उदगीर : ‘समाजात चांगले आहे, तसे वाईटही आहे. त्यामुळे संस्कृती, इतिहास, साहित्य याचा विचार करून राष्ट्रानुकूल, युगानुकूल आणि समाजावर गुणात्मक परिणाम करणारे, विकासाची दिशा देणारे, प्रगतीकडे नेणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे,’ अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. आपण नेत्रदान करू शकतो, मात्र त्यामागील विचार आणि दृष्टिकोन बदलू शकत नाही, असे मतही त्यांनी मांडले.
येथे सुरू असलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, सांस्कृतिक कार्य तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख, संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, आमदार संभाजीराव पाटील-निलंगेकर, अभिमन्यू पवार, रमेश कराड तसेच गो. बं. देगलूरकर, साहित्य मंडळाच्या नियोजित अध्यक्षा उषा तांबे, विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो, दादा गोरे यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
कोणते साहित्य निर्माण करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे स्पष्ट करत गडकरी म्हणाले, ‘आपल्या डोक्यामागे विचार असतो, तो साहित्यातून निर्माण होतो. विचारांचे संस्कार साहित्यातून येतात. आपण नेत्रदान करू शकतो; परंतु दृष्टिकोन आणि त्यामागचा विचार बदलता येऊ शकत नाही. आपल्याला साहित्य, संस्कृती, इतिहासाची मोठी परंपरा आहे. आपण लोकशाही स्वीकारली आहे. लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व जाणून आहोत. साहित्य हे लोकरंजन, मनोरंजन नाही. संस्कृती, नाट्य, साहित्यातून संस्कार प्राप्त होतात आणि त्यातून जीवन बदलते.’
ज्ञानाचे रूपांतर अर्थकारणात व्हावे
नितीन गडकरी म्हणाले,‘एकविसाव्या शतकात भारत विश्वसमुदायात प्रथम क्रमांकावर पोचेल असे स्वामी विवेकानंद यांनी सांगितले आहे. शिक्षणातून ज्ञानप्राप्ती होते. ज्ञानाचे रूपांतर अर्थकारणात केले पाहिजे. जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणावर मोठ्या हुद्द्यावर आहेत. अभ्यासातून ते स्थान प्राप्त केले आहे. भारतीय साहित्य, संस्कृतीत भावार्थ, ऊर्जा आहे. भारतीय परिवार जीवनपद्धती खूप समृद्ध आहे. ती मूल्याधिष्ठित, संस्कृती जपणारी आहे. ही संस्कृती आपल्या इतिहास, साहित्यातून आली आहे. मराठी नाटक, साहित्यातून भारतीय समाजमन समृद्ध झाले आहे.
राजकारणात साहित्यिकांना महत्त्व
प्रत्येक क्षेत्रात ऱ्हास झाला आहे असे म्हणण्यापेक्षा, त्यावर चर्चा करण्यापेक्षा मात कशी करता येईल याचा विचार झाला पाहिजे, असे सांगून गडकरी म्हणाले, ‘समाजात गुणात्मक, विकासात्मक परिणाम करणारे साहित्य निर्माण व्हावे. समाजाच्या उपयोगतेचा विचार त्यात झाला पाहिजे. साहित्याच्या व्यासपीठावर राजकारण नको; परंतु राजकारणात साहित्यिकांना महत्त्व आहे. ज्येष्ठ साहित्यिक पु.ल. देशपांडे, दुर्गा भागवत यांनी लोकशाही वाचविण्याचा प्रयत्न केला. राजकीय क्षेत्रात काम करणारी व्यक्ती साहित्य, संस्कृती जपणारा असावा.
समाजात असलेले दोष नष्ट करण्याची, मन बदलण्यासाठी साहित्य महत्त्वाची भूमिका बजावते. विचार देणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे. साहित्य हे मनोरंजनासाठी नाही तर विचारांची मेजवानी देणारे आहे. राष्ट्रानुकूल आणि युगानुकूल साहित्य निर्माण करून साहित्यिकांनी भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करावा. चिंतनातूनच जीवनाचा मार्ग शोधण्यासाठी साहित्यिकांनी प्रबोधन करावे.’
प्रमुख कार्यवाह रामचंद्र तिरुके यांनी प्रस्ताविक केले. सीमाप्रश्न महत्त्वाचा असून ८६२ गावांचा प्रश्न सोडावा, उदगीर जिल्हा व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांचेही भाषण झाले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. उदयगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य राजकुमार मस्के यांनी आभार मानले.
उदगीरच्या मागणीसाठी मदत
नीलम गोरे म्हणाल्या, प्रबोधनाच्या परंपरेमध्ये उदगीरला एक वेगळे स्थान आहे. पानिपतची लढाई करण्यासाठी उदगीर येथून सुरवात झाली होती, हे लक्षात घेता मराठी साहित्याला फक्त महाराष्ट्राचा विचार करायचा नाही तर पानिपतच्या इतिहासाचा विचार करुन राज्य, देशाचा विचार करुन पुढे जायचे आहे. उदगीरला जिल्ह्याच्या दर्जा देण्याची मागणी लक्षात घेऊन मी स्वतः उदगीरची वकील म्हणून मदत करीन. ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाईन. उदगीर शहरात महिलांसाठी रुग्णालय व्हावे ही मागणी आली आहे, परंतू आहे त्या रुग्णालय सर्व सुविधा देण्यास प्राधान्य असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.