मुंबई

आधीच्य़ा मोठ्या अपघातातून सावरून कॅप्टन दीपक साठेंनी घेतली पुन्हा गगनभरारी; वाचा 'ती' प्रेरणादायी गोष्ट

कृष्ण जोशी


मुंबई ः कोझिकोड येथे काल झालेल्या विमान अपघातात हुतात्मा झालेल्या दीपक साठे यांनी भारतीय हवाईदलाचे माजी वैमानिक या आपल्या ब्रिदाला जागून प्रवाशांना वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. या जिगरबाज वैमानिकाचा वायूदलात असताना झालेल्या विमान अपघातातून पुनर्जन्मच झाला होता. मात्र काल अखेर ते काळाला चकवू शकले नाहीत. बहुसंख्य प्रवाशांना वाचवून त्यांनी आपले कर्तव्य पूर्ण केले. 36 वर्षांचा विमानोड्डाणांचा अनुभव असलेले मुंबईकर दीपक साठे हे अत्यंत कुशल वैमानिक होते. त्यांनी जीवनात जे काही केले ते सर्वोत्तम केले व आपल्या दोनही मुलांनाही तशीच शिकवण दिली. त्यांची दोनही मुले मुंबई आयआयटी मधून अभियंता झाली. त्यांचा एक मुलगा बंगलोरला तर दुसरा अमेरिकेत आहे. 

आपले वडील निवृत्त ब्रिगेडिअर वसंत साठे यांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांनीही सैन्यदलात दाखल होऊन देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. खडकवासल्याच्या नॅशनल डिफेन्स अकादमीतील टॉपर असलेल्या साठे यांनी नंतर हैदराबादच्या एअरफोर्स अकादमीतही तीच टॉपरची परंपरा कायम ठेवली. त्यांना स्वॉर्ड ऑफ ऑनरचा बहुमानही मिळाला होता. केवळ कामातच नव्हे तर स्क्वॅश, गोल्फ या खेळांतही त्यांनी प्रावीण्य मिळवून संघाचे कप्तानपदही भूषवले होते. 

1981 मध्ये हवाईदलात दाखल झाल्यावर त्यांनी मिग 21 विमानांचे सारथ्यही केले तसेच बंगलोरच्या एअरक्राफ्ट अँड सिस्टीम ट्रेनिंग एस्टॅब्लिशमध्येही विमानांच्या चाचण्या घेण्याचे कर्तव्य पार पाडले. हवेत भराऱ्या घेत असतानाही त्यांचे पाय सतत जमिनीवरच होते व त्यांची माणुसकीशी असलेली नाळ तुटली नव्हती याचा किस्सा त्यांचे जुने ज्येष्ठ सहकारी विंग कमांडर संदीप शर्मा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितला. तेव्हा हे सर्वजण अंबाला येथील सतराव्या स्वार्डनमध्ये होते. एकदा ती मंडळी दिल्लीहून भटिंडा येथे जात असताना वाटेत एका बसला अपघात झाल्याचे दिसले. लगेच साठे यांनी गाडी थांबवून जखमींना बाहेर काढून मदत करण्यास सुरुवात केली. जखमींची व्यवस्था लागल्यावरच हे पथक पुढे निघाले. 

हवाईदलात असतानाच 1990 मध्ये त्यांना विमानाचा मोठा अपघात झाला. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तब्बल सहा महिने रुग्णालयात रहावे लागले. त्यामुळे त्यांच्या कारकीर्दीवरही परिणाम होईल, अशी भीती निर्माण झाली होती. ते परत विमान चालवू शकणार नाहीत, असेच साऱ्यांना वाटू लागले. मात्र स्वभावाने आणि पेशाने जिद्दी असलेल्या साठे यांनी त्या आघातावरही मात केली व ते ठामपणे उभे राहिले. तीव्र इच्छाशक्ती व प्रचंड आवड यांच्या बळावर त्यांनी पुन्हा विमानोड्डाण करण्याचे ठरवले. तब्येत सुधारल्यावर त्यांनी पुन्हा तयारी करून विमानोड्डाणाची चाचणी दिली व त्यात यशस्वी झाल्यावर पुन्हा गगनभरारी घेतली. 

हवाईदलाच्या 21 वर्षांच्या सेवेत विंग कमांडर पदापर्यंत यश मिळविलेल्या साठे यांनी 2003 मध्ये स्वेच्छानिवृत्ती पत्करून दोन वर्षांत एअर इंडियात वैमानिकाची जबाबदारी स्वीकारली. तेथे त्यांनी एअरबस 310 तसेच बोईंग 737 या विमानांचे सारथ्यही कुशलपणे केले. ते सध्या चांदिवलीच्या नहार अमृतशक्ती या इमारतीत रहात होते. परिसरात तसेच सहकाऱ्यांमध्ये ते मनमिळावू आणि उत्साही म्हणून प्रसिद्ध होते. घरी असले की सकाळ-संध्याकाळ पत्नीबरोबर वॉक ला जाण्याचा पायंडा त्यांनी कधीच चुकवला नाही, असे त्यांचे शेजारी सांगतात. लॉकडाऊनदरम्यान त्यांना आठवड्यातून एक दोनदा विमानोड्डाणाची ड्यूटी होतीच. परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याच्या वंदे भारत मोहिमेत सहभागी असल्याबद्दल त्यांना प्रचंड अभिमान होता. लोकांच्या जिवाचे रक्षण करण्याचे सेनादलाचे ब्रिद त्यांनी अखेरपर्यंत सांभाळल्याची प्रतिक्रिया त्यांच्या मित्रांनी व्यक्त केली.

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT