मुंबई : राज्य निवडणूक आयोग ठरवेल, त्याप्रमाणे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तारखा ठरतील; पण मुंबई शिवसेनेचीच असेल. मतपेटी पुन्हा तेच सांगेल, तसेच १५० जागा जिंकण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून किमान १२५ जागा निश्चितपणे जिंकू, असा विश्वास ज्येष्ठ शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री अनिल परब यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केला.
आगामी महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने नागरिकांच्या अपेक्षा, अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि भ्रष्टाचाराचे आरोप अशा प्रतिकूल परिस्थितीत शिवसेनेला पुन्हा विजय कसा मिळेल, याबाबत विचारताच परब म्हणाले, ‘‘बदनामी, आरोप, प्रत्यारोप सुरूच असतात; पण शिवसेनेबद्दल मुंबईकरांना आपलेपणा वाटतो. मुंबई महापालिका हद्दीतील प्रत्येकाला आपल्या माता-भगिनी शिवसेनेमुळे सुरक्षित असल्याचा विश्वास आहे. रुग्णवाहिका असो, की रक्तपुरवठा, कोणताही प्रश्न असेल, तर एका हाकेत शिवसैनिक मदतीला धावून येतात, याचा प्रत्येकाला विश्वास आहे.
कोविड काळात शिवसेनेने जनतेला सर्वतोपरीने मदत केली, लढण्याचे पाठबळ दिले, अन्नधान्य पुरवले, लसीकरणासाठी मदत केली. पिण्याचे पाणी, उद्याने अशा सुविधा मुंबईत उभ्या केल्याने मुंबईकरांचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे आम्ही १५० जागा जिंकण्याचे प्रयत्न सुरू असून किमान १२५ जागांवर शिवसेनेचा विजय होईल, असा विश्वास आहे.’’
ॲन्टी इन्कम्बन्सीचा मुद्दा नाही
आम्ही मुंबईत काही एकदाच निवडून आलेलो नाही. गेल्या २५ वर्षांपासून जनता आम्हाला पुन्हा पुन्हा निवडून देत आहे. याचा अर्थ त्यांना आम्ही त्यांचे वाटतो. त्यामुळे अॅन्टी इन्कम्बन्सीचा मुद्दाच नाही. तो एकदाच निवडून आलेल्यांना भेडसावणरा प्रश्न असेलही, आमचे तसे नाही. येत्या काही दिवसात शिवसेनेकडून निवडणुकीची व्यूहरचना निश्चित केली जाईल, असे परब यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील!
शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबईचे वास्तव ज्ञात आहेत. पर्यावरणमंत्री व पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे नियमितपणे मुंबईतील प्रकल्पांची पाहणी करत असतात. प्रत्येक छोट्या-मोठ्या बाबींकडे आदित्य ठाकरे यांचे लक्ष असते. मुंबईची नस ओळखणारे हे नेते महाराष्ट्रातील इतर महापालिका निवडणुकांचाही विचार करत आहेत. अन्य पक्षांशी आघाडी, जागावाटप तसेच इतर रणनीतींबाबत अंतिम निर्णय तेच घेतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.