आष्टी (जि.बीड) : प्रशासकीय यंत्रणेची अनास्था व बेजबाबदारपणामुळे आष्टीच्या (Ashti) कोविड केअर हॉस्पिटलमधील (Covid Care Hospital) ४०-४५ रुग्णांना बुधवारी (ता.१८) रात्री उपाशीपोटी राहावे लागले. या प्रकाराबाबत रुग्ण व नातेवाईकांनी संताप व्यक्त करून या ठिकाणी देण्यात येत असलेल्या भोजनातील कमतरतेचाही पाढा वाचला. आष्टी तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या (Corona) वाढ सुरूच असून, रुग्णालयात दाखल होणाऱ्या सक्रिय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या (Beed) आष्टीतील शासकीय कोविड केअर हॉस्पिटलमधील नवीन इमारतीमध्ये ७४ रुग्ण, तर जुन्या इमारतीत ५२ असे एकूण १२६ रुग्ण (Corona Patients) दाखल आहेत. दरम्यान, बुधवारी रात्री भोजन कंत्राटदारास शंभर डबे देण्याचे कळविण्यात आले. त्यानुसार कंत्राटदारातर्फे १०० भोजनाचे डबे नवीन इमारतीत आणून ठेवण्यात आले. तेथे कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांनी आलेले डबे फक्त नवीन इमारतीत उपचारांसाठी दाखल केलेल्या रुग्णांना, वॉर्डबॉय व रुग्णांसमवेत आलेल्या नातेवाईकांना वितरीत केले.
या वाटपानंतर जुन्या इमारतीतील रुग्णांसाठी जेवणाचे केवळ तीन डबे उरले. त्यामुळे तेथील ४० ते ४५ रुग्णांना रात्रीचे जेवण न मिळून उपाशीपोटी राहावे लागले. रात्री आठ वाजता देण्यात येणाऱ्या जेवणाची रुग्णांनी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत वाट पाहिली. यानंतर वरिष्ठांना कळविण्यात आले. तोपर्यंत साडेदहा वाजले होते. एवढ्या उशिरा जेवण उपलब्ध करून देता येणार नाही, असे कंत्राटदाराने कळविले. तोपर्यंत शहरातील सर्व हॉटेल्सही बंद झाली होती. त्यामुळे ४०-४५ रुग्णांना उपाशीपोटी राहावे लागले. काही रुग्णांच्या नातेवाईकांनी औषधी दुकानातून बिस्किटपुडे आणून पोटाला आधार दिला. दरम्यान, या प्रकाराबाबत आज गुरुवारी (ता.१९) रुग्णालयास भेट देऊन माहिती घेतली असता रुग्ण व नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. दोन्ही ठिकाणी मिळून १२६ रुग्ण असताना १०० डबे कोणी व कशामुळे कमी मागविले याची चौकशी करावी, अशी मागणी केली. तसेच येथे देण्यात येणाऱ्या भोजनाबाबतही अनेक तक्रारी करून व्यवस्थेत सुधारणा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
पौष्टिक आहार कागदावरच
कोरोनाग्रस्तांना येणारा अशक्तपणा भरून निघावा व रोग प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी पौष्टिक आहारावर भर देण्यात येतो. त्यासाठी शासन मोठा खर्चही करते. परंतु आष्टीत कोरोना रुग्णांचा पौष्टिक आहार कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. सकाळी साडेआठ-नऊच्या सुमारास पोहे किंवा उपमा, दुपारी बारा ते एकच्या दरम्यान तीन पोळ्या, भाजी व वरण-भात तसेच रात्री आठ ते नऊच्या दरम्यान तीन पोळ्या, भाजी व वरण-भात असा आहार देऊन रुग्णांची बोळवण करण्यात येत आहे.
यातील अर्धेही मिळत नाही...
बीड येथील आरोग्य विभागाने कोविड रुग्णांसाठी पौष्टीक आहाराचे दैनंदिन वेळापत्रक ठरविले आहे. यामध्ये सकाळी सात वाजता एक ग्लास पाण्यामध्ये मध अथवा कोरफड रस, सकाळी साडेआठ ते नऊ या वेळेत ग्रीन-टी, मुगदाळ, अंडी, फळे, इडली-सांबर, मटकी, राजमा, हरभरा भाजी. दुपारी एक वाजताच्या जेवणात पनीर भाजी, सोयाबीन भाजी, फुलका, वरणभात, सलाड. सायंकाळी चार वाजता आयुष काढा, अद्रक चहा, रात्री आठ वाजताच्या जेवणात खिचडी, कढी, सलाड, चिक्की, व्हेज पुलाव, जवस चटणी, शेंगादाणा लाडू, सोयाबीन भाजी, पनीर भाजी व यानंतर रात्री नऊ वाजता एक कप हळद दूध यांचा समावेश आहे. परंतु आष्टीतील रुग्णांना यातील अर्धाही आहार मिळत नसल्याचे रुग्णांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
रुग्णालयात दाखल कोरोनाग्रस्तांपैकी काही रुग्णांना काल रात्री जेवण मिळाले नसल्याची बाब रात्री उशिरा समजली. यामुळे संबंधित कंत्राटदाराला तातडीने कळविण्यात आले. यापुढे सर्व रुग्णांना आहाराचे वाटप करण्याचे नियोजन करत आहोत.
- डॉ.राहुल टेकाडे, वैद्यकीय अधीक्षक, आष्टी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.