बीड : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा आज वर्धापन दिन साजरा होत आहे. सव्वादोनशे वर्षे निजामाची सत्ता असलेल्या अंबाजोगाईच्या मातीतून मुक्तिसंग्राम लढ्याची ज्योत पेटली आणि दहा वर्षे तेवत राहीली ते अंबाजोगाई शहरच उपेक्षीत आहे. मराठी भाषेचे विद्यापीठ, जिल्हा निर्मिती आणि पर्यटन विकास केंद्राच्या मागणीचे प्रस्ताव शासन दरबारी धूळखात पडून आहेत. जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर झाले बहु आणि हवे बहु अशीच स्थिती आहे. परळीचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, माजलगाव धरण या स्वातंत्र्यानंतरच्या जिल्ह्यासाठीच्या मोठ्या उपलब्धी असल्या तरी विकासाच्या दृष्टीने दळवणवळाची साधने आणि उद्योगांची जिल्ह्याला गरज आहे.
मराठवाडा मुक्ती संग्रामाची सुरुवात १९३५ साली अंबाजोगाईतूनच झाली. पुढे १९३८ मध्ये स्वामी रामानंद तीर्थांनी याचे नेतृत्व केले. १७ सप्टेंबर १९४८ अशी सलग दहा वर्षे ही चळवळ चालली. ऐतिहासिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिक वारसा लाभलेल्या याच शहरात मुकूंदराजांनी मराठी कवितेची पहिली ओवी आणि दासोपंतांनी पासोडीतून जीवनाचे सार मांडले. मात्र, या शहरात मराठी विद्यापीठाची मागणी अद्याप अपूर्णच आहे.
शहराला निसर्गदत्त सौंदर्याची देणं असली तरी पर्यटन विकासाचा आराखडाही धूळखात पडला आहे. अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणीही अनेक वर्षांपासून आहे. स्वातंत्र्यानंतर जिल्ह्याला मिळालेही बहुत असेच मनावे लागेल. परळीतील औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प, माजलगाव धरणासह मागच्या काही वर्षांत जिल्ह्यात राष्ट्रीय व राज्यमार्गांचे जाळे विणले गेले आहे. दहावी-बारावीच्या निकालांसह वैद्यकीय प्रवेश, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांत जिल्ह्याचा टक्का वाढत आहे. नगर - बीड - परळी लोहमार्गाची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वाकडे येत आहे.
मात्र त्याला गती मिळण्याची गरज आहे. जिल्ह्यात एकमेव बीड या जिल्ह्याच्या ठिकाणी औद्योगिक वसाहत आहे. मात्र, या ठिकाणी उद्योग कमी आहेत. जिल्ह्यात उत्पादनाची साधने, सिंचनाची उपलब्धता मोजकी असल्याने ऊसतोडणीशिवाय पर्याय नाही. आजही जिल्ह्यातील चार ते पाच लाखांवर मजूर ऊसतोडणीसाठी परजिल्ह्यात आणि परराज्यात जातात. उद्योग विकासाला चालना देण्यासाठी आणि त्यासाठीच्या भौतिक सुविधा व दळणवळणाची साधने निर्माण करण्यात आतापर्यंत म्हणावे तेवढे यश आलेले नाही. परळीचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र जरी जिल्ह्यासाठी भूषण असले तरी या निमित्ताने राखेची अवैध वाहतूक, भंगाराची चोरी आणि केंद्रातील ठेकेदारीवरून गुन्हे घडत आहे.
जिल्ह्यातील डोंगररांगांतील नैसर्गिक उत्पादित सीताफळाची वेगळी चव आहे. यासाठी सीताफळ संशोधन केंद्र आणि सीताफळ प्रक्रीया उद्योग जिल्ह्यात निर्माण होण्याची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होऊ शकतो. नगदी पीक म्हणून काही वर्षांपासून सोयाबीन, कापूस लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मात्र, बाजारातील भावाची चढ-उतार यामुळे शेतकऱ्यांच्या हाती फार काही पडत नाही. जिल्ह्यातच हा सोयाबीन व सीताफळ प्रक्रिया उद्योग उभारला तर शेतकऱ्यांसाठी हिताचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.