पाचोड - पाणीटंचाईच्या संकटातून जिवापाड जोपासलेल्या मोसंबीच्या बागांना आता सर्वत्र हवामानातील बदल व जमिनीतील उष्ण व आद्रतेचा फटका बसून फळांची बेसुमार गळ होत आहे. मोसंबीची होणारी गळ व फळावर पडलेल्या डासमाशीच्या प्रार्दुभावामुळे मोसंबी उत्पादक संकटात सापडला असून दररोज लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे चित्र पाचोडसह पैठण तालुक्यात पाहवयास मिळते.
पैठण तालुका हा मोसंबीचा आगार म्हणुन ओळखला जातो. तालुक्यात ९,४२९ मोसंबी उत्पादक शेतकऱ्याकडे ८,६२६ हेक्टरवर फळधारणा झालेले मोसंबीचे क्षेत्र असून ऊस व कापसानंतर मोसंबी महत्वाचे पिक मानले जाते. मोसंबीमुळे सर्वसामान्य कुटूंबातील शेतकर्याच्या घराला घरपण व चार चौघात मोठेपण मिळाले. गत दोन वर्षा पूर्वी अतिवृष्टीच्या तर यंदा पाणीटंचाईच्या संकटातून कशाबशा बागा जगल्या.
आता पुन्हा उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या संकटाची धास्ती उभी ठाकली, शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात लाखो रूपये खर्च करुन टॅंकरच्या पाण्यावर तर कुणी विहीर, बोअरवेलचे खोदकाम करून बागा जगविल्या. यांत आंबा बहराने मोसंबीचे झाडे लगडून गेली. अन् आता पदरात दोन पैसे पडणार तोच डासांचा प्रादुर्भाव वाढला. त्यातच समाधानकारक पाऊस न झाल्याने जमिनीतून पडणाऱ्या उष्णता तर कोठे आद्रतेमुळे फळांना गळती लागली.
अर्थातच 'मगरी' नावाचा आजार उद्भवून मोसंबी झाडावरच पिवळी होऊन झाडाखाली पूर्णतः सडा पडल्याचे पाहवयास मिळते. आंबा व मृग बहाराने लगडलेल्या अन् जिवापाड जोपासलेल्या बागांनी शेतकऱ्यांची साथ सोडण्यास सुरवात केली, फळ परिपक्व होण्यापूर्वीच बागेतील फळांना मोठ्या प्रमाणात गळती होऊन मोसंबी उत्पादक नागवले जात आहे. मात्र अद्यापपावेतो कृषी विभागाने गाव पातळीवर जाऊन शेतकर्यांना मार्गदर्शन करून प्रतिबंधात्मक उपाय सूचवलेले नाहीत.
यंदाही 'येरे माझ्या मागल्या...' प्रमाणे 'दुष्काळात तेरावा महीन्याची' अनुभूती शेतकऱ्यांना अनुभवावी लागत आहे. सध्या आंबा बहाराने झाडे लगडली असुन फळे उतरविण्यासाठी महीनाभराचा कालावधी आहे. व्यापारीवर्ग बागांतील फळगळती पाहून उक्ते सौदे टाळत असून टनाप्रमाणे बोली करुन संधी साधून घेत आहे.
फळांना लागलेली गळती पाहुन मोसंबीचे दर कमालीचे घसरले आहे. एकंदरीत दोन वर्षापासून मोसंबीमुळे शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. जमिनीतील वाढती उष्णता व अतिरिक्त पाणी, रासायनिक खतामुळे मोसंबी फळांची गळती होवून शेतकऱ्याची लाखो रुपयांची हानी होत आहे. बहुतांश मोसंबी उत्पादक मिळेल त्या दराने बागा देऊन मोकळे होत आहे.
यावर्षी सगळीकडेच मोसंबीचे उत्पादन अधिक असून विक्री थंडावल्याचे कारण देत व्यापारीही पडत्या भावाने बागांची मागणी करीत असल्याने अनेकांनी भाववाढीच्या अपेक्षेने बागा देण्याचे टाळले असल्याने त्यांना अधिक भुर्दंड सोसावा लागत आहे. झाडांवरच माल राहु दिल्यास उष्णता व वातावरणामुळे खराब होवून ते खाली पडत असल्याने शेतकरी द्विधा मन:स्थितीत सापडला आहे.
बाबुतात्या गोजरे, कैलास सुकासे, परमेश्वर सुकासे, मनोरखॉ पठाण आदी शेतकऱ्यांनी तातडीने कृषी विभागाने मार्गदर्शन करुन उपाययोजना सुचविण्याची मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.