मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिला आहे. राजकारणात धोका सहन करणारा कधीच भक्कम होऊ शकत नाही,’’ असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘ठाकरे यांना जमिनीवर आणण्याची वेळ आली’ असल्याचे म्हटले आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकतानाच शहा यांनी भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. गणेश दर्शनाच्या निमित्ताने अनेकांच्या भेटीगाठी घेत शहा यांनी मुंबई भाजपच्यावतीने जोरदार मोर्चेबांधणी केली.
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला सुरुंग लावल्यानंतर भाजपने आता मुंबई महापालिकेवर नेम धरला असून आगामी निवडणुकीत शिवसेनेकडची सत्ता हिसकावून घेण्याचा निर्धार पक्ष नेतृत्वाकडून करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा मुंबई दौरा महत्त्वपूर्ण मानला जातो. शहा यांनी ‘लालबागचा राजा’, वांद्र्यातील गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर ‘मेघदूत’ बंगल्यावर काही प्रमुख नेते, नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर विस्ताराने भाष्य केले.
युतीतील वितुष्टाचे खापर त्यांनी शिवसेना नेतृत्वावर फोडले. शहा म्हणाले, ‘‘ युती असताना ठाकरे यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला. जनमताचा त्यांनी अवमान केला आहे. राजकारणात धोका सहन करणारा घटक मजबूत होऊ शकत नाही. त्यामुळे ठाकरे यांना आता जमीन दाखवायची आहे. कोणी कानाखाली मारली; तर शरीराला लागते पण आपल्याच घरासमोर कानाखाली मारल्याचा आवाज हा अंतर्मनापर्यंत जातो ती वेळ आली आहे.’’
केवळ शिवसेनाच लक्ष्य
राज्यातील सत्तांतरानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पहिल्यांदाच मुंबईत आले होते. साहजिकच ते शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत काय बोलणार? याबाबत सगळ्यांनाच मोठी उत्सुकता होती. ठाकरे यांच्याविरोधात थेट रणशिंग फुंकून शहा यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांत उत्साह आणला. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही यानिमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
शिंदे शहांच्या सोबतीला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना आणि तीच आपल्यासोबत असल्याचा मुद्दा मांडून शहा यांनी थेट ठाकरेंवर निशाणा साधला. सध्या शिवसेना आणि शिंदे गटात पक्ष आणि संघटनेवरून न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्यावर थेटपणे बोलून शहा यांनी ठाकरे यांना डिवचले. शहा यांनी आज ‘लालबागच्या राजा’चे दर्शन घेतले तेव्हा त्यांनी मुद्दामहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोबत नेले होते. या माध्यमातून त्यांनी उद्धव ठाकरे यांना सूचक इशारा दिल्याचे मानले जाते. शहा यांनी लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन केले. तेव्हा त्यांच्यासोबत पत्नी सोनल शहा यांच्यासह सूनबाई आणि नातवंडेही होती.
अन्य विषयांवर चर्चा
मुंबईत रविवारी रात्री आलेले शहा हे सह्याद्री अतिथिगृहात मुक्कामासाठी होते. त्यानंतर सोमवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांसोबत त्यांनी ४० मिनिटे चर्चा केली. या बैठकीत नव्या सरकारची धोरणे, पुढील वाटचाल, राज्य सरकारचा कारभार, भाजप- शिंदे गटातील समझोता, दोघांची कार्यपद्धती, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
शिवसेना स्वकर्माने लहान झाली
विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत केवळ दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडली होती. आम्ही शिवसेनेला लहान केले नसून, ते त्यांच्या कर्माने लहान झाले आहेत. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भाजपने आपला विस्तार वाढविला आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता आता रस्त्यावर उतरायला हवा, असे शहा म्हणाले. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, नीतेश राणे आदी नेते उपस्थित होते.
शहा म्हणाले
धोका देणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे
महाराष्ट्रातील हिंदूविरोधी राजकारण संपवायचे आहे
राजकारणात कधीही धोका सहन करता कामा नये
भाजपचे उमेदवार पाडून शिवसेनेने खंजीर खुपसला
मुंबई महापालिकेतील दिडशे जागा जिंकायच्या आहेत
अमित शहा यांनी मुंबईवर बेगडी प्रेम दाखवायचे काम केले आहे. मुंबईचे महत्त्व कमी करून अहमदाबादला महत्त्व देण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. मुंबईतील अनेक कार्यालये दिल्लीला हलविली असती तर समजू शकलो असतो, मात्र ती अहमदाबादला हलविण्यात आली. मुंबई- दिल्ली बुलेट ट्रेन सुरू न करता दिल्ली- अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू केली. भाजपच्या ताब्यात अख्खा देश असताना त्यांना मुंबई कशासाठी हवी आहे?
- अंबादास दानवे, शिवसेना नेते
तुम्ही काय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जमीन दाखविणार? आम्ही तुम्हाला जमीन दाखवू. शिवसेना संपविण्याच्या भ्रमात राहू नका. शिवसेना संपणार नाही पण, तुम्ही संपाल. उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात झालेल्या बैठकीस मी हजर होतो. या बैठकीत पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद एका पक्षाला आणि दुसरे अडीच वर्षे ते दुसऱ्या पक्षाला मिळणार असे ठरले होते. आता शहा हे उद्धव ठाकरेंना खोटे म्हणत असतील तर ही चीड आणणारी बाब आहे.
- चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.