seagull 
मुक्तपीठ

एक होता जोनाथन

डॉ. अनुपमा साठे

जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल नावाच्या एका समुद्री पक्ष्याची ही गोष्ट आहे. हा पक्षी आपल्या कुटुंब व मित्रांसमवेत समुद्र किनाऱ्यावर राहायचा. हे समुद्री पक्षी फार लांब किंवा फार उंच उडत नाही. समुद्रालगत मिळणारे किंवा मासेमाऱ्यांचा बोटींवर पडलेले अन्न वा माश्यांचे तुकडे यावर ते आपली भूक भागवतात.

जोनाथनच्या थव्यातले पक्षी पण याहून काही वेगळे नव्हते. परंतु, जोनाथन नेहमी अस्वस्थ असायचा. त्याला वाटे, केवळ पोट भरणं आणि फक्त तेवढ्यापुरत्याच हालचाली करणं अशा जगण्याला काही अर्थ नाही. म्हणून तो एकटाच रोज उंच व लांब उडण्याचा सराव करायचा. पण, हे सोपं नव्हतं.

अनेक वेळा त्याच्या पंखांना इजा होई. कित्येक वेळा तो उंचावरून खाली पडे आणि अशा वेळेस त्याचा धीर सुटे. देवाच्या मनात असतं की मी वेगाने उडावं तर त्याने मला ससाण्यासारखे पंख दिले असते. लांब उडायला माझ्या मेंदूला दिशा व अंतर कळायची क्षमता दिली असती. हे सर्व नसताना माझ्या मनात हे विचार येतात, नक्कीच मी वेडा आहे, असं त्याच्या मनात येई व तो परत आपल्या कळपात मिळून मिसळून राहायचा प्रयत्न करे. तरीही त्याचा अस्वस्थपणा यत्किंचित कमी न होता वाढतंच जायचा व तो परत सराव करायला सुरुवात करायचा.

फार कठीण ध्येय होतं. परंतु, तो काही डगमगला नाही. एके दिवशी त्याला अचानक लक्षात आलं की जे त्याला हवं होतं ते तो सहजपणे करू शकतो आहे! त्याचा आनंद गगनात मावेना! तो मोठ्या उत्साहाने आपल्या कळपात सांगायला आला की आता आपण सर्व या क्षुद्र जगण्यातून मुक्त होऊ शकतो व त्याला मार्ग सापडला आहे. मात्र, त्याला कळतं की असामान्य वागण्यामुळे त्याला कळपातून बहिष्कृत करण्यात आलं आहे. तरी पण तो एकटाच आपली साधना सुरू ठेवतो.

एक दिवस उंच उडत असताना त्याला आपल्या शेजारी दोन अन्य पक्षी उडताना दिसतात. आपल्यासारखा विचार करणारे आणखी कुणी आहेत हे बघून त्याला अत्यंत आनंद होतो. ते जोनाथनला सांगतात की तो साधनेच्या पुढच्या पायरीसाठी तयार आहे व ते त्याला आपल्या गुरूंच्या सांगण्यावरून घ्यायला आले आहेत.

जोनाथन त्यांचाबरोबर ज्या जगात जातो ते त्याला स्वर्गासमान भासते. त्याचे साथीदार त्याला सांगतात की हे जग फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांची आध्यात्मिक पातळी उंच आहे व ज्यांना आत्मज्ञान प्राप्त करायची तीव्र इच्छा आहे. या जगात येण्याकरिता पुष्कळ जन्म घ्यावे लागतात. परंतु, जोनाथनच्या साधनेमुळे त्याला एकाच जन्मात हे शक्य झालं. त्याचे गुरू त्याला विद्या पारंगत करतात व त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते. आता त्याला गुरुपदावर नेमून त्याचे गुरू अंतर्धान पावतात.

त्याला आपल्या जगाची खूप आठवण येत असल्यामुळे तो आपल्या काही निवडक शिष्यांना घेऊन आपल्या थव्याकडे परत जातो. आता त्याची विद्या व शिष्यांकडे बघून काही पक्षी त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याचं शिष्यत्व स्वीकारतात. त्यांना असं वाटतं की जोनाथन त्यांच्यासारखा साधा पक्षी नाही व त्याच्याकडे असामान्य सिद्धी आहेत. जोनाथन त्यांना समजवून सांगतो की तो असामान्य नाही. प्रयत्न केले तर सर्वांना ही सिद्धी प्राप्त होऊ शकते.

