गोकुंदा : आजकाल वाढदिवस म्हटले की बडेजावपणा, गावभर देखावा, बॅनर, शुभेच्छांचा वर्षाव आणि जागोजागी केक कापून वाढदिवस साजरा करण्याचा प्रकार सगळीकडेच वाढत आहे. याला अपवाद ठरले ते किनवट येथील एक केश कर्तनालयाचे मालक. त्यांनी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी एक आगळा-वेगळा उपक्रम राबवून अनेकांचे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील चक्क ८१ मुलांच्या मोफत कटींग त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केल्या.
हेअर पार्लर मालकाने अतिदुर्गम भागातील छत्रपती शिवाजी हायस्कूल बेल्लोरी (धानोरा ) या शाळेत जाऊन गोर-गरीब ८१ आदिवासी मुलांच्या मोफत कटींग करून आपला वाढदिवस साजरा केला. किनवट येथील केशकर्तनाचे आधुनिक दालन असलेल्या एजे (AJ) हेअर पार्लर स्पाचे चालक अजय हळदकर यांचा शुक्रवारी (ता.२७) वाढदिवस होता. त्यांनी आपला वाढदिवस आगळावेगळा करण्याची कल्पना आपले मित्र युवा कार्यकर्ते शिवा सोळंके पाटील यांना बोलून दाखविली. त्यांनी लगेच बेल्लोरी (धानोरा) येथे आपली शाळा आहे. तिथे आपण जाऊन तुमची कल्पना प्रत्यक्ष साकारू, असे सांगितले.
दुकान बंद करून सर्व कारागिर सहभागी
श्री.हळदकर यांनी शुक्रवारी (ता.२७) आपले दुकान बंद करून दुकानातील सर्व कारागिर अक्षय हाळदकर, श्रीनिवास पोलसवार, संतोष सवने, हर्षद मुनेश्वर, शंकर बोडके यांना सोबत घेऊन अतिदुर्गम डोंगरी भागात असलेल्या छत्रपती शिवाजी हायस्कूल बेल्लोरी (धानोरा) गाठले. येथील गोरगरीब ८१ आदिवासी मुलांची मोफत कटिंग करून एक आगळा वेगळा वाढ दिवस साजरा केला. या नवख्या उपक्रमाबद्दल संस्थापक तथा मुख्याध्यापक सुरेश पाटील सोळंके व सचिव नंदाताई सोळंके यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन अजय हळदकर यांचा सत्कार केला व वाढदिवसाचा केक कापून त्यांचे अभिनंदन केले.शाळेतील शिक्षक राजेश नेम्माणीवार यांचाही वाढदिवस असल्याने त्यांनाही शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा...नववर्षात परभणीकरांचे स्वप्न पूर्ण होणार !
सामाजिक उपक्रमाची सर्वत्र कौतुकास्पद चर्चा
या अगळा वेगळा वाढदिवसाला शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महागड्या, हायफाय सलूनमध्ये जाऊन कटींग करण्याची गोरगरीब पालकांचीच ऐपत नसते; तर विद्यार्थी यापासून कोसो दुर असतात. परंतु, वाढदिवसानिमित्त श्रीहळदकर यांनी ३२ किलोमीटर अंतरावरील थेट शाळा गाठून राबविलेल्या सामाजिक उपक्रमाची सर्वत्र कौतुकास्पद चर्चा होत आहे. यानिमित्ताने एक चांगला उपक्रम राबविण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.