अंबाजोगाई : अंबाजोगाईसह लातूर, कळंब, केज, धारूर, शिराढोण, मुरूड व इतर१५ गावांना पाणीपुरवठा करणारे धनेगाव येथील मांजरा प्रकल्पाचा उपयुक्त पाणीसाठा शनिवारी शून्य टक्के झाला. त्यामुळे या धरणाच्या मृतसाठ्यावरच पाणी पुरवठ्याची भिस्त राहणार आहे. पुढील चार महिन्यांत पाणीसाठा होणारा पाऊस न झाल्यास या सर्व गावांवर पाणीटंचाईचे भीषण संकट ओढावणार आहे.
यापुढील चार महिन्यात आवश्यक तेवढा पाऊस न झाल्यास मांजरा धरणात पाणीसाठा होऊ शकणार नाही, परिणामी पाणीटंचाईचे संकट निश्चित आहे. अंबाजोगाई शहराला मुख्य करून मांजरा प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. मात्र, मागील दोन महिन्यांत धनेगावच्या एक्स्प्रेस फिडरवर सतत होणारा बिघाड, जलवाहिन्यांची गुढी यामुळे शहराला महिन्यातून दोन वेळा पाणी परवठा झालेला आहे. त्यामुळे पाणी असतानाही या कृत्रिम टंचाईला सामोरे जावे लागले आहे.
अनेक ठिकाणी जुन्या झालेल्या जलवाहिन्या व त्यांना लागलेल्या गळतीमुळे पाण्याचा अपव्ययही मोठ्या प्रमाणात झाला. २२४ दशलक्ष घनमीटर पाणी साठ्याची क्षमता असलेला धनेगाव प्रकल्प २०१९ नंतर प्रथमच मृतसाठ्यावर आला आहे. यापूर्वी २०१६ च्या दुष्काळात हे धरण कोरडेठाक पडले होते. त्यानंतर २०१९ वगळता पाच वर्षे चांगला पाऊस झाला. त्यामुळेच सिंचनासह सर्व पाणीपुरवठा योजनांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले. मागील वर्षी अत्यल्प पावसामुळे या धरणात आवश्यक तेवढा पाणीसाठा झाला नाही. पर्यायी ही समस्या निर्माण झाली आहे.
पाण्याचे नियोजन महत्त्वाचे
अंबाजोगाई शहराला तीस टक्के पाणीपुरवठा काळवटी साठवण तलावातून केला जातो. यापुढे मुबलक पाणीसाठा होण्यासारखा पाऊस न झाल्यास संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन काळवटीतील तलावातील पाणी पुरवठा इतर भागाला करण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. २०१६ मध्ये काळवटीचे पाणी अंबाकारखाना जलशुद्धीकरण केंद्रात घेऊन जाणारी जलवाहिनी अंथरण्यात आली होती. या जलवाहिन्या बायपास रस्त्याच्या कामात तुटल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन कसे करणार, याचे आव्हान नगर पालिकेसमोर असणार आहे. असे नियोजन न झाल्यास पालिका प्रशासनास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या नियोजनाला आताच सुरवात करावी लागणार आहे.
चार महिने पुरेल एवढाच साठा
जूनमध्ये पाऊस सुरू होणार असला तरी मांजरा प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात चांगला पाऊस झाला तरच ऑगस्ट महिन्यात पाण्याची आवक सुरू होते. धरणाच्या मृतसाठ्यात ४७.१३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात १६.१९ दलघमी गाळ आहे. म्हणजे हा गाळ वगळता ३०.९४ दलघमी एवढाच साठा शिल्लक आहे. त्यात दररोज ८ मिलिमीटर बाष्पीभवन होते. म्हणजे ०.११ दलघमी पाणी बाष्पीभवनातच जाते. या मृतसाठ्यावर २२ योजना आहेत. त्यासाठी दररोज ६५ हजार घनमीटर पाणी उपसले जाते. महिन्याला २.५० दलघमी हा पाणी उपसा पिण्यासाठी घेतला जातो. हे गणित पाहिले तर शिल्लक मृतसाठ्यातील पाणी सप्टेंबर अखेरपर्यंतच पुरेल, असा अंदाज मांजरा प्रकल्प अभियंता सूरज निकम यांनी व्यक्त केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.