देवगावफाटा (जि. परभणी) : पाण्याने भरलेल्या तलावाची शेती नव्हे तर मल्चिंग पेपरवर ड्रीपच्या साह्याने एकाच वेळेस दोन वेगवेगळी अंतरपिके घेऊन वांगी आणि मिरचीची लागवड बोरकिनी (ता. सेलू ) शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे. अधिकाधिक उत्पन्न वाढीसाठी खरीप हंगामात मल्चिंग पेपरचा वापर करून शेतकऱ्यांनी आता आधुनिकतेची कास धरली असल्याचे शिवारात पाहावयास दिसत आहे.
सध्या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी कमीत कमी खर्चात व श्रमात जास्तीत जास्त उत्पन्न वाढीसाठी लक्ष केंद्रित केले आहे. याच पार्श्वभूमीवर बोरकिनी येथील शेतकरी उद्धव पंडितराव मुसळे यांनी आपल्या शेतात बेड गादीवाफावर मल्चिंग पेपर अंथरून ड्रीपच्या साह्याने मल्चिंग पेपरच्या एकाच बेडवरती दोन अंतरपिके लागोपाठ प्रत्येकी चार बाय दीड फुटाच्या अंतराने घेतली आहेत. यात वांगी पिकाची लागवड करून याच बेडवरती मिरचीचीदेखील लागवड केली आहे.
मालाला मिळतो उच्चांकी भाव
बेड पद्धतीवर मल्चिंग पेपर अंथरून ड्रीपच्या पाण्याद्वारे विविध पिकांचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात कल असून, सध्या इतर शेतकरीदेखील मल्चिंग पेपरच्या साह्याने विविध पिके घेत आहेत. यामुळे शेतात अनावश्यक तण उगवत नाही. खतांचे नत्र सुद्धा उडत पडत नाही. याशिवाय जमीन भुसभुशीत राहाते तसेच पिकांच्या वाढीबरोरच लागवड केलेल्या विविध पिकांच्या उत्पादनाची गुणवत्तादेखील चांगली असल्याने मालाला उच्चांकी भाव मिळतो, असे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
शेतीचे असेही फायदे
अनावश्यक गवत शेतात वाढत नसल्याने खुरपणी, कोळपणीचा खर्च वाचतो. त्याचबरोबर विविध कीटकनाशकांचाही प्रादुर्भाव पिकावर जाणवून येत नाही. माती भुसभुशीत राहाते, पिकांच्या मुळींची वाढ चांगली होते. जरी फळे जमिनीवर टेकली तर ती खराब होत नाहीत. दरम्यान, उत्पादन घेण्यासाठी खर्च कमी येतो व उत्पादन चांगले होते व उत्पादित मालाला बाजारभावही चांगला मिळतो, असे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.