हिंगोली: जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन केल्यानंतर बुधवारी (ता. १८) रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरात शुकशुकाट जाणवत होता. तुरळक प्रवाशी ये-जा करीत असताना दिसून आले.
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासन उपाययोजना राबवित आहे. कोरोनाबाबत नागरिकांना माहिती दिली जात असून यापासून बचाव करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, शिंकताना नाका-तोंडावर रुमाल धरणे, शक्य असल्यासच घराबाहेर पडणे आदी आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कोरोना विषाणू रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाय केले असून संशयित रुग्णांसाठी आयसोलेशन कक्षाची स्थापना केली आहे. सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले आहेत. धरणे, उपोषण आदी आंदोलनांवर बंदी घातली आहे.
हेही वाचा - वारंगा फाटा येथे गव्हाचा ट्रक पेटला
प्रवास करण्याचे टाळताहेत नागरिक
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रवाशांनी प्रवास करण्याचे टाळत आहेत. बुधवारी येथील बसस्थानक, रेल्वेस्थानकावर शुकशुकाट पाहावयास मिळाला. या बाबत आगार परिसर स्वछ ठेवून स्वच्छतागृह, बसमध्ये हँडवॉश ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना चालक, वाहकांना हात धुण्यासाठी हॅंडवॉश ठेवले नसल्याचा आरोप केला जात आहे. तसेच येथील एका कंपनीने नियुक्त केलेले कामगार नोकरी सोडून गेल्याने बसची आतून साफसफाई केली जात नाही. कचरा पडून असलेल्या बस पुढील मार्गासाठी धावत आहेत. त्यामुळे अशा बसमधून प्रवाशांना प्रवास करण्याची वेळ आली आहे. याकडे आगार प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
शासकीय कार्यालयांतील गर्दी ओसरली
हिंगोली: जिल्ह्यात कोरोना विषाणूचा आजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना म्हणून अभ्यागतांना व इतर नागरिकांना कार्यालयात येण्याचे टाळून मेलवर माहिती किंवा तक्रारी पाठविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार बुधवारी (ता. १८) जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांशिवाय नागरिकांची संख्या तुरळक दिसून आली.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग सतर्क झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाच्या परिवर्तन एक्स्प्रेस वरती कोरोनाचे बॅनर लावून प्रचार व प्रसार केला जात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पालिका, नगर पंचायत आशा शहरी व ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यासह नागनाथ मंदिर, नरसी नामदेव येथील मंदिर, यात्रा बंद ठेवून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
येथे क्लिक करा- हिंगोलीत पुन्हा दोन ‘कोरोना’ संशयित आढळले
ई-मेलवर सोडविले जाताहेत प्रश्न
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बुधवारी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय आदी कार्यालयांत न येता पत्रव्यवहार ई-मेलवर करावा, ३१ मार्चपर्यंत कार्यालयात येण्याचे टाळावे, तसेच गरोदर माता, लहान बालके, मधुमेह, पन्नास वर्षांपेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती व आजारी असणाऱ्या व्यक्तींनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन केले होते. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, कृषी अधीक्षक कार्यालय, तहसील, उपविभागीय अधिकारी, बांधकाम विभाग कार्यालय कामानिमित्त येणाऱ्या शेतकरी, नागरिकांमुळे गजबजलेले असते. बुधवारी मात्र तुरळक संख्या दिसून आली. केवळ अधिकारी, कर्मचारी कार्यालयात काम करीत असल्याचे दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.