कारंजा (लाड) : ऑटो रिक्षा, ट्रॅव्हल्स एजन्सी, सर्व आस्थापना, हॉटेल्स, खानावळी, मद्य विक्री करणाऱ्या चालक, मालक, कर्मचारी, कामगारांनी कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक आहे. संबंधितांनी ती घ्यावी, अन्यथा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार यथायोग्य कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी षण्मुराजन एस. यांनी दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी कारंजा शहरात तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली असून, लस न घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
स्थानिक जयस्तंभ चौक, बायपास झाशी राणी चौक तसेच मुख्य मार्गावर नगर पालिकेमार्फत लसीकरण प्रमापत्राची तपासणी करण्यात आली व ज्या लोकांनी लस घेतली नाही अशा १५ लोकांवर दंडात्मक कारवाई करून ७५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. दिवसभरात अनेक वेगवेगळे प्रवासी ऑटोरिक्षाने प्रवास करतात, यामुळे कोविड-१९ संसर्गाचा धोका अधिक आहे.
करिता कोविड-१९ चा प्रादूर्भाव टाळण्यासाठी ऑटो रिक्षा चालकांचे लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षा तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीचा किमान पहिला डोस घेतलेला असणे आवश्यक आहे. अन्यथा सदर वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल तसेच सदर वाहन जप्त करण्यात येईल. ट्रॅव्हल्स एजन्सी यांनी ट्रॅव्हल्सद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे लसीकरण झाले असल्याबाबतची काऊंटरवरच खात्री करावी. लसीकरण झालेल्या प्रवाशांनाच तिकीट देण्यात यावे. लसीकरण न झालेल्या प्रवाशांना तिकीट अदायगी करण्यात येऊ नये. ट्रॅव्हल्स एजन्सीचे चालक, मालक, कर्मचाऱ्यांचे सुद्धा लसीकरण झालेले असणे आवश्यक राहील. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या आस्थापनेतील चालक, मालक व कामगार यांचे लसीकरण झालेले अनिवार्य असेल, असे जिल्हाधिकारी यांनी आदेशीत केले आहे. त्या अनुषंगाने कारंजा येथे कारवाई करण्यात येत आहे.
"कोणत्याही व्यक्तीस खाजगी दुकाने, गॅरेज, पानटपरी, हॉटेल येथे काम करण्यासाठी अथवा प्रवेशासाठी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे. सरकारी कार्यालय, स्वस्त धान्य दुकान, बँका, पोस्ट या ठिकाणी प्रवेश मिळविण्यासाठी खाजगी अथवा शासकीय वाहनाने प्रवास करण्यासाठी लसीकरणाचे दोन्ही डोस आवश्यक आहेत. लसीकरण न करून घेता कोणत्याही दुकानात अथवा प्रवास करताना नागरिक आढळून आल्यास दंडात्मक कारवाई जिल्हाधिकारी वाशीम यांच्याकडून प्राप्त आदेशानुसार कारवाई करण्यात येईल."
- धीरज मांजरे, तहसीलदार तथा इन्सिडेंट कमांडर, कारंजा
"कोणत्याही प्रकारच्या आस्थापनांमध्ये लसीकरण न झालेले कर्मचारी आढळून आल्यास, सदर आस्थापना दंडात्मक कार्यवाहीसह सील करण्याची कार्यवाही करण्यात येईल."
- दादाराव डोल्हारकर, मुख्यधिकारी, न.प. कारंजा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.