मुक्तपीठ

भाऊंचे ‘कदम’

वैशाली पंडित

खाद्या माणसाने आपल्याला मदत करून दिलासा दिला तर त्याच्याबद्दल कृतज्ञता वाटत राहते. ती व्यक्त झाली तरच आपले भाव त्या व्यक्तीपर्यंत पोचतील. त्या व्यक्तीची तशी अजिबात अपेक्षा नसतेसुद्धा, पण ते व्यक्त करणं ही आपलीही भावनिक गरज असते.

आज मला अशाच एका व्यक्तीबद्दलची माझी कृतज्ञता जाहीररित्या व्यक्त करावीशी वाटते आहे. ती व्यक्ती कोण? हे ओघात येईलच.

माझा नातू सैनू.
यंदा अकरावीला आहे. वय वर्ष सतरा. धड लहानात जमा नाही, धड मोठ्यात गणना नाही. कंठ, मिसरूड फुटू पाहतेय. तशी मतंही फुटतायत दहा बाजूंनी. पूर्वी काही सांगितलं तर ऐकायचा. ही त्यानंच आम्हाला लावलेली सवय. पण आताशी स्वारी वाद घालू लागली आहे. आर्ग्युमेंटस व्हायला लागली आहेत. आता पूर्वीसारखं आई-आजीच्या पदराला लोंबकळणं बंद झालंय. डोळ्यात पाणी आलं तरी ते दाखवण्यात कमीपणा वाटतो आहे. आरश्‍यासमोर उभं राहणं वाढलं आहे.

आम्हाला हल्ली सारखं जाणवू लागलं होतं की हा गप्प गप्प असतो. मनातलं पूर्वीसारखं घडाघडा बोलत नाही. रागावलं तर धुमसत राहतो. कॉलेजलाईफ तर नुकतंच सुरू झालं आहे. तरी हे ज्युनियर कॉलेज. अजून युनिफॉर्म आणि शिस्त त्यांच्या कॉलेजमध्ये शाळेसारखीच आहे. घरून एस्टीने जावं लागतं. प्रवासाचा ताण असेल का? त्रास असेल का? की कॉलेजमध्ये सिनियर्सकडून काही रॅंगिंगसारखे प्रकार?...

आम्हाला समजेना. त्याची आई, मी, आणि आजोबा, सगळे शिक्षकी पेशातले. आम्ही हरत-हेने त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. पण तो मोकळा होईना. त्याच्या वडिलांशी, म्हणजे माझ्या मुलाशी त्याचं नातं जवळिकीचं आहे, पण त्याच्याशीही तो बोलत नव्हता. घुमा घुमा होता. एकटा एकटा रहायला लागला. नर्व्हस दिसायला लागला.

मोबाईल त्याच्याजवळही आहे. त्याचा मोबाईल त्याच्या मम्मीने चेक केला. त्यातही आक्षेपार्ह असं काहीच आढळलं नाही.
आम्हाला काहीच कळेना. लहानपणापासून तो आमचा केंद्रबिंदू आहे. तो आजारी तर घरदार आजारी, अशी गत. घरात सगळ्यात जास्त तो माझ्या अंगाखांद्यावर वाढला. आज्जू आज्जू करत माझ्या मागे मागे फिरणारा माझा सैनू, असा का कुढतोय, ते समजत नव्हतं.

शेवटी एकदा दुपारची जेवणं झाल्यावर आम्ही दोघंच घरात असताना मी सहज विषय काढला.
‘सैनू, आजुबाजूला कित्ती माणसं असली ना, तरी आपल्याला बोलायला आपलं माणूसच लागतं नाही रे?’
‘म्हणजे?’
‘म्हणजे बघ ना, मला तुझ्याशी बोलायला कसं एकदम कंफर्टेबल वाटतं.’
‘थॅंक्‍यू.’
‘अरे थॅंक्‍यू काय? बरं, पण तू कोणाशी बोलताना कंफर्टेबल असतोस? कोणाशी बोलायला तुला जास्त जास्त आवडेल रे सोनू?’
माझं नाव त्यानं घ्यावं, अशी अपेक्षा नव्हतीच माझी. घरातलं कोणी... की सर, टीचर? मित्र, मैत्रीण?
मी अंदाज बांधू लागले.
मोठ्ठा पॉज!
...............
‘भाऊ कदम.’
‘क्‍क्‍कोण?’ मी ओरडलेच नकळत.
‘ओरडतेस काय? भाऊ कदम!’
‘अरे पण कोण भाऊ कदम?’
‘चला हवा येऊ दे मध्ये असतात ते. मला आवडतात. त्यांच्याशी बोलायला आवडेल मला. पण मला माहितीय, ते कशाला माझ्याशी बोलतील? त्यांना मी कुठे माहित असणार?’
माझी मती गुंग झाली. बोलती बंद झाली.

