डोंबिवली - शरद पवार यांच्यासारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांना असे म्हणणे फारच दुर्दैवी आहे. बाहेरचे लोक आपल्या राज्यात येतात आणि आपल्यालाच नकली शिवसेना, भटकती आत्मा असे बोलतात. महाराष्ट्राला ही शिकवण देणार का ?
बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे ? असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्रात भाजपला स्थान मिळणार नाही त्यांच्या मित्र पक्षाला देखील स्थान मिळणार नाही असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना खडे बोल सुनावले आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार वैशाली दरेकर यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याअगोदर महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली. या रॅलीत युवा नेते आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर वरील टीका केली.
पुण्यातल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भटकती आत्मा असा उल्लेख करत शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं होतं. पंतप्रधान मोदींच्या या टीकेचा प्रतिवाद अनेक नेत्यांनी केला आहे. शरद पवार गटाच्या नेत्यांनी जशास तशी उत्तरं दिली आहेत.
पण, आता ठाकरे पक्षाचे युवा सेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार सारख्या नेत्याला जे राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत, त्यांना असे भटकती आत्मा वगैरे म्हणणे फारच दुर्दैवी असल्याचे, आदित्य ठाकरे म्हणाले.
हे बाहेरचे लोक आपल्या राज्यात येतात आणि आपल्यालाच नकली शिवसेना, भटकती आत्मा बोलतात. कोण आहेत हे लोक? आपल्याला हे सांगणारे कोण आहेत? असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सुनावले आहे.
देशभरात भाजपाच्या विरोधकांवर ईडी-सीबीआयचा प्रयोग केला जात आहे. ईडी, सीबीआय या भाजपाच्या शाखा आहेत. निवडणूक आयोगही डोळे बंद करुन बसले आहे. भाजपाला आपला पराभव दिसू लागला की ते धार्मिक मुद्यांवर बोलायला सुरुवात करतात.
परंतु, यावेळी जनता त्यांना निवडून देणार नाही. शिंदे गट आणि भाजपाच्या मित्र पक्षांना जनता उभं करणार नाही, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले.या मतदारसंघातून आम्ही एक सर्वसाधारण नागरिक उमेदवार म्हणून दिला आहे.
महाविकास आघाडी ही जनतेच्या हिताचे बोलत आली आहे, महाराष्ट्र हिताचे बोलत राहू. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये का पाठवले ? महाराष्ट्राचा विकास दोन वर्षे रखडलेला असल्याची टिका करत त्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी एकट्याने किंवा पूर्ण खात्याने येऊन आपल्याशी डिबेट करण्याचे आव्हान आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.
या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावीत. मात्र तसं करण्याची त्यांची हिंमत नाही. मग अशा वेळी काही चिंधीचोरांना पुढे करून बोलायला लावलं जातं असा घणाघात करत आदित्य यांनी शिंदे पिता पुत्राला फटकारलं.
तर जेव्हा जेव्हा भाजप मागे पडायला लागते, तेव्हा हिंदू मुस्लिम असे विषय घेऊन आपल्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्र म्हणून आम्ही सगळे एकत्रित आहोत, महाराष्ट्र हिताचे आज जर आम्ही बोललो नाही तर महाराष्ट्राचे मंत्रालय सुद्धा भाजपा गुजरातला नेऊन ठेवेल अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.