उस्मानाबाद : महाविकास आघाडीच्या एकोप्याने जिल्हा बँकेवर एकहाती सत्ता आली आहे. मात्र तुळजापूर आणि परंडा मतदारसंघात आघाडीचे मतदान फुटल्याने दगाफटका झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अपेक्षेपेक्षा जास्तीचे मतदान भाजपच्या गोटात गेल्याने `अर्थ`चक्र जोरात फिरले असल्याची चर्चा होत आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत झाली. मात्र महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) एकोपा राहणार की विस्कटणार यावरून निकालाचे सुत्र ठरणार होते. शिवाय महाविकास आघाडीचे पाच उमेदवार बिनविरोध निघाले होते. त्यामध्ये शिवसेनेचे दोन, काँग्रेसचे दोन तर राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराचा समावेश होता. त्यानंतरही भाजपने उर्वरित १० जागांसाठी चुरस निर्माण केली होती. शिवाय महाविकास आघाडीतील काही अतिमहत्त्वाकांशी नेत्यांना अप्रत्यक्षरित्या हाताशी धरून सत्ता मिळविण्याचा भाजपचा आटोकाट प्रयत्न सुरू होता. (Osmanabad District Cooperative Bank Election Analyses)
मात्र सर्वच आघाड्यावर भाजप अपयशी ठरले. परंडा, भूम आणि वाशी या तिन्ही तालुक्यात भाजपचे जास्तीचे मतदान नाही. तरीही परंडा, वाशी या तालुक्यात भाजपच्या उमेदवाराला अपेक्षेपेक्षा जास्तीची मते मिळाली आहेत. यामध्ये आघाडीच्या मतांची फाटाफूट झालेली दिसत आहे. शिवसेनेचे मतदार जास्तीचे फुटले असल्याची चर्चा आहे. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, आमदार तानाजी सावंत दोन्ही मातब्बर महाविकास आघाडीत होते. तरीही मतदानाची फाटाफूट झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे माजी आमदार राहुल मोटे यांचा करिष्मा महाविकास आघाडीच्या कामी आल्याने विजयाचे तोरण बांधले. तेरणा साखर कारखान्यावर डोळा ठेवत आपल्या विचारांची मंडळी बँकेत असावी, अशी व्युहरचना तयार करण्याचा काही नेत्यांचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तर मंत्रिमंडळ स्थान न मिळालेल्या आमदार सावंत यांना पुन्हा एकदा घटलेल्या मतांचा हिशोब, त्याची कारणे वरिष्ठांच्या कानी मांडावी लागणार आहेत. महाविकास आघाडीने यश मिळविले असले तरी मतदान क्रॉस झाल्याने नेमके कोणी गद्दारी केली याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. कळंब तालुक्यातही एका काँग्रेस नेत्याने भाजपसोबत जाण्याचा सल्ला मोबाईलवरून दिला होता. मात्र त्याचा हा संदेश फोल ठरल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू झाली आहे. पण, तो काँग्रेसचा नेता कोण? याची उत्सुकता वाढली आहे. शिवाय भाजपचे युवा नेतृत्व तथा आमदार पुत्र मल्हार जगजितसिंह पाटील यांनी स्वतः निवडणुकीत पुढाकार घेऊन कामाला लागले होते. आयसीयुमध्ये (हॉस्पिटल) असलेल्या मतदाराला थेट अँम्बुलन्समध्ये घेऊन येत मतदान करून घेतले. मात्र अपेक्षित मतांची जुळवणूक करण्यात त्यांना यश आले नाही. परिणामी त्यांच्या पदरात अपयश आले आहे. उस्मानाबाद (Osmanabad) तालुक्यात मात्र महाविकास आघाडीचा करिष्मा दिसला. विशेष म्हणजे या तालुक्यात भाजपची मते फुटल्याचे चित्र आहे. अनेक नाराजांनी भाजपसोबत राहिले. मात्र मतदान महाविकास आघाडीच्या बाजूने केली असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत आहे. असे मतदार कोणते आहेत, याचा शोध कार्यकर्त्यांनी सुरू केला आहे. (Osmanabad District Cooperative Bank)
तुळजापूरमध्ये ही फाटाफूट
महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसचे सुनिल चव्हाण बिनविरोध निवडून आले. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण (Madhukarrao Chavan) यांच्या माध्यमातून तालुक्यात काँग्रेसची ताकद मोठी आहे. असे असतानाही उर्वरीत मतदानासाठी महाविकास आघाडीची मते फुटली आहेत. विशेष म्हणजे इतर मतदारसंघात झालेल्या मतदानापैकी १४ पैकी १३ मतदान भाजपच्या गोट्यात गेले आहे. त्यामुळे बिनविरोध निवडून आलेल्या चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या इतर उमेदवारांसाठी फारसे प्रयत्न केलेले दिसत नाहीत. उलट त्यांनी तेथे थेट भाजपच्या उमेदवाराला मदत केल्याची चर्चा सुरू झाल्याने त्यांची राजकीय कोंडी होण्याचे संकेत आहेत.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना धक्का
गेली अनेक वर्षे डॉ. पद्मसिंह पाटील (Padamsinh Patil) आणि विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinh Patil) यांची बँकेवर सत्ता होती. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने समीकरणे बदलली होती. तालुक्यासह जिल्ह्यात भाजपचे बळ वाढल्याची चर्चा होती. मात्र एकही उमेदवार निवडून न आल्याने हा भाजपच्या ऐवजी आमदार पाटील यांना धक्का मानला जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.