परभणी : येथील मध्यवर्ती बसस्थानकाची नवीन इमारतीचे काम सुरू असून, तात्पुरत्या स्वरुपात बसस्थानकापुढील तोकड्या जागेतच बसेस उभ्या राहून प्रवाशांची ने-आण करतात. परिणामी, हे बसस्थानक सद्यस्थितीत धुळीने माखले असून, प्रवाशांच्या आरोग्याचा आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
परभणी आगारातून मोठ्या शहरांसह ग्रामीण भागात बसद्वारे प्रवास करणारे असंख्य आहेत. परभणी आगारातून छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर सोलापूर, अकोला आदी महत्त्वाच्या शहरांसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रवासी बसने प्रवास करतात. बसचा प्रवास प्रवाशांना सुरक्षित वाटत असल्याने प्रवासीही बसच्या प्रवासाला पसंती देतात. परंतु, परभणी आगारातून दररोज भंगार बसचा वापर केला जात आहे.
अनेक बसच्या खिडक्या तुटलेल्या असून बसमध्ये धुळही साचली आहे. याकडे आगारप्रमुखांचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. याकडे विभागीय नियंत्रकांनी लक्ष देऊन प्रवाशांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.
प्रवाशांची गैरसोय नित्याचीच
परभणीच्या बसस्थानकातून दररोज शेकडो प्रवासी येजा करतात. राज्यातील विविध ठिकाणी जाण्याकरिता येथून एसटी उपलब्ध आहे. नेहमीच गजबजलेलं बसस्थानक असून देखील हे बस स्थानक सुविधांपासून दूर आहे. बसस्थानकात खड्डे पडलेली आहेत. पावसाचे पाणी या खड्ड्यांत साचून बसस्थानकाला डबक्याचे स्वरुप येते. यातून प्रवाशांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. बसस्थानकात स्वच्छतेचा अभाव असून, पिण्याचे पाणी देखील उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.
बसपोर्टचे काम संथ गतीने
साधारणतः २०१९ मध्ये परभणीच्या बसस्थानकाच्या जागेमध्ये बसपोर्ट उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, हे काम संथगतीने सुरु असल्यामुळे प्रवाशांसह चालक व वाहकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. बसपोर्टचे काम सुरु असल्याने बसस्थानकाच्या समोर रस्त्यालगत असलेल्या १० मीटर जागेत तात्पुरत्या स्वरुपात पत्र्याचे शेड उभारण्यात आलेले आहे. येथे धुळीचे साम्राज्य असल्याने अधिकारी, वाहक, चालक व प्रवाशीही कमालीचे त्रस्त झालेले आहेत.
सुरक्षिततेची कुठलीही उपाययोजना नाही
कुठलीही स्वच्छता न करता पर्यायी बसस्थानक थेट सुरू केलेले आहे. त्यामुळे कायम धुळीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. तसेच बसस्थानकात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कुठल्याही उपाययोजना दिसत नाही. पाण्याची सोय नसल्यामुळे प्रवाशांना बाटलीबंद पाणी विकत घेऊनच तहान भागवावी लागत आहे. बसस्थानक परिसरात सर्वत्र खड्डे पडलेली आहेत. त्यामुळे महामंडळ कर्मचाऱ्यांसह प्रवाशांचे हात होत आहेत.
प्रवाशांना निवारा अपुरा
परभणीचे वसस्थानक बसपोर्टच्या स्वरुपात उभे राहणार आहे. त्यासाठी जुनी इमारत चार वर्षांपूर्वीच जमीनदोस्त केली आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी बस स्थानकाच्या पुढील बाजूला पर्यायी बसस्थानक उभे केले आहे. परंतु, अत्यंत तोडक्या जागेत हे पर्यायी बसस्थानक उभे राहिल्याने याठिकाणी प्रवाशांची गर्दी होत आहे. बसला उभे राहण्यासाठी प्लॅटफाॅर्म नाही. बसस्थानकात आलेल्या बस एकामागे एक उभे राहून बाहेर पडत आहेत.
त्यामुळे अनेक प्रवाशांना आपली बस आली की नाही, हे समजण्यास उशीर लागतो. काही जणांची बस निघून गेली तरी त्याला कळत नाही. त्याशिवाय प्रवाशांना बसण्यासाठी उभा करण्यात आलेला निवारा देखील अपुरा आहे. त्यामुळे बहुतांश प्रवासी बस उभ्या राहत असलेल्या जागेवर येऊन उभे रहाताना दिसत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.