नांदेड - एक दोन दिवस नव्हे तर तब्बल आठ दिवसांपासून जुन्या नांदेडमध्ये अनेक भागात पाण्याचा ठणठणाट झाला आहे. बाहेर गेले तर कोरोना आणि घरात पाणी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.
विशेष म्हणजे महापालिका अजूनही सुस्तच असून दुरुस्तीच्या नावाखाली सगळा भोंगळ कारभार झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंतीच्या दिवशीही पाणी मिळाले नसल्याने नागरिकांनी महापालिकेच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा - ‘सोशल डिस्टन्सिंग’चा नांदेडला फज्जा
पाणीपुरवठा विस्कळीत
नांदेड महापालिकेच्या वतीने सध्या दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विष्णुपुरी प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असूनही नियोजन नसल्यामुळे अनेक ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. विशेष करुन जुन्या नांदेड भागात मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जुन्या नांदेडमधील ब्रह्मपुरी, भोई गल्ली, भावेश्वर नगर, महंतवाडी, चौफाळा, सिद्धनाथपुरी, विणकर कॉलनी, गाडीपुरा, शनीदेव गल्ली, सराफा, होळी, नावघाट. जुना मोंढा, बर्की चौक आदी भागात पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. तसेच सांगवीतील माधननगर भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
बाहेर कोरोना, घरात पाणीटंचाई
बाहेर कोरोना येऊ देईना आणि घरात पाणीटंचाई अशा परिस्थितीत नागरिकांनी आठ दिवस काढले. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आज उद्या करत आठवडा काढल्याने आता नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. विशेष करुन महिला वर्गाला याचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे. ज्यांच्याकडे स्वतःची विंधन विहिर (बोअर) आहे त्यांना अडचण नाही पण ज्यांच्याकडे महापालिकेचा नळ आहे त्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
नगरसेवकांकडून टॅंकरची पळवापळवी
महापालिकेच्या वतीने टॅकरचा पाणीपुरवठा सुरु करण्यात आला असला तरी नगरसेवकांमध्ये चढाओढ लागली आहे. त्यामुळे काही नगरसेवक राजकीय वजन वापरुन आपआपल्या भागात टॅकर पळवून नेत असल्यामुळे काही भागात पाणी तर काही भागात निर्जळी होत आहे. याबाबतही नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.
हे ही वाचलेच पाहिजे - नांदेडकरांचे सहाय्यता निधीत ४१ लाखांचे योगदान
मोटार जळाल्याने अडचणी वाढल्या
जुन्या नांदेड भागात किल्ला आणि चौफाळा येथील जलकुंभावरुन पाणीपुरवठा होतो. विष्णुपुरीच्या काळेश्वर येथील पंपावरुन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने असदवन जलशुद्धीकरण येथे पाणी आणले जाते. तिथे शुद्धीकरण करुन किल्ला व चौफाळा जलकुंभावर जाते आणि पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, काळेश्वर येथील विद्युत मोटार जळाली आहे आणि संबंधित कंत्राटदाराचे निधन झाल्यामुळे दुसऱ्या कंत्राटदाराकडून काम करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली. तात्पुरती व्यवस्था म्हणून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.