ravindra mirashi 
मुक्तपीठ

आराध्यवृक्ष कदंब

रवींद्र मिराशी

पश्‍चिम बंगालमध्ये भाद्रपदातील एकादशीला काही शेतकरी "कदंब उत्सव' साजरा करतात. या दिवशी कदंबाचे रोप लावून त्याची पूजा केली जाते. त्यानंतर सामूहिक नृत्य केले जाते. गाणी गाईली जातात.

"तोच चंद्रमा नभात' हे अतुल्य काव्य प्रतिभेने रचलेले व लोकप्रिय झालेले गाणे, शांता शेळके यांना "काव्य प्रकाश:' या ग्रंथातील एका श्‍लोकावरून स्फुरले. संस्कृत कवी मम्मटाचार्य यांनी बाराव्या शतकात लिहिलेला हा ग्रंथ काव्य क्षेत्रात युगप्रवर्तक ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात अस्फुट अलंकाराचे उदाहरण देण्यासाठी शिलाभट्टारिका यांचा एक श्‍लोक घेतला आहे. त्याचा मराठी अर्थ असा होऊ शकेल, "चैत्रातल्या रात्री त्याच आहेत, रेवा नदीचा काठ तोच आहे, कदंब वृक्षावरून येणारे वारे, मधुमालतीचा कुंज सारे तेच आहे, मीही तीच आहे. मात्र तरीही आज काहीतरी कमी वाटतेय, अनामिक हुरहूर लागली आहे...' हा अर्थ समजल्यापासून मला कदंब वृक्षाबद्दल कुतूहल निर्माण झाले. या वृक्षाबद्दल अनेक ठिकाणांहून मी बरीच माहिती केवळ छंद म्हणून गोळा केली होती. सातारा येथील आमच्या कंपनीच्या विस्तीर्ण परिसरात या कदंब वृक्षाचे मला अचानक दर्शन झाले, या घटनेने मला खूप आनंद झाला. कदंब वृक्षामध्ये देव-देवतांचे अस्तित्व असते, असे देखील मानले जाते.

हा वृक्ष पावसाळ्यात फुलणारा आहे. पुराण काळात यमुनेच्या काठी कदंबवने होती. गोपाळांच्या गाई वृंदावनात चरत, तर श्रीकृष्ण कदंब वृक्षावर बसूनच बासरी वाजवत, असे संदर्भ जुन्या ग्रंथांत आहेत. या वृक्षावर बहरणारी सोनेरी-केशरी रंगाची थोडी टणक असणारी गेंदेदार फुले, गोपाळ जणू चेंडू म्हणून खेळण्यास वापरत. पश्‍चिम बंगालमध्ये भाद्रपदातील एकादशीला काही शेतकऱ्यांमध्ये कदंब उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. या दिवशी कदंबाचे रोप लावून त्याची पूजा केल्यावर नृत्य-गाणी गात हा दिवस साजरा केला जातो. कदंबाच्या पूजेने सुख-समृद्धी प्राप्त होते, ही त्या मागील भावना. म्हणूनच कदंबाचे संस्कृत नाव "शिशुपाल' आणि "हलीप्रिय' असेही आहे. मथुरा-वृंदावन ही स्थळे कदंबवनासाठी पूर्वी प्रसिद्ध होती. मदुराईलाही कदंबवने होती. मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिराचे स्थलवृक्ष कदंबच आहे. वीस ते पंचवीस मीटरपर्यंत उंच वाढणारा हा वृक्ष दीर्घायुषी आहे. हिरव्यागार आणि तुकतुकीत रुंद पानावरील शिरा ठसठशीत व दोन्ही बाजूंना समांतर असतात. दोन समांतर शिरांमध्ये एकसारख्या उभ्या समांतर उप-शिरा असतात. यामुळे याची फूल व पाने निसर्गप्रेमींना मोहित करतात.

