नांदेड : कोव्हीड-१९ च्या उद्रेक व प्रसार कालावधीत रब्बी पिके परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. बाजारपेठेतील हालचालींसह उत्पादनाची काढणी व हाताळणी करणे अपरिहार्य आहे कारण शेतीची कामे वेळेवर झाली पाहिजेत. तसेच किड व रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच सामाजिक स्वच्छता व सुरक्षितेच्या खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन केले पाहिजे. या उपायांमध्ये सामाजिक अंतर ठेवणे, साबणाने हात स्वच्छ धुवून वैयक्तिक स्वच्छता राखणे, फेस मास्क परिधान करणे, संरक्षक कपडे आणि उपकरणे व यंत्रसामग्री स्वच्छ करणे या बाबींचा समावेश होतो. शेतावर काम करणाऱ्या लोकांसोबतच सर्वांनी कोव्हीड-१९ चा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर काळजी घेणे महत्वाचे आहे.
गहू-
उशिरा गव्हाची पेरणी केली असेल व गहू पीक शेतात सध्या उभे तर कंबाईन हारवेस्टरच्या सहाय्याने काढणी करुन घ्यावी. कंबाईन हारवेस्टरची उपलब्धता नसल्यास मजुरांमध्ये योग्य ते अंतर ठेवून शक्य तितक्या कमी मजुरांच्या सहाय्याने गव्हाची कापणी व मळणी करुन घ्यावी. कृषि उत्पन्न बाजार समिती बंद असल्यास गव्हाची योग्य पद्धतीने वाळवणी करुन सेल्फास वापरुन गोदामात साठवणूक करावी. काढणी पश्चात गव्हाचे काड न जाळता, जमिनीची नांगरणी करुन शेत पुढील हंगामासाठी तयार ठेवावे. बऱ्याच भागात गहू पिकाची काढणी जवळपास पूर्ण होत आली असून त्यासाठी मोठे गहू कापणीयंत्र राज्यामध्ये तसेच आजूबाजूच्या राज्यात वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. सदर यंत्रांची दुरुस्ती,देखभाल करण्याऱ्या व हाताळणाऱ्या कामगारांनी तसेच शेतकरी/शेतमंजुर व त्याचे कुटुबातील सदस्य Covid-१९ चा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी व काळजी घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा.....‘कोरोना’, कशी केलीस दैना..?
ऊस -
सुरु उसाची लागण झालेल्या क्षेत्रात पिक चार महिण्याचे होईपर्यंत खुरपणी व कोळपणी करुन तण विरहित ठेवावे. उन्हाळा चालू झाल्याने उसाला योग्य वेळेच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. ऊस पिकास पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. पाणी कमी असल्यास सरी वरंबा पद्धतीमध्ये एक आड एक सरीस पाणी द्यावे. सुरु हंगामी लागवड केलेल्या उस पिकाच्या लागणीस सहा ते आठ आठवडे झाले असल्यास नत्र खताचा दुसरा हप्ता शंभर किलो नत्र (युरिया २१७ किलो) प्रती हेक्टरी या प्रमाणात द्यावा.
ऊन्हाळी भुईमुग -
ऊन्हाळी भुईमुगाच्या आ-या जमिनीत जाण्यास सुरवात झाल्यावर आंतरमशागत करु नये. ऊन्हाळी भुईमुगाच्या आ-या जमिनीत जाण्याच्या वेळी ते शेंगा पोसण्याच्या कालावधीस पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची दक्षता घ्यावी. भुईमुगास शक्य असल्यास स्प्रिंकलर पद्धतीने पाणी द्यावे. उशिरा भुईमुग पेरणी झाली असल्यास झाडांना माती लावावी. भुईमुग पिकावर टिक्का रोग येऊ नये म्हणुन कार्बेन्डाझीम चार मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाने खाणा-या अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफास २० मिली १० लिटर पाण्यात पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेंगा तयार होत असताना जास्तीत जास्त शेंगा तयार होण्यासाठी ७० ग्रॅम ००:५२:३४, ५० ग्रॅम मल्टीमायक्रोन्युट्रीयंट १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हेही वाचलेच पाहिजे.... बीड जिल्ह्यावर निसर्ग कोपला - कष्टाने पिकवलेल्या पिकावर आघात, गारांसह वादळी पाऊस
भाजीपाला -
सततच्या वाढत्या तापमानामुळे सर्व भाजीपाला पिकात पाण्याचे योग्य नियोजन करावे. कांदा काढणीस आला असल्यास काढणी करुन शेतात तीन ते चार दिवस सुकवावा नंतर पात कापुन तीन आठवडे सावलीत सुकवावा तद्नंतर प्रतवारी करुन साठवणूक करावी. लसूण काढणी झाल्यानंतर पातीचा रंग परतल्यानंतर जुड्या बांधून हवेशीर ठेवावा. गवार पिकाची तोडणी वेळोवेळी करावी भेंडी पिकावरील रस शोषण करणा-या किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास डायमिथोएट ३० ई.सी. १५ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील तण काढून घ्यावे त्यामुळे कीड व रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. वेल वर्गीय पिकामध्ये रस शोषून घेणा-या किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास डायमिथोएट ३० ई.सी. किंवा इमिड्क्लोरिड १७.८ टक्के एस एल पाच मिली व डायथेन एम-४५ (२५ ग्रॅम) ची फवारणी प्रति दहा लिटर पाण्यातून हातपंपाने करावी. भेंडी, भोपळा, वांगी इत्यादी भाजीपाला पिकावरील रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी पाच % निंबोळी अर्काची किंवा फिप्रोनिल २५ मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच भाजीपाला पिकावरील कोळींच्या नियंत्रणासाठी फेनप्रोपॅथ्रीन ३० % ई.सी., पाच मिली किंवा डायकोफाल १८.५ टक्के ई.सी., २० मिली प्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे.
