marathwada mukti sangram din sakal
मराठवाडा

marathwada mukti sangram din जालन्याच्या वैभवात पडतेय भर

उमेश वाघमारे

जालना : मराठवाड्यातील दुष्काळी आणि मागासलेला जिल्हा म्हणून जालन्याची सर्वत्र ओळख आहे. शिवाय विकासाच्या ‘गंगे’चा प्रवाहही स्वातंत्र्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या सोयीनुसार होत आहे. देश स्वातंत्र्य झाल्यानंतरही निजाम राजवट भोगत येथील व्यापारीपेठेची ओळख कायम होती. त्यामुळेच आज स्टील आणि बियाणे उद्योगामुळे जिल्ह्याची जगामध्ये ओळख निर्माण झाली आहे. शिवाय आयसीटी महाविद्यालय, समृद्धी महामार्ग, रेशीम बाजारपेठ आणि होऊ घातलेला ड्रायपोर्ट, वैद्यकीय महाविद्यालय, सीड्स पार्कमुळे जिल्ह्याची वाटचाल समृद्धीच्या दिशेने सुरू झाली आहे. मात्र, हे वैभव निर्माण होत असताना येथील मूलभूत सुविधांचा प्रश्न मराठवाड्याच्या स्वातंत्र्यांच्या ७४ वर्षानंतरही कायम आहे.

ड्रायपोर्टमुळे होणार जगाची बाजारपेठ खुली

येथील स्टील देशासह परदेशात जाते. शिवाय स्टील उद्योगाला लागणारा कच्चा माल ही देशासह परदेशातून येतो. या स्टील उद्योगामुळे जालन्यात देशातील पहिल्या ड्रायपोर्ट २०१५ मध्ये मंजूर झाला. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या पाठपुराव्यानंतर ता. २५ डिसेंबर २०१५ रोजी जालना शहरातील दरेगाव शिवारात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या ड्रायपोर्टचे भूमिपूजन झाले होते. या ड्रायपोर्टसाठी २१८ हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले, जालना-औरंगाबाद मुख्य रेल्वेमार्गापासून ड्रायपोर्टपर्यंत तीन किलोमीटर रेल्वे रुळाचे काम पूर्णत्वाकडे आहे. शिवाय ड्रायपोर्ट येथून स्टील, सीड्स्‌, शेतीमाल रेल्वेत भरण्यासह खाली करण्यासाठी ७५० मीटरच्या तीन प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाले आहे.

जालना-औरंगाबाद महामार्गाशी जोडण्यासाठी महामार्ग निर्मितीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. ड्रायपोर्टसाठी संपादीत केलेल्या जमिनीचे सपाटीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे. हा ड्रायपोर्ट सुरू झाल्यानंतर जिल्ह्यासह मराठवाडा आणि विदर्भाला याचा मोठा फायदा होणार आहे. ड्रायपोर्टमुळे मराठवाड्यातील स्टील, बियाणे, शेतीमाल, भुसार मालाला राज्य आणि देशासह जगाची बाजारपेठ खुली होणार आहे.

रेशीम बाजारपेठेचा लाभ

पूर्वी रेशीम कोष विक्रीसाठी कर्नाटकातील रामनगर येथे जावे लागत होते.ही अडचण लक्षात घेत जालना कृषी बाजार समिती येथे एप्रिल २०१८ मध्ये पहिली रेशीम बाजारपेठ माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने निर्माण झाली. परिणामी मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यातून येथील बाजारात रेशीम कोषाची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरीही रेशीम शेतीकडे वळला, त्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. परजिल्ह्यातील व्यापारी ही येथील रेशीम बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे मोठी उलाढाल बाजारपेठेत होत आहे.

आयसीटी महाविद्यालय महत्त्वपूर्ण

मुंबईनंतर राज्यात जालना येथे २०१६ मध्ये युती शासनाच्या काळात इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी कॉलेज मंजुरी देत ३९७ कोटीचा निधी मंजूर केला होता. २०१७ मध्ये जिल्हा प्रशासनाने २०३ एकर जमीन या महाविद्यालयासाठी दिली. वर्ष २०१८ मध्ये हे महाविद्यालय किरायाच्या जागेत सुरू झाले आहे. या महाविद्यालयाची इमारतीसह सर्व सुविधांची निर्मिती होणे बाकी आहे. मात्र, या महाविद्यालयामुळे देशासह परदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी आता जालन्यात येत आहे.

