उस्मानाबाद : सोलापूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाचे नळदुर्गजवळील (ता. तुळजापूर) चौपदरीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे. नळदुर्ग शहराबाहेरून काढण्यात येणाऱ्या मार्गावर पुलाच्या कामासाठी तीन वर्षांपूर्वी मोठा खड्डा खोदण्यात आला असून, तेथे पुलासाठी सळईचा सांगाडा उभारून दोन वर्षे झाले. याठिकाणी वाहतुकीसाठी असलेल्या पर्यायी मार्गाचीही दुरवस्था झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील अणदूर (ता. तुळजापूर) येथील भुयारी मार्गाचे काम दीड वर्षांपासून रखडले आहे, तर नळदुर्गजवळील पुलाचे काम तीन वर्षांपासून रखडले आहे. पुलासाठी तुळजापूर रस्त्यावर गेल्या तीन वर्षांपूर्वी खड्डा खोदण्यात आला आहे. तेथे सळईचे सांगाडे उभारण्यात आले.
त्यानंतर हे काम बंदच आहे. पुलाच्या उत्तरेकडील बाह्यरस्त्याचे कामही पूर्ण झाले आहे. केवळ चार किलोमीटरच्या मार्गाचे आणि नळदुर्ग व अणदूर येथील पुलाचे काम रखडले आहे. नळदुर्गजवळील पुलाचे काम रखडल्याने जुन्या राष्ट्रीय महामार्गावरूनच सध्या वाहतूक सुरू आहे. हा रस्ताही अनेक ठिकाणी वाहतुकीयोग्य राहिला नाही.
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील उर्वरित भागातील महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, अणदूर आणि नळदुर्ग येथील पुलाचे काम अर्धवटच आहे. नळदुर्गजवळील पुलाच्या कामासाठी खड्डा खोदल्यानंतर त्याठिकाणी तुळजापूरला जाण्यासाठी केलेल्या पर्यायी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
खडी उघडी पडल्याने वाहनांची चाके पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. पाऊस झाल्यानंतर तेथे पाणी थांबून चिखल होत असल्याने दुचाकी वाहने घसरून अपघातही होत आहेत. हे काम मुदतीत पूर्ण करून घेण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
खड्ड्याला पावसामुळे खदानीचे स्वरूप
पुलासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्याला आता खदानीचे स्वरूप आले आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, परिसरातील नागरिक तेथे आता कपडे धुणे, वाहने धुण्यासाठी घेऊन येत आहेत. खड्ड्याच्या बाजूने लावलेली माती पर्यायी रस्त्यावर पसरून पावसामुळे तेथे चिखल होत आहे. तेथून दुचाकी वाहन घेऊन जाताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.