जर्मनीतून : शिल्पा गडमडे
जर्मनीत (Germany) नदीकिनाऱ्यावर वसलेल्या गावांतील लोकांना नदीचे पाणी घरापर्यंत येणे नवीन नाही. गेल्या आठवड्यातला पाऊस आणि त्यामुळे आलेल्या पुराने (Flood) मात्र नद्या भयावह झाल्या. अवघ्या काही तासांमध्ये निर्दयी पुराने हाती लागेल ते वाहून नेले. भारतातही अशीच काही पुराची दृश्य टीव्हीवर दिसतात. पूर आला त्यात दोष कुणाचा, नागरिकांना धोक्याची सूचना वेळेत का देण्यात आली नाही, अशा प्रश्नांचा चिखल (Mud) दोन्हीकडे सारखाच... सगळा गाळ उपसून झाला तरी कदाचित हाती काही लागणार नाही...
(flood your flood our mud like shilpa gadamde article)
तिथे एक रस्ता होता. त्यालगत एक बेकरी. थोडं पुढे गेलं की बसस्टॉप. तिथेच शेजारी एक सुंदर बाग. उन्हाळ्यात तर बाग वेगवेगळ्या फुलांनी बहरली आणि दरवळली होती. निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव अशी त्या गावाची ख्याती होती. पण एखादं दुःस्वप्न पडावं आणि त्यात तो रस्ता, ती बेकरी, तो बसस्टॉप, ती बाग अन् मोजमाप न करता येणारं सगळं वाहून जावं... मागच्या आठवड्यात हे दुःस्वप्न पडलं जर्मनीच्या काही राज्यांतील गावांना... त्याला कारण होतं त्या गावांमध्ये आलेला पूर.
नदीकाठाला वसलेली गावं जर्मनीला अनोळखी नाहीत. नदीवर जर्मन लोकांचे प्रेमदेखील आहे. नदी ओसंडून भरून पाणी घरापर्यंत येणेदेखील इथल्या लोकांना अपरिचित नाही; पण त्याची तीव्रता कमी असते. गेल्या आठवड्यातला पाऊस आणि त्यामुळे आलेला पूर हा अनेक वर्षांतला मोठा पूर आहे. दोन महिन्यांमध्ये सरासरी जेवढा पाऊस पडतो तेवढा पाऊस काही गावांमध्ये चोवीस तासांत पडला आणि नद्या भयावह झाल्या. फारशी सावरायची संधी न देता अवघ्या काही तासांमध्ये आलेल्या निर्दयी पुराने हाती लागेल ते स्वतःसोबत वाहून नेले.
टीव्हीवर बातम्या देणारी निवेदिका पुराने प्रभावित झालेल्या गावांची नावं सांगत जाते. दोन वर्षांपूर्वी सुट्टीला गेलेल्या आणि भावलेल्या गावाचं नाव त्या यादीत ऐकून डोळे पाणावले. स्क्रीनवर माहिती दिसत होती; पण माझ्या डोळ्यासमोर मात्र सुट्टीला गेल्यावरचंच गाव उभं होतं.
दृश्य एक : स्वत:चं घर असावं असं फेलिक्स आणि क्लाराचं बऱ्याच वर्षापासूनचं स्वप्न होतं. ते दोघं गेले काही वर्ष त्यासाठी राबत होते. नवीन घरात बाळाला जन्म द्यायचे हे दोघांनी खूप वर्षांपूर्वी ठरवलं होतं. घरासाठी पैशांचा ताळमेळ साधत घराचा सुंदर लेआऊट तयार केला होता. तो प्रत्यक्षात आणण्यासाठी कधी कारागीरांची मदत घेतली तर बजेटचा ताळमेळ साधण्यासाठी घराला रंग देणे, बाग तयार करणे अशी बरीचशी कामं स्वत:च केली. कित्येक विकेंड फक्त घराची काम करण्यात गेली. मनासारखं घर तयार झाल्यावर दोन आठवड्याआधीच ते नवीन घरात शिफ्ट झाले होते. कित्येक महिन्यांच्या कष्टांनंतर बागेत बसून शेजारून वाहत जाणाऱ्या नदीचे सौंदर्य बघत निवांतपणा अनुभवायचा, असे दोघांनी ठरवले होते. घराचं नियोजन करताना दोघांपैकी एकाला काही आवडलं नाही तर कागदावर खाडाखोड करून पुन्हा नव्याने रेखाटवं लागायचं तसं अचानक संपूर्ण घर मागच्या आठवड्यात आलेल्या पुराने खोडून टाकलं होतं. त्यांच्या हातात उरला फक्त चिखल... स्वप्नांचा आणि नव्याने मांडलेल्या संसाराचा...
