उजनी (लातूर): रोजच्या जीवनातील जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मागील काही महिन्यांपासून सतत वाढ होत आहे. त्यामध्ये खाद्य तेल, शेंगदाणा आदींचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे एकीकडे कोरोना संकट आणि दुसरीकडे महागाईचे संकट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, या दोन्ही संकटाचा सामना करताना सर्वसामान्यांचे मात्र हाल होताना दिसत आहेत.
कोरोना संकटाचे परिणाम दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहेत. यामुळे अनेकांना शहरातील रोजगार गमवावा लागला आहे. मुंबई, पुण्यासह इतर शहरातून अनेक कुटुंब गावाकडे परतले आहेत. ग्रामीण भागातील छोट्या-मोठ्या व्यवसायांनादेखील याचा फटका बसला आहे. एकंदरीत बाजारपेठेत आर्थिक चणचण भासत असताना त्यात जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने त्यात आणखीन भर पडली आहे.
दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक असलेल्या खाद्य तेलासह अनेक किराणा मालाचे दर वाढले आहेत. परिणामी, गृहिणींचे स्वयंपाक घरातील आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यांच्यावर घरात काटकसर करण्याची वेळ आली आहे. त्यांच्या स्वयंपाक घरातील भाजीला महागाईची फोडणी द्यावी लागत आहे. दरम्यान, १ डिसेंबरपासून स्वयंपाक घरातील आवश्यक गॅस सिलिंडरच्या ही भावात शंभर ते सव्वाशे रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना आपली चूलच बरी म्हणण्याची वेळ आली आहे. परिणामी, सर्वसामान्य कुटुंबातील महिला चहा बनविण्यापुरताच गॅसचा वापर करीत असल्याचे चित्र आहे.
खाद्यतेलाचे भाव आवाक्याबाहेर-
दसरा व दिवाळीमध्ये खाद्य तेलाचा वापर अधिक होत असल्याने त्यावेळी काही प्रमाणात भाव वाढणे साहजिक आहे. पण, त्यानंतरही दर वाढ कायम राहिल्याने चिंतेचे वातावरण आहे. दसरा दिवाळीपूर्वी सोयाबीनचे एक लीटर तेल ९५ रुपयांना मिळत होते. ते दिवाळीत ९८ रुपयाला झाले. दिवाळी झाल्यावर भाव कमी होतील अशी अशा व्यापाऱ्यासह ग्राहकांना होती. पण, तसे न होता त्यात दिवसेंदिवस वाढ होत गेली. सध्या तेच तेल १४० ते १५० रुपयांना मिळत आहे. सोयाबीन तेलाच्या पंधरा किलोच्या डब्यासाठी ग्राहकांना १२०० ऐवजी २३०० रुपये मोजावे लागत आहेत. म्हणजे मागील सहा महिन्यांत अकराशे रुपये यांची वाढ झाली आहे. पामतेल एक लीटर दिवाळी आधी ८५ रुपये दिवाळीत ९० ते ९५ रुपये तर सध्या १३० ते १३५ रुपये, शेंगदाणा ८० रुपये प्रति किलो दराने मिळत होता. सध्या १३० ते १३५ रुपयांना मिळत आहे.
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा प्रश्न कायम-
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा प्रश्नही अद्याप कायम आहे. पेट्रोलचे दर प्रति लीटर ९८ तर डिझेलचे प्रतिलीटर ९० रुपयांपर्यंत पोचले आहेत. त्यामुळे वाहतूक खर्चामध्ये वाढ झाली आहे. ट्रॅक्टरवर होणाऱ्या शेती कामासाठी यामुळे जास्तीचे दर आकारले जात आहेत. कमी अधिक प्रमाणात महागाईच्या झळा ह्या सर्वांनाच बसत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.