समृद्धी महामार्गाचा होणार फायदा

जिल्ह्यातून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग गेला आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि नागपूर या दोन्ही महानगरांच्या मध्यभागी जालना शहर येत असल्याने येथील व्यापारी, उद्योजकांना या समृद्धी महामार्गाचा अधिक फायदा होणार आहे. जिल्ह्यातून सहा किलोमीटर लांबीचा आठ पदरी इंटरचेंज उभारण्यात आले आहेत. यामुळे विदर्भातून येणारी वाहतूक आणि नांदेड दिशेने येणारी वाहतूक याच ठिकाणाहून महामार्गावर येईल. शिवाय या समृद्धी महामार्गामुळे येथील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे.

सीड्स पार्कमुळे बियाणे उद्योगाला चालना

देशाचे अर्थकारण हे शेतीवर अवलंबून आहे. दर्जेदार आणि नवीन वाणांची निर्मिती करण्यात जालना येथील बियाणे उद्योग राज्यात आघाडीवर आहे. या बियाणे पंढरीत सीड्स्‌ पार्कची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी जालना तालुक्यातील पानशेंद्रा परिसरात ७५ एकर क्षेत्र ही संपादीत करण्यात आले आहे. शहरात एकूण ४४ पेक्षा अधिक सीड्स उत्पादक कंपन्या आहेत. त्यामुळे कपाशी, हरभरा, गहू, ज्वारी, हाबरेट ज्वारी, सोयाबीन, मका, तूर, उडीद, बाजरी, मूग, सूर्यफूल, करडी यासह भाजीपाल्यापासून ते सर्व फळपिकांचे बियाणे निर्मिती केली जाते. या नियोजित सीड्स्‌ पार्क येथे महाबीजकडून एक मोठा बियाणे प्रकल्प, भाजीपाल्याच्या दोन प्रकल्पाच्या उभारणीचे नियोजन आहे. शिवाय येथेच सीड कंपन्यांना प्लॉट देण्यात येणार आहेत. त्यामुळे बियाणे उद्योगात राज्यात जालन्याचा डंका वाजणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती ही होणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार

जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्याल व्हावे, यासाठी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून नुकत्याच पावसाळी अधिवेशनात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा झाली आहे. हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची सोय होणार

आहे.

रेल्वे धावणार सुसाट

जिल्ह्यात रावसाहेब दानवे यांच्या रूपाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री पद मिळाल्यानंतर जालना येथे रेल्वेची पीटलाईन मंजूर झाली आहे. शिवाय वंदे भारत रेल्वे जिल्ह्यातून धावणार असल्याने रेल्वे लाईनच्या विद्युतीकरणाचे काम ही प्रगतिपथावर आहे. तसेच जालना-खामगाव आणि जालना-जळगाव हे नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे. जालन्यातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग व याच महामार्गालगत होणारी बुलेट ट्रेनचा रेल्वेमार्गही जालन्याच्या विकासात भर टाकणारा राहणार आहे. शिवाय नांदेड-पुणे ही रेल्वेही जालन्यांवर रोज सुरू झाली आहे.

मूलभूत सुविधांबाबत द्यावे लक्ष

जिल्ह्याच्या विकासामध्ये भर पडत आहे. मात्र, मुलभूत सुविधांकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे. शहरातील पाणी प्रश्‍न हा संपूर्ण राज्यात गाजला आहे. मात्र, तरी देखील आजही दहा ते बारा दिवसांआड पाणी पुरवठा होतो. शहराअंतर्गत रस्ते, स्वच्छता, घंटागाड्यांची कमी असलेली संख्या, शहरातील रस्त्यांवर असलेले अतिक्रमण, मोकाट कुत्रे-जनावरे, पार्किंगचा प्रश्‍न, वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा आदी प्रश्‍नांनी येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. शिवाय ग्रामीण भागात रस्त्यांची जाळे निर्माण करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात खर्चाच्या तुलनेत विकास झालेला दिसत नाही. लातूरसोबत तुलना केल्यास जालना हा मागेच असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात स्टील उद्योग ही एकमेव जमेची बाजू आहे. मात्र त्यात स्थानिकांना खूप कमी प्रमाणात रोजगार मिळतो. शहर म्हटले की रस्ते, नाल्या, पाणी या बाबींची प्राथमिकता हवी. शिवाय शैक्षणिक सुविधांवरही विकासाचा स्तर अवलंबून असतो. मात्र, शैक्षणिक क्षेत्रात जिल्हा मागेच आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचीही खूप उशिरा घोषणा झाली, जिल्ह्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नाही. शहरातील रस्ते, नाल्यांची गुणवत्ता असणे अपेक्षित आहे. मात्र, आता कामातील गुणवत्ता गायब झाली आहे. याला येथील जनताच जबाबदार आहे. त्यामुळे पुढील काळात जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रासह शहराच्या मुलभूत सुविधांवर काम करणे गरजेचे आहे.

-प्रा. बी. वाय. कुलकर्णी,

शिक्षणतज्ज्ञ, जालना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT