उस्मानाबाद : `मोबाईल रिचार्जच्या दरा`ने ग्रामीण भागातील नागरिकांची आर्थिक घडी विस्कळीत केली आहे. एकीकडे बसची व्यवस्था नाही, वीजेची जोडणी तोडली, रेंज मिळेना अन् दुसरीकडे ऑनलाईन क्लाससाठी मोबाईल रिचार्जचे दर वाढल्याने सामान्य वर्गाचे बजेट कोलमडले आहे. त्यात पुन्हा रेंज गायब होत असल्याने मोबाईलसह डोक्यात विचारांचे चक्र गरागरा फिरत असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत.
हल्ली मोबाईल ही काळाची गरज बनली आहे. त्यातही कोरोनाने अनेकांना संकटात टाकले आहे. विद्यार्थी हा झळ बसलेला घटक आहे. कोरोनामुळे अनेक शाळा ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करतात. पहिल्या लाटेनंतर शाळा कांही अशी सुरू झाल्या. मात्र दुसऱ्या लाटेत झालेली जीवीतहानी अनेकांना धकडी भरवणारी ठरली. आता दुसरी लाट ओसरली असल्याचे चित्र दिसत असताना पुन्हा एक नव्याने व्हायरस आला आहे. मात्र तो फारसा धोकादायक नसल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
तरीही काही शाळा ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देत आहेत. या संकटाशी तोंड देण्यासाठी ग्रामीण भागातील अनेकांनी अँड्रॉईड मोबाईल खरेदी केले. त्यामुळे नागरिकांना प्रतिमहिना मोबाईल रिचार्ज करावे लागते. सर्वच मोबाईल कंपन्यांनी त्यांचा २८ दिवसांचा महिना ठरविला आहे. त्याच पद्धतीने रिचार्जचे दर निश्चित केलेले आहेत. यापूर्वी साधारण २०० रुपये प्रतिमहिना रेट होते. त्यामध्ये एकदम वाढ करीत ३०० रुपये केले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा झटका बसला आहे. अचानक अशा पद्धतीने रेट वाढविल्याने सामान्य नागरिकांचे बजेट विस्कळीत झाले आहे.
ग्रामीण भागावर संकट
ग्रामीण भागातील मोबाईल कंपन्यांचे टॉवर वीजेवंर अवलंबून असतात. मात्र वीज कंपनीकडून वीजजोडणी तोडण्याच्या नावाखाली रोहित्र बंद करण्याचे प्रकार सुरू आहेत. दुसरीकडे टॉवर बंद असल्याने मोबाईलला रेंज मिळत नाही. परिणामी पैसे देऊनही अपेक्षित सुविधा मिळत नसल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. वास्तविक मोबाईल कंपन्यांनी, वीज नसेल त्या ठिकाणी जनरेटरची सुविधा देणे अपेक्षित आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असून ग्राहक या नात्याने नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. यात कहर म्हणजे सध्या महामंडळाच्या बसेसही बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नाही, अन अशा स्थितीत मोबाईलच्या विस्कळीतपणामुळे मोठे शैक्षणिक नुकसान सहन करावे लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.