दृश्य दोन : जेनीचे वेडिंग गाऊनचे दुकान होते. नववधूंसाठी पांढऱ्या रंगाचे, नक्षी-भरजरी काम केलेले सुंदर वेडिंग ड्रेस तयार करण्यासाठी तिचं दुकान प्रसिद्ध होते. तिच्या दुकानातल्या ड्रेसेसवर नजर खिळणार नाही असे सहसा होत नसे. गेलं वर्ष-सव्वा वर्ष कोरोनामुळे आलेल्या निर्बंधांमुळे तिच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम झाला होता. मागच्या महिन्याभरात जर्मनीत कोरोना संक्रमणाचा वेग मंदावल्याने जनजीवन पूर्ववत होऊ लागले होते. मागचा कसोटीचा काळ विसरून जेनीने उत्साहाने पुन्हा तिचे दुकान सुरू केले. तिच्या मैत्रिणीच्या मुलीने तिच्या लग्नासाठी जेनीकडून वेडिंग गाऊन विकत घेतला होता. तिने आग्रहाने जेनीला लग्नाला यायचे निमंत्रण दिले. डोळ्यासमोर लहानाची मोठी होताना बघितलेल्या मैत्रिणीच्या लेकीच्या लग्नाला जेनी गेली खरी.. पण त्या दिवशीच आलेल्या पुराने तिला जिवाहून प्रिय असणारे तिचे दुकान मात्र वाहून गेले.
दृश्य तीन : स्टेफनच्या बायकोचे तीन-चार वर्षांपूर्वी कॅन्सरशी झुंज देताना निधन झाले होते. लग्नाला वीस वर्षें झाली तरी त्यांचं एकमेकांवरचं प्रेम कमी झालं नव्हतं. लग्नाच्या वेळी त्याच्या बायकोने त्याच्या बोटात घातलेली अंगठी तो जिवापाड जपत असे. रात्री झोपताना तिच्या फोटोशेजारी तो अंगठी काढून ठेवत असे आणि सकाळी पुन्हा बोटात घालत असे. पुराच्या पाण्याने घरच्या पहिल्या मजल्यावरचे सामान वाहून नेले. पुराच्या धक्क्यातून थोडं सावरल्यावर जेव्हा त्याला हातात अंगठी नाही, हे जाणवले तेव्हा तो अस्वस्थ झाला. त्याच्या जगण्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट हिरावून घेतल्याने तो व्यथित झाला. पण दुःख करून चालणार नाही, घरात शिरलेला गाळ काढू लागला. त्याच वेळी त्याला अंगणात काहीतरी चमकताना दिसलं. जवळ गेल्यावर सापडली ती त्याची अंगठी. भरल्या डोळ्याने त्याने अंगठी पुन्हा बोटात घातली. पुरात वाहून गेलेलं तो आता पुन्हा उभारू शकणार होता.
वरच्या प्रमाणे कितीतरी दृश्य जर्मनीतील पूरप्रभावित क्षेत्रात पाहायला मिळत आहेत. पुराची बातमी कळल्याबरोबर जर्मनीच्या विविध भागांतून तत्परतेने मदतीला पोहचणारे आपत्कालीन सेवेतील कर्मचारी, जिवाची पर्वा न करता शक्य तेवढ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवणारे स्वयंसेवक, अग्निशमन दलाने केलेल्या कामाने भारावून जाऊन करिअर म्हणून याच क्षेत्रात जायचं असं ठरवणारी १६ वर्षांची मुलगी, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या... ही यादी वाढतच जाईल.
आपल्याकडच्या पुराचा विचार केला तर थोड्या फार तपशीलाने गोष्टी बदलतील... माणसांची नावं बदलतील.. पण कष्टाने उभारलेले संसार, जगण्यावरचे प्रेम, अचानक सगळं मोडून पडल्यावर येणारा ताण हा समान धागा आपल्याकडच्या किंवा जर्मनीतील पुरात आढळेल. जर्मनीसारखेच मदतीला धावून येणारे लोक आपल्याकडच्या पुरातदेखील भेटतील.
पूर आला त्यात दोष कुणाचा? नागरिकांना धोक्याची सूचना वेळेत का देण्यात आली नाही? सरकारी यंत्रणा एवढ्या उशिरा मदतीला का आली? अशा प्रश्नांचा चिखल मात्र दोन्हीकडे सारखाच... सगळा गाळ उपसून झाला तरी कदाचित हाती काही लागणार नाही. पण यापुढे नागरिकांना धोक्याची सूचना देण्यासाठी कुठल्या नव्या प्रणालीचा विचार केला पाहिजे, या दिशेने जर्मन सरकार विचार करायला लागलं आहे.
शाळेत असताना आम्हाला कुसुमाग्रजांची ‘कणा’ कविता शिकायला होती. त्यावेळी संपूर्ण वर्ग एका तालात कविता म्हणताना जो अर्थ उमजला नव्हता, तो आता उमजतो आहे. अशा वेळी सगळ्या दृश्यांची सरमिसळ होऊ लागते. आपल्याकडचा पूर, इथला जर्मनीतला पूर.. पाणी ओसरून गेल्यानंतर जगण्याचा गाळ घेऊन उभे असणारी लोकं.. गळून गेलेल्या पायात सामर्थ्य निर्माण करून उभं राहू पाहणारी माणसं... पूर तुमचा की पूर आमचा, असा प्रश्न उरत नाही. हाती उरतात कुसुमाग्रजांच्या ओळी... ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा’ आणि जर्मन शब्द nur gemeinsam sind wir stark (केवळ एकत्रच आपण खंबीर आहोत) विश्वास!
shilpa.gadmade@gmail.com
(लेखिका १२ वर्षापासून जर्मनी येथे वास्तव्यास आहेत. जर्मन जनजीवन आणि संस्कृती यावर त्या सातत्याने लिखाण करत असतात.)
(सर्व छायाचित्रे इंटरनेटवरून साभार.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.