परभणी : यंदा झालेल्या दमदार पावसाचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून, त्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. परिणामी, प्रमुख नद्यांसह उपनद्याही दुथडी भरून वाहत आहेत.
गेल्या महिन्यात पावसाने दडी मारल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पुढील वर्षभराच्या पाण्याचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न पडलेला असतानाच या महिन्याच्या सुरुवातीपासून सुरु झालेला पाऊस हा जिल्ह्यासाठी समाधानकारक ठरला आहे. जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मोठे प्रकल्प असलेल्या येलदरी व निम्न दुधना प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने चिंतेत वाढ झाली होती.
परंतु, जुलै महिन्यात पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाला. मात्र, नंतर सलग २१ ते २२ दिवस पावसाने जिल्ह्यात पाठ फिरविली होती. पाऊसच नसल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा राहिला होता. परंतु, मागील दोन- तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने सर्वच चिंता दूर केल्या आहेत. या पावसामुळे पाणी पातळी वाढली असून, जिल्ह्यातील सर्वच लघू व मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.
जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणात १०० टक्के पाणीसाठा असून, या धरणाच्या दोन दरवाज्यातून ४ हजार ४२४ क्यूसेस पाणी सोडले जात आहे. तर, निम्न दुधना प्रकल्पाच्या सहा दरवाज्यातून पाणी सोडले जात आहे. यातून ६ हजार ६० क्यूसेस पाणी सोडले जात आहे. परिणामी, पूर्णा नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे. दुसरीकडे जायकवाडीचे दरवाजे उघडण्यात आल्याने जिल्ह्यातून वाहणारी गोदावरी देखील दुथडी भरून वाहत आहे. गोदावरी व पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या परभणी जिल्ह्यातील येलदरी १०० टक्के तर निम्न दुधना ७३ टक्के भरले आहे. तर, लघू प्रकल्पातील करपरा, मारोळी हे १०० टक्के भरले आहेत.
सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस?
ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक काळ गायब राहिलेला पाऊस आता सप्टेंबर महिन्यात परत आला आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु झालेल्या पावसाने सर्व जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे या महिन्यात सर्वाधिक पाऊस होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
येलदरी धरण पाणीपातळी
मृत पाणीसाठा - १२४.६७० (दलघमी)
जिवंत पाणीसाठा - ८०९.७७०
एकूण पाणीसाठा - ९३४.४४०
पाणीपातळी - ४६१.७७२ मीटर
मागील २४ तासांत आवक - १५.५३६ दलघमी
टक्केवारी जिवंतसाठ्याची - १०० टक्के
विद्युत निर्मिती केंद्रातून सोडण्यात येत असलेला विसर्ग - १८०० क्युसेस
मुख्य द्वाराद्वारे सोडण्यात येत असलेला विसर्ग - ४४२४ क्युसेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.