परभणी : रासायनिक कीटकनाशकाचा अयोग्य व अतिवापरामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. शेतीत रासायनिक निविष्ठाचा शिफारशीप्रमाणे काटेकोरपणे वापर आवश्यक असून, रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकरी बांधवांनी सुरक्षतेच्या उपाय योजना करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.
गुरूग्राम (हरियाना) येथील कीटकनाशक निर्मिती तंत्रज्ञान संस्थेच्या वतीने शनिवारी (ता. १९) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात पीक उत्पादनात कीटकनाशकांचा सुरक्षित न्याय वापर आणि नवीन कीटकनाशक घटकांचा उपयोग यावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहूणे म्हणून संस्थेचे संचालक डॉ. जितेंद्र कुमार आणि जिल्हाधिकारी आंचल गोयल या उपस्थित होत्या.
व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एन. ए. शकील, निर्माण तज्ज्ञ डॉ. अमरिश अग्रवाल, शास्त्रज्ञ सुदीप मिश्रा, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, प्राचार्य उदय खोडके, विभाग प्रमुख डॉ. पी. एस. नेहरकर, डॉ. प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. इंद्र मणी म्हणाले की, येणारे युग हे डिजिटल तंत्रज्ञानाचे आहे. ड्रोनव्दारे कीटकनाशकांची योग्य पद्धतीने फवारणी केल्यास कमी कीटकनाशक मात्रेत प्रभावी कीड व्यवस्थापन शक्य होणार आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून लवकरच कृषी विद्यापीठाव्दारे सहाशे युवकांना विविध कृषी तंत्रज्ञानात कौशल्य विकासाकरिता विशेष प्रशिक्षणाची सुरूवात करण्यात येणार आहे. याकरिता जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रास्ताविक डॉ. देवराव देवसरकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुनीता पवार यांनी केले. आभार डॉ. अमरिश अग्रवाल यांनी मानले.
कृषी विद्यापीठाने संशोधनाच्या आधारे विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकरी बांधवांनी आत्मसात करावे. आज हवामान बदलाचा शेतीवर मोठा परिणाम होत आहे. पीक पद्धतीत बदल होत आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांचा योग्य वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.
- आंचल गोयल, जिल्हाधिकारी, परभणी
कीटकनाशके तयार करण्यासाठी, विश्लेषणात्मक संशोधन आणि विकासासाठी एक गुरूग्राम (हरियाना) येथील कीटकनाशक निर्मिती तंत्रज्ञान संस्था नामांकित आहे. पर्यावरण आणि वापरकर्त्यांना अनुकूल कीटकनाशके आणि त्यांचे अवशेष विकसित करते. अनेक वनस्पतिजन्य कीटकनाशके योग्य वेळी वापरल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर मर्यादित करणे शक्य होते.
- डॉ. जितेंद्र कुमार, संचालक, गुरूग्राम कीटकनाशक निर्मिती तंत्रज्ञान संस्था, हरियाना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.