bjp 
मुंबई

भाजपच्या प्रचाराचा नारळ 10 डिसेंबरला? 

मृणालिनी नानिवडेकर - सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - नगरपालिका आणि नगरपंचायतीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 10 डिसेंबरला मुंबईतील महत्त्वाकांक्षी मेट्रो 2 ब आणि मेट्रो 4 प्रकल्पांचे भूमिपूजन करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. पंतप्रधानांची वेळ मिळाल्यास बांद्रा-कुर्ला संकुलात जाहीर सभेत हे भूमिपूजन होईल. या कार्यक्रमात भाजपतर्फे मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळच वाढवला जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे. 

महाराष्ट्रात मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर मुंबई महापालिकेत शिवसेनेशी युती करायची की नाही, याचा निर्णय यशाचे शिल्पकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवला गेला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज एका मंचावर येऊन महापालिका निवडणुकीसाठी प्रथमच युतीची तयारी दर्शवली आहे; मात्र ते भाजपला किती जागा सोडतात यावर युतीचे भवितव्य असेल. नोटाबंदीवर शिवसेनेने प्रथम टीका आणि नंतर सामोपचाराचे धोरण अवलंबल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा युतीस हिरवा झेंडा दाखवतील काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जात असतानाच शिवसेनेने वादाचा विषय ठरवलेल्या मेट्रो 3 प्रकल्पाला 10 तारखेच्या उद्‌घाटन समारंभापासून दूर ठेवण्यात आले आहे. मेट्रो चारमध्ये ठाणेचाही समावेश असल्याने पंतप्रधानांच्या कार्यक्रमात त्याच्या भूमिपूजनाचा बार उडवून देण्यात येईल. 

भूमिपूजन समारंभात पंतप्रधान मोदी मुंबईच्या विकासाच्या प्रकल्पांबद्दल सविस्तर माहिती देतील. महापालिका निवडणुकीसाठी मोदी सभा घेतील, असे भाजपच्या एका गटातर्फे सांगण्यात येत होते; मात्र मुख्यमंत्री फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी त्याला दुजोरा दिला नव्हता. महापालिकेसाठी पंतप्रधानांनी सभा घ्यावी, हे अयोग्य असल्याने आता बांद्रा-कुर्ला संकुलात होणाऱ्या भूमिपूजन समारंभाच्या निमित्तानेच प्रचाराचा नारळ अनौपचारिकपणे वाढवण्यात येणार असल्याचे मानले जाते. कुलाबा ते सीप्झ या तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोला शिवसेनेने विविध कारणांनी विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी भूमिपूजन समारंभापासून वादाला दूर ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील सोहार्दाचे संबंध लक्षात घेता मुंबई पालिका निवडणुकीत वाद टाळण्याकडेच दोन्ही नेत्यांचा कल असेल, असे राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. 

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची आचारसंहिता डिसेंबरच्या अखेरच्या किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लागू होण्याची शक्‍यता आहे. त्यापूर्वी मेट्रोच्या भूमिपूजनाचा समारंभ व्हावा यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील होते. नगरपालिका निवडणुकांमुळे तो मुहूर्त साधता आला नव्हता. आता नगरपालिका विजयाच्या पार्श्‍वभूमीवर हा कार्यक्रम होणार आहे. एमयूटीपी 3च्या प्रलंबित प्रकल्पालाही आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली हे विशेष. 

आग्रह आणि चिंताही 
नगरपालिकांतील विजय ताजा असतानाच पंतप्रधान मोदी यांनी मुंबईत यावे, असा महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा आग्रह आहे. मोदींनी मुंबईतील मेट्रो भूमिपूजनाला येणे आवश्‍यक असल्याचे भाजप नेत्यांनी दिल्लीतील नेत्यांना कळवले आहे. ते आले तर मुंबईतील प्रचाराचा नारळच वाढवला जाईल, असे मानले जाते. नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर मोदींनी मुंबईत केव्हा यावे, यावर खल सुरू आहे. त्यांच्या कार्यक्रमावर असंतोषाचे सावट तर पडणार नाही ना, याची पडताळणी केली जात आहे. 

मेट्रोचे जाळे 
मेट्रो 2 ब आणि मेट्रो 4 प्रकल्पांना राज्य मंत्रिमंडळाने सप्टेंबरअखेरीस मंजुरी दिली आहे. मेट्रो 2 बमध्ये डीएननगर अंधेरी ते पूर्व उपनगरातील मंडाला अशा 22 स्थानकांचा समावेश आहे. मेट्रो चार हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो. वडाळा ते कासारवडवली मेट्रोमुळे ठाणे मुंबई मेट्रोला जोडले जाणार आहे. या मार्गावर 32 स्थानके असतील. मेट्रो 2 ब 23.5 किलोमीटरची असून, ती उभारण्यासाठी 10 हजार 986 कोटींची गरज असेल. मेट्रो 4 चा मार्ग 32.32 किलोमीटरचा असेल. त्यासाठी 14 हजार 459 कोटी उभारण्यात येणार आहेत. हे दोन्ही प्रकल्प 2021मध्ये पूर्ण होतील, अशी आशा आहे. या प्रकल्पांना जागतिक बॅंक किंवा जपानची जायका बॅंक निधी देण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT