भाऊसाहेब महाराज गोसावी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कोरोना काळात राज्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आदिवासी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.