भाऊ कदम हे काही आमच्या नात्यापरिचयातले नव्हेत, की त्यांचा सहवास त्याला घडला आणि तो प्रभावित झाला. त्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या काळ्या रंगावरून त्यांच्यावर केले जाणारे विनोद प्रेक्षक म्हणून आम्हाला आवडतही नाहीत. चेहरा निरागस आहे त्यांचा. पण सैनूएवढ्या सतरा वर्षाच्या पोराला त्यांच्यात काय एवढं कंफर्टेबल वाटावं? एक अभिनेता, त्यातही मराठी अभिनेता, ठीक आहे ना... याला एवढं काय..

सैनूला बोलतं करणं, मोकळं करणं तर गरजेचं आहे..
आमचे मित्र नंदू पाटील. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत मोरोपंतांची भूमिका करत होते. त्यांना मी फोन केला. 
भाऊ कदम यांचा फोननंबर त्यांच्याकडे आहे का विचारलं. आमच्यासमोरची समस्या सांगितली. नंदूभय्यांनी आपुलकीने दहा मिनिटात मला नंबर पाठवला.
मी भाऊ कदम यांच्या वॉटस्‌ॲपवर मेसेज पाठवला. सैनूची इच्छा आणि सध्याचं त्याचं वागणं सांगितलं. तुमचं नाव त्यानं घेतल्यानं आश्‍चर्य वाटल्याचंही लिहिलं. पण तुम्ही त्याच्याशी बोलू शकलात तर तो मोकळा होईल, असं म्हटलं.
खरंतर मी हे लिहिताना प्रचंड संकोचले होते. भाऊ कदम कुठे? आपण कुठे? ते कशाला दाद-दखल घेतील या मेसेजची? त्यांचे कित्ती फॅन असतील... केवढे ढीगभर मेसेज असतील... छेः! आपणपण वेडपटच आहोत.

मी सैनूच्या नकळत हा कारभार केलेला होता. विश्वास बसणार नाही, पण...
मी मेसेज केल्याच्या पंधराव्या मिनिटाला मला भाऊ कदम यांचा फोन आला.
‘नमस्कार. मी भाऊ कदम बोलतोय.’
‘अरे, नमस्कार... नमस्कार...’ माझी धांदलच उडाली.
‘तुमचा मेसेज वाचला. तातडी लक्षात आली म्हणून फोन केला. आहे का सैनू तिथे? द्या त्याला. आणि काळजी नका करू. मी बोलतो त्याच्याशी.’
मी थक्क होत फोन सैनूच्या हातात दिला.
‘सरप्राईझ!’ म्हटलं.
सैनूने फोन कानाला लावला आणि... चित्कारलाच!
‘भाऊ कदम काका? तुम्ही?’
माझ्यासमोर बोलायला संकोच वाटून स्वारी जिन्यात मोबाईलसह पळाली.
अर्धा तास भाऊ कदम त्याच्याशी बोलत होते.
बोलणं संपवून सैनू आला तेव्हा डोळे खुषीने लकाकत होते. 
‘काय सॉलिड आहेत गं भाऊकाका!’
काय बोलणं झालं ते मी विचारलंही नाही. त्याचा आनंद मला मोलाचा वाटला. उत्सुकता होतीच.
पण साधारण तासाभराने परत भाऊंचा मला मेसेज आला.
‘बोलता येईल का? सैनू आसपास नसावा.’
मी लगेच फोन केला.
‘काळजी करू नका. तो नॉर्मल आहे. कॉलेजमधल्या मित्रांच्या चर्चेतून करियरबद्दल टेन्शन आलंय, एवढंच! त्याला मीच का आवडलो, हे मलाही नाही कळलं. पण भारी वाटलं. माझी मुलगीही याच वयाची आहे. मी ठेवीन त्याच्याशी संपर्क, या वयात होतंच असं कधीतरी.’

मी अवाक्‌. इतका व्यस्त अभिनेता. सामान्य प्रेक्षकाची... त्यातून पोरासोराची इतकी आत्मियतेनं दखल घेतो, संवाद साधतो, हा अनुभव... खरंच त्यांचे ‘कदम’ जमिनीवर आहेत!
‘आज्जू, भाऊकाका म्हणाले की अभ्यासावर फोकस कर. मला हॉटेल मॅनेजमेंट करायचंय ऐकल्यावर ते म्हणाले, मित्रा, मुंबईत आलास की माहिती देईन सगळी. माझ्या मुलीसाठी मी घेतली होती. किती ग्रेट ना?’ सैनू बोलत होता... बोलू लागला होता.
आता त्याच्या मनातलं तो सांगेलच. मला... आजोबांना... मम्मीला... डॅडीला... कोणालाही... पाणी वाहतं तर झालं!
हे वाहतं करायला भाऊ कदम यांची जी मदत झाली आहे, त्याचं ऋण शब्दात मांडता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT