आपण व्यवस्थापनाच्या गोष्टी करतो आणि बहुधा व्यवस्थापन करतो ही . करतो ही, यासाठी की कित्तीतरी वेळा आपल्याला कळेनासे होते की आपण व्यवस्थापन तर करतो आहे, मात्र ते दीर्घकालीन आहे की तात्पुरते ? हे व्यवस्थापन पुढील संकटांना सांभाळणार आहे की आपल्याला फजितीसाठी तयार राहायचं ? आपण बहुधा जे करीत आहोत त्यात काही न दिसणाऱ्या संकटांना पण ओळखून ठेवणे महत्वाचे ठरते. जर संकटं माहिती नसतील तर त्या न दिसणाऱ्या संकटांची तरतूद वा सामोरे जाण्याची तयारी तरी करून ठेवायला लागते.
आपण श्रीकृष्ण , अर्जुन, कौरव, पांडव आणि कितीतरी लोकांच्या व्यवस्थापनाच्या गोष्टी करतो, पण या गोष्टी करताना आपण त्या गोष्टी, त्या कहाण्या खरंच बारकाईने बघतो का ?
आता अगदी लहानस उदाहरणं पाहुयात, अभिमन्यूला धोक्याने मारलं म्हणून अर्जुनाने शपथ घेतली की कौरवांचा जावई जयद्रथाचा सुर्यास्ताच्या आधी वध करेन आणि जर नाहीच करता आला, तर स्वतः अग्नि समाधी घ्यायची हे नक्की. आता आली न फजिती ? अर्जुन जर स्वतः गेला तर पुढे युद्धाचे काय ? दिवसभर जयद्रथ काही अर्जुनाला सापडला नाही , आणि हे पांडवांसाठी संकटच, तेव्हा सूर्यास्त झाला , झाला काय सुर्यास्ताचा भास झाला तो त्याला लागलेल्या ग्रहणाने. अर्थातच कृष्ण यासाठी कारणीभूत होता. सूर्यास्त झाला हे पाहून जयद्रथ पुढे आला आणि ग्रहण सुटले. मग काय, कृष्णाने अर्जुनाला त्याचे मस्तिष्क बाणांनी उडवत उडवत वृध्द क्षत्राच्या म्हणजे जयद्रथाच्या वडिलांच्या मांडीवर नेऊन टाकायला सांगितले. कारण जयद्रथाला वर होता की त्याचे मुंडके जमिनीवर पाडणाऱ्या व्यक्तीच्या मस्तिष्काचे हजार तुकडे होतील. आणि अर्जुनाने कृष्णाचे म्हणणे ऐकले, बाणाने टोलवत टोलवत जयद्रथाचे मुंडके वृद्ध क्षत्राच्या मांडीवर नेऊन टाकले जिथे तो यज्ञ करत होता. तो दचकून उठला आणि जयद्रथचे मुंडके खाली पडताच वृद्ध क्षत्राचा ही अंत झाला.
अर्जुनावर आणि पांडवांवर आलेल्या मोठ्या संकटाचे कृष्णाने अतिशय साळसूदपणे व्यवस्थापन केले. कारण एकचं , कृष्णाला संकटं माहिती होती आणि नीती शास्त्र ही . तेव्हा त्याचे व्यवस्थापन त्याप्रमाणे अगदी सटीक होते. अर्जुनाचे सामर्थ्य होते कृष्णाचे व्यवस्थापन अवलंबण्याचें. ते महाभारत होते तेव्हा संकट ही त्या आकाराचे होते. पण आपल्या आयुष्याला एक महाभारत आहे अशी उपमा देणारे आपण, लहान सहान संकट आली की कोलमडायला लागतो. आपल्याला कृष्ण मिळणे जरा कठीणच तेव्हा आपण एखादी गोष्ट करीत असताना त्याची प्रत्येक बाजू विचार करून केली तर ते व्यवस्थापन कधीही कामी येईल. ज्याप्रमाणे पुढचा विचार करून व्यवस्थापन करणे महत्वाचे त्याचप्रमाणे स्वतःचा जयद्रथ न होऊ देणेही.
कोणत्याही कृत्याच्या तीन बाजू असतात , एक आपली, एक समोरच्याची आणि एक सत्याची म्हणजेच नीती शास्त्राची. जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा ती कितपत योग्य आहे याचा विचार कधीकधी चुकतो. ऑफिस वा घर, जसे आपण आधीपासून म्हणतो सत्ता, संपत्ती आणि सहवास चुकीच्या मार्गाचे वा विचाराचे असले तर त्याचे परिणाम भोगणे हे कोणालाही चुकत नाही. आणि एकदा का एखादी व्यक्ती नजरेतून आणि विचारातून उतरली तर तिचा आव आणलेला चांगुलपणा पण मग तिला वाचवू शकत नाही. आधीच्या काळी यज्ञ, तपस्या वगैरे करून अश्या काही गोष्टींच व्यवस्थापन लोकं करत असावे पण त्यांचाही काही टिकाव लागला नाही याची अनेक उदाहरणं आहेत.
तेव्हा संकटांचे व्यवस्थापन करायचे असेल आणि कृष्णाची साथ मिळवायची असेल तर कामाची सुरवात नीती आणि नियमाने करणे कधीही उत्तम. नीती पूर्ण कामांना पुढे येणाऱ्या संकटांनाही तोडगा शोधता येतो. आज नात्यांमध्ये आणि व्यवहारांमध्ये कमतरता होते ही याचीच आणि मग होत नाही ते व्यवस्थापन.
विचार करून पहा, कितीतरी उदाहरण समोर येतील . काही इतरांचे काही स्वतःचे , पण सत्याची म्हणजेच नीतीची बाजू ही कधीही संकटांच्या व्यवस्थापनात भरभक्कम पाया अशीच. ती जर जमली मग काय ते crisis-management म्हणजेच संकट व्यवस्थापन आणि त्याच्या अंतर्गत मोडणारे त्याचे विविध प्रकार अवघड असले तरी आपल्याला कोलमडू मात्र देणार नाही हेही नक्कीच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.