डाळींब -
डाळींबाचा आंबे बहार घेतला असल्यास ठिबकद्वारे पाणी व्यवस्थापन करावे. खत व्यवस्थापनासाठी फर्टीगेशन तंत्राचा वापर करावा. ब्लोअरच्या सहाय्याने कीटक, रोग नाशकाची फवारणी करावी. बागेत दोन ओळीत गवत वाढले असल्यास ट्रॅक्टरच्या सहाय्याने फणनी किंवा रोटावेटरच्या सहाय्याने तण काढावे. उन्हापासून फळांचे संरक्षण होण्यासाठी फळांना कागदी पिशव्या अथवा जुन्या कापडी पिशव्याचे आच्छादन करावे. तेलकट डाग रोग नियंत्रणासाठी झाडांची नैसर्गिकरित्या पानगळ होईपर्यंत ताण द्यावा त्यामुळे काड्यांमधील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच उच्च तापमानामुळे डोळ्यांजवळ असणारे जिवाणू मरुन जातील व पुढिल बहारामध्ये रोगाचे प्रमाण कमी होईल. बहार छाटणी करतेवेळी शेंड्याकडील १० ते १५ से.मी. लांबीचा भाग छाटून काढावा तसेच शिफारशीत खतांची मात्रा देऊन नियमित पाणीपुरवठा करावा. सुत्रकृमींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास १३५ किलो कार्बोफुराऍन तीन जी प्रति हेक्टरी झाडांभोवती रिंग पद्धतीने पुरेसा ओलावा असताना टाकून झाकावे.
द्राक्ष -
फळाच्या काढणीस अडथळा आल्या कारणाने आपले नूकसान टाळण्याकरीता सध्याचा झाडावरील द्राक्षमाल बेदाण्यामध्ये परिवर्तित करण्यासाठी उपाययोजना करावी. पुर्ण काढणी झाली असल्यास व पुढील दहा दिवसांनी खरड छाटणी करण्याचे नियोजन असेल तर तत्पुर्वी जमीन व पाण्याची अन्नद्रव्य व खतांच्या नियोजनासाठी तपासणी करुन घ्यावी. द्राक्ष घडांची काढणी सकाळी किंवा सायंकाळी करावी. काढणी केल्यांनतर घड जास्तवेळ शेतात/बागेत ठेवू नयेत. घड वायूविजन असलेल्या सीएफबी पेटयांमध्ये भरुन पेटया बंद कराव्यात. पेट्या थंड तापमाणास ठेवून पूर्व शीतकरण करावे व लगेचच शुन्य ते दोन अंश सेल्सीयस तापमान व ८५-९० टक्के आद्रता असलेल्या शीतगृहात (कोल्डस्टोरेज) दोन महिन्यापर्यंत ठेवता येतात. द्राक्षापासून उत्तम प्रतीचा बेदाणा तयार करता येतो. थॉम्पसन सिडलेस, तास-ए-गणेश, सोनाक, माणिक चमण इ. जाती बेदाण्यासाठी उत्तम आहेत.
केळी -
केळीच्या बुंद्याजवळ वाढणारी पिल्ले नियमित कापावीत. तसेच केळीवरील जुनी वाळलेली व रोगट पाने कापुन बाग स्वच्छ ठेवावी. ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन करुन बाग वापस्यावर राहील याची काळजी घ्यावी. केळीचा घड निसवल्यावर केळफूल कापावीत. केळीच्या घडाचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी केळीच्या वाळ्लेल्या पानांची पेंडी करुन केळीचा घड व घडाचा दांडा झाकावा. केळीचा घड पुर्ण निसवल्यावर त्यावर ०.५ टक्के पोटॅशियम हायड्रोजन फास्फेट अधीक एक टक्के युरिया अधीक स्टिकर अथवा १० पीपीएम २-४ डी द्रावणाची फवारणी केल्याने केळी घडाच्या आकारमानात व गुणवत्तेत वाढ होईल. वजनाने मोठ्या असलेल्या घडास बांबूच्या सहाय्याने टेकू द्यावा. खोडवा पीक घेण्यासाठी मुख्य बागेची ७०-७५ टक्के निसवन झाल्यावर खोडवा धरावा. त्यासाठी केळी घडाच्या विरुद्ध बाजूचे एकसारख्या उंचीचे तलवारीच्या पात्यासारखी पाने असणारे पिल्ले राखावीत. केळीला गोलाई येवून लागल्यावर, इजा न करता सकाळी व सायंकाळी काढवीत. घड सावलीत आणल्यानंतर इजा न करता फण्या वेगळया कराव्यात. फण्या थंड झाल्यावर सहा टक्के मेण अधिक ०.१ टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवाव्यात. द्रावणातुन काढून द्रावण सुकल्यावर क्रेटमध्ये ठेवून, १४-१५ अंश सेल्सीयस तापमानास व ८५ टक्के आद्रतेत शीतगृहात तीन आठवडयापर्यंत साठविता येतात. केळीपासून वेफर्स, सुकेळी व पावडर तयार करता येते.
