जवळपास पाव शतक वैद्यकीय पेशास, त्यातही प्रसूतिशास्त्रास दिल्यावर चांगल्या वाईट अनुभवांची पोतडी बऱ्यापैकी भरलेली असते. ‘मुलगी झाली’ असे ॲापरेशन थिएटर मधून किंवा प्रसूतिकक्षातून बाहेर पडल्यावर नातेवाइकांच्या गर्दीसमोर जाहीर करणे व त्यांच्या प्रतिक्रिया बघणे हा या पेशाचाच एक भाग.
संगीता प्रसूतीपूर्व तपासण्यांसाठी आली की सासू कायम तिच्यासोबत असे. संगीताच्या सासऱ्यांचा बऱ्यापैकी मोठा व्यवसाय होता व त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना त्यात भागीदार करून घेतलं होतं. सुखी संपन्न अशा या संयुक्त परिवारातली संगीता सर्वांत धाकटी सून. मोठ्या दोघींनाही मुली असल्यामुळे सासूबाईंना आता संगीताकडूनच ‘वंशासाठी दिवा’ मिळण्याची अपेक्षा होती. गरोदरपण गुंतागुंतीचे असल्यामुळे सीझर करायचे ठरविले. ॲापरेशन थिएटरमधून तिचं गोजिरं बाळ हातात घेऊन बाहेर आल्यावर संपूर्ण परिवार बाळाच्या स्वागतासाठी सज्ज होता, परंतु सासूबाई कुठे दिसल्या नाही. विचारल्यावर कळलं की मुलगी झाली समजल्याबरोबर त्या लगेच घरी गेल्या. सुनेचं व नातीचं तोंडही बघायची इच्छा नव्हती त्यांना ! सुनेवर आतापर्यंत ऊतू जाणारं प्रेम क्षणभरात आटलं !
असाच आणखी एक किस्सा. अमित आपल्या आईचा एकुलता एक मुलगा. त्याला एक पाच वर्षाची मुलगी व आता बायकोला शीलाला बाळंतपणासाठी ॲडमिट केलेलं. शीलासोबत दवाखान्यात राहायला तिच्या आईला बोलवून घेतलेलं. मुलगी झाल्याचे सांगितले तर मायलेक दोघांच्या चेहऱ्यावरच्या प्रतिक्रिया बरंच काही बोलून गेल्या. नवऱ्याच्या हातात औषधाची चिठ्ठी दिली तर सासूबाई म्हणाल्या मी पण जरा घरी जाऊन येते. मुलीला आईजवळ ठेवून दोघेही मायलेक गायब झाले ते परत आलेच नाही. शीला व तिची आई वाटच बघत राहिले. घरी जाऊन बघितलं तर घराला भलमोठ्ठं कुलूप. शीलाने आपल्या वडिलांना फोन करून बोलवून घेतले व दवाखान्यातून सुटी झाल्यावर ते सर्वांना आपल्या घरी घेऊन गेले. काही दिवसांनी शीलाला घटस्फोटाची नोटीस आली कारण असंच काहीबाही. परंतु, खरं कारण काय ते आम्हाला कळलं होतं.
मुलीला देवीचं रूप म्हणणाऱ्या आपल्या देशात मुलीच्या आगमनावर दु:ख होणे ही किती खेदजनक बाब आहे. मूल गर्भात असताना लिंग परीक्षण करून मुलगी असल्यास भ्रूण हत्या केली जाते व या प्रवृत्तीस आळा घालायला कायद्याचा आधार घ्यावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे. एवढं करूनही कायद्यास दाद न देणारी भरपूर मंडळी आहे. हे आपलं दुर्दैव आहे की मुलीच्या जन्मावर प्रोत्साहनपर रक्कम सरकारला द्यावी लागते. जेणेकरून घरचेच लोक मुलीच्या जिवावर उठणार नाहीत. मुलीला विनामूल्य शिक्षण देऊन सुद्धा आईवडिलांची मानसिकता बदलत नाही. कशाला शिकवायचं? लग्न लावून लवकर मोकळं व्हायचं ही मानसिकता संपूर्णपणे नष्ट व्हायला काही पिढ्या जाव्या लागतील.
याउलट काही प्रतिक्रिया अगदी मन प्रसन्न करणाऱ्या असतात. स्मिताचं पहिलंच बाळंतपण. नवरा बायको दोघांनी मिळून निर्णय घेतला होता की एकच मूल होऊ द्यायचं. एकाचाच सांभाळ व्यवस्थित करायचा व एक सूज्ञ नागरिक तयार करायचा. मग तो मुलगा असो वा मुलगी. स्मिता व तिच्या नवऱ्याच्या घरचे लोक आणि मित्र मैत्रिणी गुलाबी व निळ्या रंगाचे फुगे घेऊन वाट बघत होते. मुलगी झाली कळल्याबरोबर सगळे निळे फुगे गायब झाले व गुलाबी फुग्यांनी संपूर्ण खोली नटून आई व बाळाच्या स्वागतास सज्ज होती.