त्याच्या शिकवणीमुळे काही पक्ष्यांना थोड्या वा अधिक प्रमाणात सिद्धी प्राप्त पण होऊ लागतात. तो काय बोलतो, कसा वागतो, याचं अनुकरण बरेच पक्षी करू लागतात. आपल्या काही शिष्यांना आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर जोनाथन त्यांच्यापैकी एका शिष्याला मुख्यपद देऊन निघून जातो. आपल्या मुख्य शिष्याला जबाबदारी सोपवताना तो निक्षून सांगतो की त्याची शिकवण पुढे चालू राहिली पाहिजे व त्याला देवत्व मिळायला नको. सर्वांना ही जाणीव पाहिजे की तो पण सामान्य पक्षीच होता व प्रयत्नाने मोठा झाला.

तो गेल्यानंतर त्याचे काही शिष्य वगळता बाकी पक्षी प्रयत्न सोडून केवळ त्याचे गुणगान करीत राहिले. काही दिवसांनी त्याच्या नावाने एक स्मारक उभारण्यात आलं व कालांतराने तेथे जत्रा भरायला लागली. त्याच्या पट्टशिष्यांना दु:ख होत असे. ते सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करत की उपासनेपेक्षा अनुकरण केलं तर जोनाथनचा उद्देश्य सफल होईल. परंतु, स्थिती त्यांच्याही हाता बाहेर जाते. काही वर्षांनी अशी वेळ येते की जोनाथनची जागा फक्त देवळात राहते व त्यानी दिलेली विद्या कुणालाच माहीत नसते. अशाच एका जत्रेत एक छोटा पक्षी देवळातले पुजारी जोनाथनची असामान्य सिद्धी सांगत असताना त्यांना विचारतो, या सगळ्या कल्पनेतल्या गोष्टी आहेत न ? असं कसं शक्य आहे? आणि जर हे
खरं आहे तर तुम्हाला का त्यांच्या सारखं उडता येत नाही? पुजाऱ्याजवळ या प्रश्नाचं उत्तर नव्हतं.

उत्तर तर आपल्याकडे पण नाही. आपण बुद्धाची मूर्ती दिवाणखान्यात ठेवतो, महात्मा गांधींची तसबीर आपल्या कचेरीच्या भिंतीवर लावतो व रामाची मूर्ती देवळात ठेवून त्याची पूजा करतो. आदर्श म्हणून त्यांचा सन्मान करतो. परंतु, त्यांनी आपल्या समोर ठेवलेल्या आदर्शांचे आचरण करणे आपल्यासाठी फार कठीण आहे. त्यांनी घेतली तेवढी मेहनत घेण्याची, त्यांनी केले तेवढे त्याग करण्याची आपली तयारी नाही. प्रत्येक शहरात शिवाजी महाराजांच्या नावावर रस्ते, चौक व बाजार आहेत पण त्यांच्यासारखा ताठ कणा आपला का नाही? वेद, पुराण, भगवत् गीता हे सर्व ज्ञानांचे भांडार आपल्याकडे आहेत. परंतु, आपण ते वाचून त्यानुसार जीवन पद्धतींचा अवलंब करत नाही कारण आपण त्यांना पूजेत ठेवतो, आचरणात आणत नाही.

रिचर्ड बाख यांनी ही लघुकादंबरी, ‘जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल’ १९७० मधे लिहिली होती. त्यावेळी ही कादंबरी खूप गाजली व १९७२-७३ मध्ये सर्वाधिक खप झाल्याचा विक्रम तिच्या नावे नोंदवला गेला. परंतु, यात चौथा परिच्छेद त्यांनी २०१४ मध्ये समाविष्ट केला. यात शेवटी एक पक्षी असा आहे, ज्याच्या मनात जोनाथन सारखेच प्रश्न येतात व तो जोनाथनने दाखविलेल्या मार्गाचे अनुसरण करतो. रिचर्ड बाख हे उत्तम वैमानिक होते व या पुस्तकात त्यांनी पक्षी व त्यांचा उड्डाणाशी संबंधित माहिती अतिशय रोचक पद्धतीने दिली आहे. रसेल मनसन यांनी काढलेले छायाचित्र तिची शोभा अधिकच वाढवतात. ही कादंबरी तेव्हा जेवढी प्रासंगिक होती, तेवढीच आज पण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

Vinod Tawde Video: ''हितेंद्र ठाकूर यांनी मला गाडीमध्ये सगळं सांगितलंय'' भाजप नेत्याने टीप दिल्याच्या आरोपावर तावडे स्पष्टच बोलले

यंदा 70 टक्क्यांहून अधिक होईल मतदान! 2014 मध्ये 10.49 लाख तर 2019 मध्ये 12.16 लाख मतदारांनी केले नाही मतदान; 5 वर्षांत सोलापुरात वाढले 4.14 लाख मतदार

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Live Updates : तावडे प्रकरणात पोलिसांनी चौथा एफआयआर नोंदवला

SCROLL FOR NEXT