उमरगा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील बोरी येथील शेतकऱ्याने कोरोनाच्या भितीने गळफास घेतल्याची घटना मंगळवारी (ता.सहा) सकाळी उघडकीस आली. दरम्यान कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधित शेतकरी हा होम आयसोलेशनची मागणी करून स्वतःच्या शेतात रहात होता. या बाबतची माहिती अशी की, बोरी येथील एका ४८ वर्षीय शेतकरी सर्दी, खोकल्याच्या त्रासाने कणकण वाटत असल्याने तीन एप्रिलला उमरग्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आला होता. तत्पूर्वी त्याची रॅपिड तपासणी करण्यात आली. त्यात तो पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान त्याने होम आयसोलेशनची मागणी केल्याने प्रशासनाच्या चौकशीनंतर शेतकऱ्याला सोमवारी (ता.पाच) रुग्णालयातुन पाठविण्यात आले. तो थेट शेतातील स्वतंत्र शेडमध्ये गेला होता. त्या शेतकऱ्याचा भाऊ व मुलांनी सुरक्षितरित्या लांबूनच खाण्या-पिण्याची व्यवस्था सुरू केली होती. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास त्या शेतकऱ्याने मी पॉझिटिव्ह असल्याने तुम्ही येथे थांबू नका, मी आराम करतो, असे सांगून नातेवाईकाला घराकडे पाठविले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास शेडच्या बाजूला असलेल्या झाडाच्या खाली स्टुल ठेवून फाट्याला गळफास घेतला. मंगळवारी सकाळी हा प्रकार नातेवाईकांना दिसून आला. पोलिस पाटील बालक मदने यांनी याची माहिती तहसीलदार व पोलिस ठाणे येथे दिली.
शेतातच झाले अंत्यसंस्कार
पॉझिटिव्ह व्यक्तीने गळफास घेतल्याने नाईचाकूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सुप्रिया टिके यांच्यासह त्यांचे कर्मचारी, पोलिस कर्मचारी श्री. फुलसुंदर व इतर मोजक्याच लोकांनी पीपीई किट्स घालुन पंचनामा केला. आणि शेतातच त्या शेतकऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या वेळी नातेवाईक व ग्रामस्थांना दूर ठेवण्यात आले होते. त्या शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार असून या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
स्वतः आत्महत्या केली मात्र सुरक्षितता जपली !
रुग्णालयातून परवानगी मिळाल्यानंतर तो कोणत्याही वाहनात न जाता थेट वीस किलोमीटर अंतर पायी चालत शेतातील शेड गाठले होते. नातेवाईकांना संसर्ग होऊ नये. म्हणून त्याने सूरक्षितता जपली. परंतू स्वतःच आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
संपादन - गणेश पिटेकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.