कन्नड - कन्नड शहरातील कन्नड चाळीसगाव रस्त्यावरील आदर्श हॉटेल समोर सहा गुंडांनी वाल्मीक नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, तेलवाडी येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना (ता. 24) सायंकाळी साडेचार वाजता रिक्षा भाड्यावरून दगडी फरशीने जबर मारहाण केली. यात तिन विद्यार्थिनी व चार विद्यार्थी विद्यार्थी जखमी झाले आहेत. आरोपींना अटक करा यासाठी कन्नड शहर पोलीस ठाण्यात संतप्त जमाव जमा झाला.
कन्नड शहर पोलीस ठाण्यात सरिता ईश्वर मोरे (वय-१९) रा. स्वामी समर्थ कॉलनी या विद्यार्थीनीने तक्रार दिली. त्यानुसार ती व तिच्यासोबत मेघा बाळासाहेब जाधव, पल्लवी ईश्वर कोल्हे, निशा रमेश माळी, संध्या रघुनाथ निकम, पुनम पुजाजी पायघन, संतोष राजू बनकर, चंचल राठोड, प्रियंका चाबूकस्वार, प्रीती किसन पवार, यश दत्ता सुरडकर, गौरव ज्ञानेश्वर धुमाळ, पवन राजू थोरात, स्वप्निल शिवाजी बनकर, हे सर्व जण वाल्मीक नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, तेलवाडी येथे शिक्षण घेतात.
कॉलेजला जाण्यासाठी त्यांनी इस्माईल शेख यांची रिक्षा लावली आहे. रिक्षातून कन्नड ते तेलवाडी असा प्रवास करतात. रिक्षा मालक व चालक इस्माईल शेख हे आजारी पडल्यामुळे त्यांनी या रिक्षावर अलबक्ष उर्फ बाबा सलीम शेख राहणार नितीननगर याला पाठवले नित्य नेमाप्रमाणे हे सगळे विद्यार्थी (ता. 24) सकाळी रिक्षाने बसून कॉलेजला गेले.
सायंकाळी चार वाजता याच रिक्षाने परतत असताना माझे रिक्षाचे भाडे द्या अशी मागणी रिक्षा चालक अलबक्ष शेख यांने केली. या विद्यार्थ्यांनी सांगितले की आम्ही मूळ रिक्षा मालक इस्माईल शेख यांना भाडे जमा करून दिले आहे त्यामुळे संतप्त झालेल्या इस्माईल अलबक्षने मी रिक्षा चालवतो, भाडे मला न देता मालकाला का दिले म्हणून हुज्जत घातली.
आता इथून पुढे मुलांना माझ्या रिक्षात घेणार नाही, फक्त मुलीच येतील असे म्हणून मुलांना अंधानेर फाटा येथील नायरा पेट्रोल पंपासमोर उतरून दिले. व विद्यार्थ्यांसोबत वाद घातला. विद्यार्थीनीही घाबरून रिक्षातून खाली उतरल्या. रिक्षा चालक आता तुम्ही बसस्टँडला या तुम्हाला दाखवतो अशी धमकी देऊन निघुन गेला.
विद्यार्थी पायी कन्नडकडे येत असताना आदर्श हॉटेल समोर रिक्षाचालक अलबक्ष शेख व पाच मित्र दोन मोटारसायकलवर आले. व विद्यार्थ्यांवर तुटून पडले. रस्त्याच्या कडेला असलेल्या फरशीच्या तुकड्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात निशा माळी हिच्या उजव्या पायावर जबर मार लागला.
संध्या निकम, सरिता मोरे यांनाही मारहाण झाली. यश दत्ता सुरडकर यांच्या उजव्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले. गौरव धुमाळ, पवन थोरात, स्वप्नील बनकर यांना बेदम मारहाण केली. चित्रपट स्टाईल मारहाण होत असल्याने मोठा जमाव जमला. त्यानंतर मारहाण करून आरोपी फरार झाले.
विद्यार्थ्यांच्या पालक व आप्त, व विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांचा जमाव शहर पोलीस ठाण्यात जमा झाला. व आरोपीस अटक करा अशी मागणी केली. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.
पोलिसांनी रिक्षा चालक अलबक्ष शेख रा.नितिननगर यास अटक केली.अन्य पाच आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे.
जखमी विद्यार्थी पवन राजु थोरात (वय-१९), यश दत्ता सुरडकर (वय-२०), दोघेही रा. नाचनवेल, संध्या रघुनाथ निकम (वय-२०) रा. पिशोर यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात डॉ. प्रविण पवार, डॉ. सोहेल शेख यांनी उपचार केले. प्रथम जाधव याने आरोप केला की मारहाण झालेल्या मुलीच्या वडीलांना व त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक चॉंद मेंडके, सहाय्यक फौजदार सलीम शहा यांनी मारहाण केली.
या संदर्भात पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.