पूर्णा (जि. परभणी) : नवरी मुंबईत तर नवरदेव पूर्णेत... असा प्रकार लॉकडाउनमध्ये घडल्याने ऑनलाइन मंगल परिणय सोहळा करण्याचा विचार प्रत्यक्षात उतरविणाऱ्या एका जोडप्याचा विवाह पार पडला. सर्व विधी नवरी व तिच्या कुटुंबीयांनी मुंबईत पार पाडले तर नवरदेवाने पुर्णेत. नवरदेवाने मोबाईलमध्ये दिसत असलेल्या नवरीशी संवाद साधत मोबाईललाच मनी मंगळसूत्र व पुष्पहार घातला.
येथील सिद्धार्थ नगरमधील सुशांत गौतम जावळे यांचा मुंबईतील कल्याण भागातील काजल गौतम लोंढे हिच्यासोबत शुक्रवारी (ता.२२) मंगल परिणय सोहळा दुपारी ऑनलाइन पद्धतीने पार पडला. त्यांची सोयरीक झालेली होती. परंतु, कोरोनाच्या लॉकडाउनमुळे व मुंबई रेड झोनमध्ये असल्याने वधू व तिच्या कुटुंबीयांना इकडे किंवा इकडील मंडळींना तिकडे जाण्यासाठी परवानगी मिळत नव्हती.
हेही वाचा - ....अखेर शिधापत्रिका नसलेल्यांनाही मिळाला आधार
गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे केले पूजन
मुलाचे वडील गौतम, आजोबा सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी राघोजी परसराम जावळे, आजी कलमाबाई, चुलते जोतिबा यांनी पुढाकार घेत ऑनलाइन लग्न करण्याची कल्पना नवरीकडील मंडळींकडे मांडली व त्यांनीही तयारी दर्शवली. त्यानुसार बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे यांनी घेतलेल्या विधीप्रमाणे मंगल परिणय सोहळा ऑनलाइन पार पडला. प्रारंभी नवरदेवासह त्याच्या कुटुंबीयांनी भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन केले. असाच विधी नवरी व तिच्या कुटुंबीयांनी मुंबईत पार पाडला. या वेळी मोबाईल व्हिडिओ कॉलद्वारे तेथेही सर्व विधी होत होते. शपथविधीही त्याच पद्धतीने पार पडला.
वऱ्हाडी मंडळींनी फेसबुक लाईव्हद्वारे पाहिला सोहळा
नवरदेवाने मोबाईलमध्ये दिसत असलेल्या नवरीशी संवाद साधत मोबाईललाच मनी मंगळसूत्र व पुष्पहार घातला. वऱ्हाडी मंडळीनेही आपाआपल्या घरून व्हिडिओ कॉलिंग व फेसबुक लाईव्हद्वारा लग्नाचा सोहळा पाहत आनंद घेतला व वधू-वराला मंगलमय शुभेच्छा दिल्या. या वेळी सामाजिक कार्यकर्ते अमृत कऱ्हाळे, दाजिबा उर्फ चंद्रमुनी लोखंडे, शिवाजी वेडे, मोहन लोखंडे उपस्थित होते. या वेळी शासनाने दिलेल्या सूचनेचे पालन करून सुरक्षित अंतर राखून मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत मंगल परिणय सोहळा घेण्यात आला. या अनोख्या विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.