सिनेमात शोभावा असा व पोलिसांची सतर्कता दर्शवणारा हा प्रसंग कळंब शहरात घडला आहे
कळंब (उस्मानाबाद): गुप्त बतमीदारकडून मिळालेल्या माहितीवरून अनेक गुन्हे पोलिस शोधून काढतात. त्यामुळे अनेक गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यास मदतही होते. मात्र, काही वेळा चुकीच्या माहितीमुळे पोलिसांची धावपळ होते, मात्र प्रत्यक्षात गुन्हा किंवा बेकायदेशीर कृत्य घडलेलेच नसते. असाच एक प्रकार ढोकी रस्त्यावरील एका हॉटेलात, एक व्यक्ती जेवनाच्या टेबलावर पिस्तुल घेवून बसला आहे. अशी पोलिसांना माहिती मिळते. यास गांभीर्याने घेत प्रथम सिव्हील ड्रेसवरील दोन पोलिस कर्मचारी हॉटेल परिसरात येऊन दुरवरून खात्री करतात. यानंतर अधिकार्यांसह मोठा फौजफाटा तेथे दाखल होतो. त्या व्यक्तीवर झडप घालतो. मात्र, पुढं हाती आलेली ती वस्तू पिस्तुल नव्हे तर 'लायटर' निघते. हा प्रकार बुधवार (ता.२५) रात्री साडेआठ च्या सुमारास घडला.
सिनेमात शोभावा असा व पोलिसांची सतर्कता दर्शवणारा हा प्रसंग कळंब शहरात घडला आहे. पोलिसांना अनेकदा गुप्त माहिती मिळत असते. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस अशा गुप्त खबऱ्याकडून माहिती घेत त्या माहितीला गांभीर्याने घेत असतात. शक्यता, अशक्यतेचा विचार न करता 'अलर्ट' होत कामाला लागत असतात. याचाच प्रत्यय बुधवारी रात्री कळंब पोलिसांना आला. साधारणतः साडेआठ वाजेच्या सुमारास पोलिसांना एक गुप्त माहिती मिळते. ढोकी रस्त्यावरील एका हॉटेलात मैफल जमवलेल्या तिघा तरूणांपैकी एकाकडे गावठी बंदुक असल्याचे ते 'इनपूट ' असते. यास गांभिर्याने घेत पोलिस 'अॅक्शन मोड' वर येतात. पोलिस नाईक सुनिल हंगे, मिनाज शेख प्रारंभी 'सिव्हिल ड्रेस' वर हॉटेल परिसरात येऊन दूरवरून टेहळणी करतात. यात बंदुकी असल्यासारखी वस्तूची खात्री पटल्यानंतर तत्काळ पोलिस निरक्षक तानाजी दराडे यांना माहिती देतात.
नंतर पोलिस निरीक्षक दराडे, सहायक पोलिस निरीक्षक अशोक पवार, पोलिस कर्मचारी सुनिल हंगे, मिनाज शेख, प्रशांत राऊत, गणेश वाघमोडे, शिवाजी राऊत, पठाण आदींचा फौजफाटा त्या हॉटलच्या दिशेने मार्गस्थ होतो. यावेळी समोरचा व्यक्ती कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय? याची माहिती नसल्याने, तो कशाप्रकारे प्रतिकार करेल याची शाश्वती नसल्याने पोलिसांच्या ताफ्यात काही शस्त्रसज्ज कर्मचारी सहभागी होते. या स्थितीत तयारीनिशी आलेल्या पोलिस पथकाने त्या व्यक्तीला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले.
पिस्तूल नाही तर निघाले लायटर-
हॉटेलमध्ये बसलेल्या त्या तरूणांकडून हस्तगत केलेली वस्तू हुबेहूब पिस्तुल दिसून येत असल्याने बारकाईनं पाहणी केली असता ती पिस्तुल नसून सिगारेट पेटवण्याचे 'लायटर' असल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत एका 'ई कॉमर्स' कंपनीकडून सदर लायटर मागवल्याचे तरूणांने सांगितले. यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. पोलिसांनी ठाणे डायरीत नोंद करुन त्यास सोडण्यात आल्याचे समजते. सिनेस्टाईल घडलेल्या या प्रकाराची शहरात चांगलीच चर्चा होत आहे.
गुप्त माहिती मिळाली-
पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांनी सांगितले की, आम्हाला खबऱ्याकडून गुप्त माहिती मिळाली. यास गांभीर्याने घेत प्रथम खात्रीसाठी एक पथक पाठवले. यानंतर लागलीच मागून आम्ही दाखल झालो. यात पिस्तूलसारखी दिसणारी, परंतु लायटर असलेली वस्तू मिळून आली. समोरच्या व्यक्तींची चौकशी करत, वर्तणूकीची माहिती घेऊन त्यास सोडले. अशाप्रकरणी गांभीर्याने घेत कार्यवाही करावी लागते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.