तसेच एक उदाहरण विनिताचे आहे. सिझेरियनच्या वेळेस पाठीच्या मणक्यातून भूल दिली जाते व आई पूर्ण शुद्धीत असते. बाळ पोटाबाहेर आल्याबरोबर तिचा पहिला प्रश्न होता ‘काय झालं?’ मुलगी आहे कळल्याबरोबर ती हुंदके देऊन रडायला लागली. रडण्याचा आवेग इतका होता की तिच्या रक्तदाबावर व हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम होऊ लागला. सर्व जण तिची समजूत घालत असताना कळलं की दु:खामुळे नव्हे तर मुलगी झाल्यामुळे आनंदाचा आवेग तिला आवरता येईना !
शक्तीच्या विविध रूपांची उपासना करताना आपण विसरतो की तिच्या शक्तींपैकी सर्वोच्च आहे वात्सल्याची शक्ती. ‘या देवी सर्व भूतेषू, मातृ रूपेण संस्थिता’, ती आपल्या सर्वांमधे आईच्या रूपाने स्थित आहे. मग आपण तिचे वात्सल्य रूप आत्मसात करण्यास काय हरकत आहे? प्रत्येक व्यक्तीकडे मग ती आपली आई असो, मुलगी किंवा सून, बहीण किंवा मैत्रीण, वात्सल्यदृष्टीने बघितलं तर आपसूकच मुलींच्याप्रति घडणारे गुन्हे कमी होतील.
घरगुती वादविवाद मिटतील व मुली व स्त्रियांमधील असुरक्षिततेची भावना कमी होईल. देवीकडे आपल्या अज्ञानामुळे झालेल्या त्रुटींची क्षमा मागताना आदी शंकराचार्य ‘देवी अपराधक्षमापन स्तोत्रात’ म्हणतात, ‘कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति’, अर्थात संतती आपल्या कर्तव्याच्या मार्गात चुका करणे शक्य आहे परंतु, माता कधीच आपल्या संतती प्रती वाईट चिंतन करणे शक्य नाही. कुपुत्र होणे शक्य आहे, कुमाता होणे असंभव. माझ्या संततीच्या प्रती जशी वात्सल्य भावना माझ्यात उपजतच आहे, तशीच मी सर्वांबद्दल ठेवणे शक्य नाही का?
स्त्रियांच्या समस्यांवर व त्यांच्या शिक्षणासाठी कार्य करणारे कित्येक समाजसुधारक होऊन गेले व आजही कार्यरत आहेत. आपण त्या सर्वांचे सदैव ऋणी आहोत. आपण सामान्य जनांचा तेवढा आवाका नसला तरी आपण सभोवतालची परिस्थिती बदलण्यास काय करू शकतो यावर विचारमंथन होणे आवश्यक आहे. आपल्या घरात, आपल्या कार्यक्षेत्रात व प्रभाव वर्तुळात आपण काय सकारात्मक बदल घडवून आणू शकतो व बुरसटलेल्या विचारपद्धतीचा त्याग करून मुलींच्या प्रतिभेला पोषक असे वातावरण निर्माण करू शकतो, हा विचार केला पाहिजे. प्रत्येकानेच एक पाऊल जरी या दिशेने उचलले तर समाजाची विचारपद्धती बदलायला वेळ लागणार नाही.
आजच्या काळात, सर्व क्षेत्रांमध्ये मुली आपलं प्रावीण्य सिद्ध करीत आहेत. असे एकही कार्यक्षेत्र नाही जिथे मुलींनी यशोगाथा लिहिली नाही. समाजाचा घटक म्हणून आपण मुलींच्या मार्गातले अडथळे दूर करून त्यांना प्रगतीचा मार्ग सुकर करण्यात कसे योगदान देऊ शकतो याचे आत्मपरीक्षण करण्याची आपल्या सर्वांना आज गरज आहे. ज्या दिवशी स्त्री जन्मापासून मरणापर्यंत स्वतःला समाजात सुरक्षित समजेल त्या दिवशी आपण देवीच्या उपासनेत सफल झालो, असे समजायचे. असा दिवस लवकर येवो, हीच त्या शक्तीरूपीणी देवीच्या चरणी प्रार्थना.
टीप ः लेखातली नावे काल्पनिक परंतु, घटना सत्य आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.