आंबा
नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना वा-यापासून संरक्षणासाठी काठीचा आधार द्यावा. मोठ्या झाडांना फळधारणेनंतर जमिनीचा प्रकार, झाडाचे वय, पाण्याची उपलब्धता इ.विचारात घेऊन योग्य वेळेच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी होऊ नये म्हणून फळझाडांच्या खाली वाळलेली पाने, तूर काड्या, उसाचे वाळलेले पाचट इ.चे आच्छादन करावे. पाड लागल्यावर झेल्याच्या सहाय्याने इजा न करता फळाची काढणी देठासहीत सकाळी किंवा सायंकाळी करावी. फळे काढल्यानंतर बागेत जास्त वेळ न ठेवता पॅकिंग हाऊसमध्ये आणावित. थंड पाण्यात ठेवून फळांचे पूर्वशितकरण करावे व फळे सहा टक्के मेण अधीक ०.१ टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवावीत. द्रावणात काढून द्रावण सुकल्यावर फळे वायूविजन असलेल्या सीएमबी पेटयामध्ये किंवा क्रेटमध्ये ठेवून, १०-१२ अंश सेल्सीयस तापमानास व ८५-९० टक्के आद्रतेत शीतगृहात एका महिन्यापर्यंत साठविता येतात. कच्चा आंब्यापासून लोणेच, आमचूर व पन्हे तयार करता येते. पिकलेल्या आंब्यापासून आंबापोळी व गर (पल्स) काढून वर्षभर साठवून ठेवता येतो.
चिक्कू -
काढणीस तयार झालेली फळे झेल्याच्या सहाय्याने इजा न करता सकाळी किंवा सायंकाळी काढवीत. फळे सावलीत आणून पसरुन ठेवावीत. फळे थंड झाल्यावर क्रेटमध्ये किंवा ०-२ टक्के वायूविजन असलेल्या १५० गेजच्या पॅालिथीनच्या पिशविमध्ये भरावीत. पिशव्या बंद करुन १८ -२० अंश सेल्सीयस तापमानास ठेवल्यास १५ दिवसापर्यंत उत्तमरित्या साठविता येतात. पिकण्यास सुरुवात झालेल्या चिक्कु पासून कॅन्डी व गोड चटणी करता येते व पिकलेल्या चिक्कुपासून पावडर तयार करता येते.
कागदी लिंबू -
काळी माशीच्या नियंत्रणासाठी १५ ग्रॅम असिफेट ७५ % पाण्यात मिसळाणारी पावडर प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फळे पोपटी रंगाची असताना इजा न करता सकाळी किंवा सायंकाळी काढावीत. काढलेली फळे सावलीत आणून पसरुन ठेवावीत. फळे सहा टक्के मेण अधीक ०.१ टक्के बाबीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवाव्यात. द्रावणातून काढून द्रावण सुकल्यावर फळे एक किलो क्षमतेच्या ०-२ टक्के वायूविजन असलेल्या १५० गेजच्या पॅालिथीनच्या पिशविमध्ये भरावीत किंवा क्रेटमध्ये भरावीत. या पिशव्या ८-१० अंश सेल्सीयस तापमान व ८५ - ९० टक्के आद्र्रता असलेल्या शीतगृहात ४०-४५ दिवस ठेवता येईल. कागदी लिंबापासून लोणचे, गोड चटणी, कॉर्डियल सिरप इ. पदार्थ तयार करता येतात.
मोसंबी -
फळांना पिवळसर रंग दिसू लागल्यावर इजा न करता, देठ ठेवून सकाळी किंवा सायंकाळी काढावीत. फळे पिरगाळून काढू नयेत. फळे सावलित आणल्यानंतर हवेशीर व मोकळया जागेत पसरुन ठेवावीत. कागदी लिंबाप्रमाणेच फळे सहा टक्के मेण अधीक ०.१ टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवाव्यात. द्रावणातुन काढून द्रावण सुकल्यावर फळे क्रेटमध्ये भरावीत. क्रेट ८-१० अंश सेल्सीयस तापमान व ८५ - ९० टक्के आद्रता असलेल्या शीतगृहात एक महिन्यापर्यंत ठेवता येतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.