सिल्लोड - आधी लग्नसराई अन् सध्या उन्हाळी सुट्यांमुळे बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सुरक्षित प्रवास आणि एसटीच्या वेगवेगळ्या सवलती, लांब पल्ल्यांसाठी सुरू असलेल्या गाड्या यामुळे प्रवासीवर्ग मोठ्या प्रमाणात एसटीकडे वळल्याचे चित्र आहे. असे असले, तरी अनेक वर्षांपासून सिल्लोड आगारास नवीन बस मिळालेल्या नाहीत. त्यामुळे खिळखिळ्या अन् भंगार बसवरच एसटी मात्र हाऊसफुल्ल आहे.
सिल्लोड आगारात पहाटे पाचपासून रात्री अकरापर्यंत प्रवासी एसटीची वाट बघत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील दैनंदिन फेऱ्या; तसेच लांबपल्ल्याच्या बसेसमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत असल्याने चालक-वाहकांच्या नाकीनऊ येत आहे.
एका बसची प्रवासी वहन क्षमता ही ५५ असताना सध्या बहुतांशी बसमधून शंभरच्या वर प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे वाहकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने बस थांबविली नाही, तर प्रवासी वादावादीवर येत असल्याने चालक, वाहकांची डोकेदुखी वाढली आहे. खासगी वाहतुकीच्या स्पर्धेत एसटी उतरली असली, तरी बसगाड्यांची अवस्था मात्र दयनीय आहे.
त्यामुळे प्रवाशांचा भार वाहताना चालकांची दमछाक सुरू आहे. गाड्यांची दुरवस्था झालेली असतानाही प्रवाशांची गर्दी बघता गाड्यांची देखभाल करण्यासही आगाराला वेळ मिळत नाही. एकीकडे एसटीची चाके थांबत नसल्याने दुरवस्था झालेल्या बसमधून प्रवाशांना नाईलाजाने प्रवास करावा लागत आहे.
नवीन बस मिळणार कधी?
पाच वर्षांपासून सिल्लोड आगारास एकही नवीन बस मिळालेली नाही. काही वर्षांपूर्वी बोटावर मोजण्याइतक्या गाड्या मिळाल्या, परंतु त्यादेखील रंगरंगोटी करूनच मिळाल्या. नवीन बस मिळतच नसल्याने आता एसटीचा प्रवासीवर्ग वाढल्यानंतर महामंडळाने सिल्लोडसारख्या महत्त्वाच्या आगारास नवीन बस उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
एसटी नफ्यात, बसेस मात्र भंगारच
कोरोना प्रादुर्भावानंतर एसटीच्या महसुलावरदेखील याचा मोठा परिणाम झाला. त्यामुळे तोट्यात असलेल्या लालपरीची अवस्थाही दयनीय झाली.
वर्षभरापासून मात्र एसटीचा प्रवासीवर्ग वाढल्याने आगाराच्या उत्पन्नातही भर पडून सिल्लोड आगार वर्षभरापासून नफ्यात आले आहे. परंतु, आहे त्याच बसेसवर रोजचा गाडा हाकला जात असल्याने बसची अवस्था भंगार झाली आहे.
त्यामुळे आहे त्या बसमधून नागरिकांना प्रवास करावा लागत असल्याने आता महामंडळानेच याकडे लक्ष देऊन नवीन बसेस पुरविण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.