हिंगोली: शहरातील साई रिसॉर्ट येथे सुरू असलेल्या इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात पाच जिल्ह्यातील १४८ प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. बालवैज्ञानिकांनी सादर केलेले प्रयोग पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली.
भारत सरकार विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषदेतर्फे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात हिंगोलीसह औरंगाबाद, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांतील बालवैज्ञानिक सहभागी झाले आहेत. शेती, पर्यावरण, आधुनिक तंत्रज्ञान आदी विषयांवरील प्रदर्शन बुधवारपर्यंत (ता. पाच) सुरू राहणार आहे.
परभणीच्या बालवैज्ञानिकांचा समावेश
परभणी सात, जालना ३७, औरंगाबाद ३२, हिंगोली ६१; तर बीड जिल्ह्यातील वैज्ञानिकांची चार प्रयोग सादर केले आहेत. प्रदर्शनात परभणी येथील रावसाहेब जामकर विद्यालयाचा शेख सलमान याने ‘स्मार्ट जीपीएस जॅकेट’ प्रयोगाचे सादरीकरण केले. डी. एस. कुलकर्णी यांनी त्यास मार्गदर्शन केले. या प्रयोगातून अंध व्यक्तींना दिसण्यापासून मदत मिळणार आहे. तर याच विद्यालयातील शरविल जाधव याने विजेचा अपव्यय रोखण्यासाठी ‘स्मार्ट स्ट्रीट लाईट’ प्रयोग सादर केला. सरस्वती विद्यालय गडद गव्हाण येथील साक्षी खिल्लारे हिने ‘खत फवारणी यंत्र’ सादर केले. तर प्रतीक्षा जाधव हिने ‘ड्रेनेज सिस्टीम’ हा प्रयोग सादर केला.
यावर क्लिक करा- मुलींना अश्लिल व्हिडिओ दाखविणारा शिक्षक कोठडीत
बीड, औरंगाबाद वैज्ञानिकांचाही समावेश
बीड माध्यमिक विद्यालय दीडगुड येथील निकिता पांढरे हिने ‘घरगुती मिक्सर’ हा प्रयोग सादर केला. तसेच अंबेजोगाई येथील खोलेश्वर माध्यमिक विद्यालयातील समीहन क्षीरसागर याने ‘वन सीड प्लांटिंग मशीन’ हा प्रयोग सादर केला.वैजापूर (जि. औरंगाबाद) येथील जिल्हा परिषद गर्ल हायस्कूलच्या वनिता दयाटे, मोनाली माळी यांनी ‘उंचावरील लाईट काढण्याची यंत्रणा’ विकसित केली आहे. पैठण येथील सरस्वती भुवन विद्यालयाच्या पूजा करेवड, युवराज चित्ते यांनी ‘संवेदनशील शिरस्त्रान’ या प्रयोगाचे सादरीकरण केले.
खुलताबाद येथील अथर्व नागेचा ‘स्काय ग्लो’ प्रयोग
याच विद्यालयाचा आदित्य उपाध्ये याने ‘आरो वॉटर’, तर ओंकार लासुरे याने ‘डिजिटल डस्टबिन’ प्रयोग सादर केला. खुलताबाद येथील घृष्णेश्वर विद्यालयातील अथर्व नागे याने ‘स्काय ग्लो’; तर कन्नड येथील रूपानंद सरस्वती हायस्कूलमधील विकी बारगळ याने ‘कापूस तोडण्याची मशीन’ हा प्रयोग सादर केला. एसबी हायस्कूलमधील अभिषेक कापसे याने ‘घनकचरा व्यवस्थापन’ यावर प्रयोग सादर केला. जालना येथील गोविंद भुले, कुरेशी सोफियन यांनी ‘रस्त्याच्या वळणावर अपघात टाळण्यासाठी उपाययोजना’ प्रयोगाचे सादरीकरण केले.
इतर शाळांतील विद्यार्थ्यांची गर्दी
या शिवाय खानापूर चित्ता (ता. हिंगोली) येथील विद्यासागर विद्यालयातील वैष्णवी मुंढे, सतीश तायडे यांनी ‘हॅन्ड ग्रेनेड मिक्सर’ हा प्रयोग सादर केला. याच शाळेतील अजय घुगे, घोडके यांनी ‘सौरऊर्जेवर शेती सिंचन’ हा प्रयोग सादर केला. बाभूळगाव येथील रावसाहेब पाटील माध्यमिक आश्रम शाळेतील स्वाती पंडित हिने ‘सुपर थ्री इन वन कूलर’ची निर्मिती केली. यासह इतर प्रयोगही लक्ष वेधून घेत होते. प्रयोगांची पाहणी करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना बालवैज्ञानिक प्रयोगाची माहिती देत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.