भवानी शंकर पंडितांच्या "कदंब तरूला बांधून दोला, उंच खालती झोल'ने जसा मराठी मनात कदंब रुजवला, तसाच हिंदी कवयित्री सुभद्रा कुमारी चव्हाण यांच्या, "यह कदंब का पेड' कवितेतल्या "यह कदंब का पेड अगर मॉं होता यमुना तीरे, मैं भी उस पर बैठ कन्हैया बनता धीरे धीरे' काल्पनिक कदंब वृक्षावर बसून मुलींनी आईशी केलेल्या अत्यंत निरागस आणि मार्मिक संवादाने हिंदी वाचकांच्या मनात कदंब वृक्षाचे स्थान कायम ठेवले. शंकराचार्यानी "त्रिपुरसुंदरीस्तोत्रम'मध्ये "ललितामहात्रिपुरसुंदरी'च्या सगुण स्वरूपाचे सुंदर वर्णन केले आहे, त्यात अनेक वेळा कदंब वृक्षाचा उल्लेख आढळतो.

केवळ साहित्यात आणि उत्तर भारतातील लोककथांमध्येच नव्हे, तर दक्षिणेतही कदंब आहे, तसाच उत्सवातही! कोल्हापूरच्या वनक्षेत्राला "कादंबिनी' असे नाव आहे. ढगांचा गडगडाट ऐकल्यावरच कदंब फुलतो, अशी दंतकथादेखील आहे. कदंबवनातून वाहणाऱ्या सुवासिक वाऱ्याला "कदंबनीला' म्हणतात. तर फुललेल्या कदंबाच्या खाली गोळा होणाऱ्या पाण्याला 'कदंबरा' म्हणतात. पावसाळ्यात इतर फुलांचे दुर्भिक्ष असल्याने मधमाश्‍या हमखास कदंबाच्या फुलाच्या शोधात असतात. या वृक्षाचा बीजप्रसार वटवाघळांमार्फत होतो असे आढळले आहे. किंचितशा आंबट असलेल्या या फळांचा औषधी उपयोगही आहे. पोटाच्या तक्रारींसाठी यांचा रस देतात. जखमांवर पानांचा रस तर, खोडाचा काढा सर्दी-खोकल्यावर औषधाचे काम करतो. स्वर्गलोकात अमृत प्राशन करून गरुड पृथ्वीवर परतत असताना या वृक्षावर बसला होता आणि तेव्हा चोचीतले काही अमृताचे थेंब या वृक्षावर पडले, अशी लोकश्रद्धा आहे.

कदंब हा 'शततारका' नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. चंद्राची पृथ्वीभोवतीची एक प्रदक्षिणा सत्तावीस दिवस आठ तासात पूर्ण होते. यावरून चंद्राच्या भ्रमणमार्गाचे सत्तावीस भाग केले गेले. या प्रत्येक भागाला आपण नक्षत्र म्हणून ओळखतो. थोडक्‍यात, चंद्राच्या प्रवासातील वाटेत लागणारी अवकाशातील ही गावे म्हणता येतील. भारतीय पंचागानुसार, ज्या नक्षत्रावर माणसाचा जन्म होतो ते त्याचे जन्म नक्षत्र होय. विशिष्ट नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीसाठी विशिष्ट वृक्षाची आराधना ही फलदायी होते असे मानले जाते. मात्र याचे शास्त्रीय स्पष्टीकरण मिळत नाही. हा वृक्ष महाराष्ट्रात, विशेषतः कोकण भागात आढळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

Sharad Pawar : पवार, मुंडे यांनी बीडमधील राष्ट्रवादीतील कलह मिटवला, महायुतीच्या क्षीरसागरांना मिळाले समर्थन

Pune Crime News: पाकिटावर लिहिलं ५० हजार रुपये! आतमध्ये निघाली कागदं; पुण्यात पोलिस असल्याचा बनाव करुन सराफाची फसवणूक

SCROLL FOR NEXT