marathwada sakal
मराठवाडा

Marathwada Muktidin : निजामाच्या अधिकाऱ्यांनी बोटे कापली, सिगारेटचे चटकेही दिले...

मराठवाडा मुिक्तसंग्राम दिन... ९२ वर्षीय मकरंद यांनी जागवल्या आठवणी

सकाळ वृत्तसेवा

परभणी - आज लक्ष्मणराव मकरंद हे वयाच्या ९२ व्या वर्षांत असतानाही मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या आठवणी ताज्या करून सांगतात. संग्रामात उडी घेतल्यानंतर अनेक बाका प्रसंगांना तोंड द्यावे लागले. निजामाच्या क्रूर अधिकाऱ्यांनी आम्हाला सिगारेटचे चटके दिले. काहीजणांची बोटे कापली तरी आम्हा सर्वजणांच्या हृदयातील स्वातंत्र्याची ओढ काही कमी झाली नाही असे सांगत त्यांनी मुक्तिसंग्रामाचा एक-एक प्रसंग जिवंत उभा केला.

लक्ष्मणराव बळीराम मकरंद परभणीकर हे मूळ गौतमनगर येथील रहिवासी आहेत. आज वयाच्या ९२ व्या वर्षांत असतानाही मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा विषय निघाला की त्या भारावलेल्या ध्येयवेड्या दिवसांबद्दल भरभरून बोलतात. १९४४ ला लक्ष्मणराव पाचव्या वर्गात शिकत असताना त्यांचे वडील बळीराम मकरंद हे शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे कार्यकर्ते होते. त्यामुळे हैदराबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण ऐकण्यासाठी लक्ष्मणराव यांना सोबत घेऊन गेले होते.

बाबासाहेबांचे ते राष्ट्रप्रेमाने ओथंबलेले भाषण ऐकून विद्यार्थिदशेतील लक्ष्मणराव खूपच प्रभावित झाले. आज ना उद्या इंग्रजांना भारत सोडावा लागणार आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात आपण सर्वार्थाने योगदान दिले पाहिजे, हे बाबासाहेबांचे शब्द लक्ष्मणरावांच्या काळजात कोरल्या गेले. परभणी येथे स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय योगदान देणारे नेतृत्व मुकुंदराव पेडगावकर यांचा मुलगा आणि मुलगी लक्ष्मणराव यांच्या वर्गात शिकत असल्यामुळे आपसूकच या चळवळीत सहभागी झाले.

शाळेतील शिक्षकांनीही त्यांना प्रोत्साहित केले. हे सर्व युवक नूतन विद्यामंदिराच्या बाजूला रंगनाथराव लाखकर यांच्या हनुमान व्यायामशाळेत असून, आंदोलनाची दिशा ठरवू लागले. तत्कालीन नेते फुटाणे, कहाळेकर बंधू, आनंदराव कौसडीकर, वसंतराव कौसडीकर यांचे मार्गदर्शन मिळू लागले. हे स्वातंत्र्यप्रेमी युवक हातात झेंडे घेऊन प्रभातफेरी, मिरवणूक काढून लोकजागृती करायचे. त्यावेळी परभणीतील नारायणराव यांनी निजामावर हल्ला केला होता. हल्ल्यात निजाम बचावला. निजाम बचावल्यामुळे अभिनंदनपर जलसे शहरात सुरू झाले. लक्ष्मणराव मकरंद यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत जलशावर बहिष्कार टाकण्याचे धोरण स्वीकारले.

लक्ष्मणराव हे हुशार विद्यार्थी असल्यामुळे त्यांना निजाम सरकारने वजिके तरबिगी ही शिष्यवृत्ती दिली होती. पण, लक्ष्मणराव यांनी देशप्रेमाच्या भावनेतून जी शिष्यवृत्ती नाकारली त्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्याच्या प्रयत्न झाला. शिक्षकांच्या मध्यस्थीमुळे त्यांना परीक्षा देता आली. परीक्षा झाल्यावर लक्ष्मणराव मकरंद यांनी घर सोडून दिले. करोडगिरी पोलिस चौक्यांवर हल्ले करून सिंधीचे वन तोडायला लोकांना सांगून निजाम सरकारचे आर्थिक नुकसान करायचे काम सुरू केले.

भूमिगत राहून काम करताना शेतकऱ्यांनी सारा देऊ नये, याचा खेडोपाडी प्रचार केला. याच काळात शाळीग्राम कुलकर्णी, वि. भा. पाठक यांनी त्यांना आंदोलनाची पत्रके पोचविण्याचे जोखमीचे काम सोपविले. गुजरी बाजार येथे पत्रक वाटताना ते पकडल्या गेले. अत्यंत क्रूर पोलिस अधिकारी तय्यबजी अमीन यांनी त्यांच्या हातापायाला चटके देऊन सहकाऱ्यांची नावे विचारली. पण, लक्ष्मणराव मकरंद यांनी या क्रूरपणाला भीक घातली नाही.

त्यांच्या तावडीतून सुटून ते पानकन्हेरगाव नाका येथे पोचले. १३ सप्टेंबर १९४८ ला विदर्भातून भारतीय सैन्य मराठवाड्यात आले. मेजर जनरल जयंत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सैन्याला जनतेने सहकार्य करावे यासाठी प्रचार करीत लक्ष्मणराव मकरंद हे सैन्यासोबत परभणीत आले. वस्सा, टाकळी येथे रझाकाराविरुद्ध मोठी चकमक झाली. स्वातंत्र्य सैनिक प्रभाकरराव वाईकर हे शूर तलवारबाज आपल्या सहकाऱ्यांसमवेत शूरपणाने रझाकारांचा मुकाबला करीत होते.

१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्त झाल्यावरच लक्ष्मणराव आपल्या घरी आले. लक्ष्मणराव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, श्रीनिवासराव बोरीकर, मुकुंदराव पेडगावकर, विनायकराव चारठाणकर यांचे मार्गदर्शन यामुळे केलेल्या कार्याचा गौरव करीत २६ जानेवारी १९८८ ला मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी त्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून सन्मानित केले.

विशेष सवलती नसल्याची खंत

देशप्रेमाचा अखंड ऊर्जास्रोत असलेले मकरंद हे ९२ वर्षांचे असतानाही मनाने मात्र चिरतरुण आहेत. स्वातंत्र्यसैनिकांसाठी असलेल्या विशेष सवलती त्यांना अजूनही मिळाल्या नाहीत. ही त्यांची खंत असली तरीही लढ्यातील दिवस हे खऱ्या अर्थाने जगणे होते, यावर मात्र ते ठाम आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT