jaydatta kshirsagar 
मराठवाडा

Political News : नव्या पक्षाचा शोध अन् शिलेदारांची धुसफुस! मोठ्या क्षीरसागरांसमोर दुहेरी पेच

दत्ता देशमुख : सकाळ वृत्तसेवा

बीड : ओबीसीचे मातब्बर नेते अशी ओळख असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासमोर अनेकदा राजकीय आव्हाने उभारली. मात्र, त्यांनी आपल्या राजकीय कौशल्याने भल्याभल्यांना मात दिली. मात्र, विधानसभा निवडणुकीत पुतण्याकडून पराभवानंतर त्यांना म्हणावा तसा राजकीय बुस्ट भेटलेला नाही. आता तर त्यांच्यासमोर नवीन पक्षाचा शोध घेण्याबरोबरच त्यांच्या समर्थक शिलेदारांमधील धुसफुस थांबविण्याचे आव्हान आहे. बाजार समितीमधील पराभवानंतर ही धुसफुस अधिकच चव्हाट्यावर येत आहे.

दिवंगत लोकनेत्या केशरबाई क्षीरसागर यांच्या काळापासून क्षीरसागर घराणे काँग्रेसी राहीले. त्यांना पक्षांतर्गत विरोध आणि क्षीरसागरांकडून पक्षातील विरोधकांना मात हेही जुनेच समीकरण असे. पुढे जयदत्त क्षीरसागर विधानसभा मैदानात आल्यानंतर अगोदर काँग्रेस पक्षानेही त्यांना उपमंत्री, राज्यमंत्रिपद दिले. तर, राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर क्षीरसागर घराणे राष्ट्रवादीत राहीले. त्यांना राष्ट्रवादीनेही पहिल्या आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री व नंतर कॅबिनेट आणि महत्त्वाचे ऊर्जामंत्रीपद तसेच जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही दिले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून १९९९, २००४, २००९ आणि २०१४ या चार निवडणुका लढविलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना पराभवही पत्करावा लागला होता. मात्र, जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये ते होते.

दरम्यान, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी पडझड झाली. परंतु, एकट्या जयदत्त क्षीरसागर यांनी विजयाचा गुलाल उधळला. मात्र, राज्यात भाजपचे सरकार आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपकडे आल्याने त्यांची कायम भाजपशी जवळीक राहीली. याच दरम्यान पुतणे संदीप क्षीरसागर यांनी त्यांना आव्हान दिले.

इकडे क्षीरसागर भाजपच्या निकट असत तर हीच संधी साधून त्यांचे पक्षांतर्गत विरोधक संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादीच्या जवळ नेण्याच्या प्रयत्नात असत. अखेर लोकसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागरांनी भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांचा प्रचार केला. परंतु, एकाच म्यानात दोन तलवारी (पंकजा मुंडे व जयदत्त क्षीरसागर ओबीसी नेते असल्याने) नको म्हणून जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले.

शिवसेनेनेही त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले. परंतु, विधानसभा निवडणुकीत त्यांना पुतणे संदीप क्षीरसागर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार येऊनही याच पक्षात असलेले जयदत्त क्षीरसागर सत्तेपासून दूर दिसायचे. याच काळात नगर पालिकेसाठी मंजूर झालेल्या नगरोत्थान अभियानातील ६९ कोटी रुपयांच्या १२ रस्ते व नाली बांधकामांची भूमिपूजने त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करून घेतली. त्यामुळे शिवसेनेने (उबाठा) त्यांना पक्षातून बाहेर काढले.

सध्या क्षीरसागर कोणत्याही पक्षात नाहीत. मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीवेळी त्यांनी भाजपशी जवळीक केली. परंतु, येथेही भाजपचा पराभव झाला. त्यामुळे क्षीरसागर कोणत्या पक्षात जाणार याबाबत विविध राजकीय तर्क - वितर्क लावले जात असले तरी आजघडीला मात्र ते कोणत्याच पक्षात नाहीत. क्षीरसागर शिंदे सेनेत गेले तर मतांचा बेस नाही आणि भाजपमध्ये गेले तर नगर पालिकेत मुस्लिम मतांची भीती असा दुहेरी पेच त्यांच्यासमोर आहे.

दरम्यान, जयदत्त क्षीरसागर यांना पराभव नवे नाहीत. मात्र, पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून लोकांमध्ये मिसळणारे व मतदार संघात कायम संपर्क ठेवणारे जयदत्त क्षीरसागर २०१९ नंतर मात्र संपर्काला कमी पडत असल्याचे नाकारता येणार नाही.

नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील पॅलनच्या पराभवाचे देखील अल्प संपर्क हे देखील एक मोठे कारण आहे. दरम्यान, क्षीरसागरांच्या पूर्वीच्या राजकारणात जयदत्त क्षीरसागर विधानसभा क्षेत्रात असत. तर, थोरले बंधू रवींद्र क्षीरसागर स्थानिक स्वराज्य संस्था व कारखाना पाहत. तर, धाकटे बंधू डॉ. भारतभूषण क्षीरसागर नगर पालिका क्षेत्रात राजकारण करत.

संदीप क्षीरसागरांचा देखील राजकीय वावर पंचायत समिती व जिल्हा परिषद क्षेत्रातच असे. मात्र, पालिका क्षेत्रातील अधिकारावरूनच संदीप क्षीरसागर व काका डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यात दुरावा आला आणि काका - पुतणे अंक सुरु झाला.

दरम्यान, आता पूर्वी पालिका क्षेत्राचे राजकारण पाहणारे डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना शहराच्या राजकीय आखाड्याची खडा अन् खडा माहिती होती. राजकीय डावपेचांतही ते माहीर होते. मात्र, अलीकडे डॉ. क्षीरसागर काहीसे मागे सरल्याने शहरातील त्यांच्या गटाची सूत्रे चिरंजीव डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या हाती आहेत.

वेळीच लक्ष घालण्याची गरज

पूर्वी जयदत्त क्षीरसागर व माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची समर्थके वेगवेगळी असली तरी दोन्ही क्षीरसागर भावंडे एकमेकांच्या समर्थकांना कौशल्याने हाताळत. मात्र, अलीकडे शहरातील समर्थकांमध्येच धुसफुस सुरु आहे. जयदत्त क्षीरसागरांचे शहराकडे लक्ष नसून डॉ. योगेश क्षीरसागर यांचेही ठरावीक समर्थकच त्यांच्या मागे-पुढे असतात. मात्र, जे जयदत्त क्षीरसागर यांना मानतात ते डॉ. योगेश क्षीरसागर यांच्याजवळ जात नसावेत किंवा डॉ. क्षीरसागर त्यांना जवळ करत नसावेत. त्यामुळे ही धुसफुस अधिकच वाढत आहे. क्षीरसागर जरी मातब्बर असले तरी आपले देखील स्वत:चे राजकीय अस्तित्व असल्याने ही ज्येष्ठ मंडळी ‘चार हात अंतर’ राखून असून अलीकडे अंतर वाढतच आहे. आता हे अंतर या मंडळींना दुसऱ्या रस्त्याने नेऊ नये यासाठी जयदत्त क्षीरसागर यांनी वेळीच लक्ष घालण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT