Art Director Nitin Desai esakal
मुंबई

Nitin Desai Tribute : कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाबद्दल कलाकारांनी त्यांना वाहिली श्रद्धांजली..

अचानक सकाळी बातमी आली की नितीन देसाई ह्यांनी आत्महत्या केली आणि त्यानंतर काहीच सुचत नाहीये. कोणी तरी आपल्यातून निघून गेलं आहे. खूप मोठा धक्का आहे हा.

सकाळ वृत्तसेवा

सिद्धार्थ चांदेकर -

अचानक सकाळी बातमी आली की नितीन देसाई ह्यांनी आत्महत्या केली आणि त्यानंतर काहीच सुचत नाहीये. कोणी तरी आपल्यातून निघून गेलं आहे. खूप मोठा धक्का आहे हा. मी बालगंधर्व चित्रपटाच्या वेळेस त्यांच्या सोबत काम केलं होतं. त्यानंतर आमच्या चार ते पाच भेटी झाल्या. त्यानंतर आम्ही एकत्र काम केलं नाही.

पण जेव्हा बालगंधर्व या चित्रपटाला दहा वर्ष झाली तेव्हा आमचा एक झूम कॉल झाला. कायम ते नेहमी हसायचे, कायम छान बोलायचे, प्रत्येकाशी आपुलकीने वागायचे. ते असं करतील असं कधी वाटलं नव्हतं. त्यांच्या जाण्याने फक्त मराठी सिनेसृष्टी नाही तर सबंध हिंदी सिनेसृष्टी एक उत्तम कला दिग्दर्शक गमावला.

किशोर कदम -

नितीनने जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हापासून त्याची आणि माझी ओळख झाली होती. मी एका टेलीफिल्मसाठी काम करत होतो तेव्हा तिथे नितीन मला दिसला. तिथे माझा शर्ट त्याला आवडला म्हणून त्याला मी तो दिला आणि तिथून आमचा बाँडिंग सुरु झालं. आम्ही आता एका कार्यक्रमानिमित भेटलेलो.

आम्ही बालगंधर्व चित्रपट एकत्र केला. त्याच्यासाठी बालगंधर्व हा खूप महत्त्वपूर्ण चित्रपट होता. त्याने खूप डिटेलिंग केलं होतं आणि खूप अभ्यासपूर्ण त्याने तो सेट उभा केला होता. त्याने आम्हाला त्या काळात नेऊन ठेवलं होतं. खूप छान माणूस होता. खूप मज्जा यायची त्याच्यासोबत काम करायला.

रवी जाधव -

मी नितीन देसाई यांच्याबरोबर बालगंधर्व हा चित्रपट केला. आता त्यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्काच बसला. आम्हा सगळ्यांनाच हा धक्का आहे. कारण अत्यंत कणखर आणि धाडसी माणूस. त्यांनी असं काही पाऊल टाकावं...काहीच समजत नाही.

मी जेव्हा नोकरी करीत होतो तेव्हा एका मराठी माणसाने आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक स्टुडिओ बांधला आहे हे ऐकून मी खूप त्यांच्यावर प्रभावित झालो होतो. त्यांच्याबरोबर कधी काम करण्याची संधी मिळेल असे तेव्हा मला वाटले नव्हते. परंतु बालगंधर्व या चित्रपटाकरिता आम्ही एकत्र आलो. त्यावेळी मला त्यांची कलात्मक दृष्टी किती मोठी आहे याची प्रचीती आली.

अगदी बारीकसारीक गोष्टीमध्ये ते लक्ष घालायचे. बालगंधर्व चित्रपटाची प्रत्येक फ्रेम अगदी एखाद्या चित्रासारखी वाटते असे लोक म्हणतात. परंतु यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले होते की मी एक ऐतिहासिक वेबसीरीज करीत आहे.

तू करशील का... परंतु तेव्हा माझे मै अटल हूं या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. मी तसं त्यांना सांगितले. ते जेवढे कणखर होते तेवढेच ते हळवेखील होते. बालगंधर्व चित्रपटाची गाणी ऐकताना तसेच चित्रपटाच्या प्रमोशन्सच्या वेळीही त्यांच्या डोळ्यात पाणी यायचे. हिंदी व मराठीतील एक मोठा कलादिग्दर्शक आणि उद्योजक आपल्यातून निघून गेला आहे.

किशोरी शहाणे -

खूप धक्कादायक बातमी आहे. नितीनजी देसाई यांच्यासारखा धडाडीचा माणूस. त्याने असं पाऊल उचलणं खरंच खूप धक्कादायक आहे. खूप धडाडीचे होते ते. अनेक रिॲलिटी शोची त्यांनी निर्मिती केली. त्यांचे सेटस हॉलीवूड चित्रपटांच्या सेटसारखे असायचे आणि बॉलीवूडमध्ये इतकं मोठं नाव कमावलेला मराठी माणूस म्हणून त्यांचा आम्हाला खरंच खूप अभिमान होता.

खरंच ही बातमी ऐकून खूप धक्का बसला. असं काय झालं असेल की त्यांनी हा निर्णय घेतला असेल. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे ते अशा प्रकारे संपवणं हा त्यावर उपाय नाही.

मृणाल कुलकर्णी -

नितीन देसाई यांना विश्वकर्मा म्हटलं जायचं ते खरंच होतं. अत्यंत धडाडीचा माणूस होता आणि त्यांच्या बाबतीत हे ऐकायला लागतंय, खरोखरच खूप धक्कादायक आहे. एक अत्यंत यशस्वी कला दिग्दर्शक म्हणून आपल्याला जरी त्यांची ओळख असली तरी तितकाच चांगला व भावनाप्रधान असा माणूस होता. उत्तम व हुशार निर्माता.

मी त्यांच्या राजा शिवछत्रपती मालिकेमध्ये तेव्हा मला ते आपल्या कामावर किती कमालीचं लक्ष देतात हे जाणवलं. नंतर रमा माधव या चित्रपटाच्या निमित्ताने संपूर्ण चित्रपटाच्या प्रॉडक्शन डिझाईनचं काम त्यांनी सांभाळलं होतं. आमचे अत्यंत घरगुती असे संबंध होते. खूप दुःख झालेलं आहे त्यांच्या जाण्याने. त्यांनी हा निर्णय का घेतला असेल हे त्यांचं त्यांनाच माहिती.

पण अशा निर्णयापर्यंत ते पोहोचले हे खरोखरच खूप दुःखदायक आहे. ही कलाविश्वातील खूप मोठी हानी आहे. 2005 साली त्यांनी हा स्टुडिओ निर्माण केला. त्या काळामध्ये असं धाडस करणं हे सोपं काम नव्हतं. त्यांचं वेगळेपण त्यातच उठून दिसलं. त्या माणसाने कधीच छोटी स्वप्नं पाहिली नाहीत. कायम मोठी स्वप्नं पाहून पूर्ण करायचा ध्यास नितीनदादा घेत राहिले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देओ.

जयवंत वाडकर -

खूपच टॅलेंटेड माणूस,खूपच प्रगल्भ माणूस, पण मग आत्महत्या का करावी कळत नाही. कारण मी आत्महत्या करणाऱ्याच्या खूप विरोधात असतो. त्यांच्यावर खूप कर्ज होत म्हणून त्यांनी हे केलं असावं अशा बातम्या येत आहेत. मला नेमकं काही माहीत नाही. कारण मी शूटिंग करतोय. पण अतिशय मस्त माणूस. खूप छान. आमची आधीपासूनची ओळख आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् पासूनची आमची ओळख आहे. जे झालं ते खूप वाईट झालं. क्रिएटिव्हीमधला ग्रेट माणूस गेला असं मला म्हणायचं. पण खूप छान माणूस होता.

विजय पाटकर -

खूप वाईट झालं. आम्ही आर.राजकुमारसाठी एकत्र शूटिंग करत होतो. तेव्हा त्यांची इच्छा होती की फिल्मसिटीमधे खूप मोठा स्टुडिओ व्हावा. काही कारणांमुळे ते नाही होऊ शकलं. आता मी नुकताच आग्रा येथे गेलो तेव्हा अकबरचा महाल बघितला आणि तेव्हा मला इतक अप्रूप नाही वाटलं कारण त्याच्यासारखाच महल मी एन. डी. स्टुडिओत बघितलेला.

इतका जिवंत सेट त्यांनी उभारलेला. इतका कमालीचा कलादिग्दर्शन होत त्यांचं. एक उत्तम कला दिघदर्शक आपल्यातून निघून गेला ह्याच अत्यंत वाईट वाटतंय.

सुनील बर्वे -

अत्यंत दुर्दैवी घटना घडली. मी खरं तर बाहेर आहे. नक्की काय घडलं हे मला देखील माहिती नाही. पण मी जेव्हा ऐकलं तेव्हा मला शॉक बसला. इतका कमालीचा कलाकार होता तो, नक्की काय कारण असेल ते माहीत नाही. या अशा घटनांपासून कसं काय लोकांनी स्वतःला सावरावं ह्याचाच विचार सकाळपासून सतत मनात येतोय. कलादिग्दर्शक म्हणून संपूर्ण कलाविश्व त्याने काबीज केलं होतं.

आमची भेट खरं तर विनय आपटे यांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांवरील मालिका करायचं ठरवलं होतं तेव्हा नितीन तिथे सेट्सचं सर्व काम करत होता. तीच एक आठवण आहे. बाकी मी असं काम नाही केलं त्यांच्याबरोबर. पण त्यांच्याबद्दल अतोनात आदर होता. त्यांनी जे काही स्वप्न पाहिलं होता एन. डी. स्टुडिओबद्दल त्याबाबत कायम एक अभिमान वाटायचा. प्रत्येकाने काळजी घायला पाहिजे असं मला वाटतं.

सुशांत शेलार -

खूप मोठं नुकसान आहे संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीचं.मराठी माणूस ज्याच्याबद्दल आम्हा सर्वांना प्रचंड अभिमान होता. कोकणातला माणूस, गावाकडून येऊन एवढं स्वतःचं मोठं शून्यापासून विश्व निर्माण केलं. त्यांना जो काही मानसिक ताणतणाव होता, तो कधी त्यांच्या चेहऱ्यावर दिसला नाही. हे जे काही झालंय ते प्रचंड दुर्दैवी आहे.

मला त्यांच्या प्रोजेक्टमधे कधी काम नाही करता आलं. पण लालबागच्या राजाच्या वेळेस, नवरात्रोत्सवात किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सेट ते करायचे. नितीन देसाई म्हटलं की भव्य-दिव्य असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

रिना मधुकर -

मला खूप मोठा धक्का बसलाय. माझ्यासाठी ते मोठ्या भावासारखे होते. आम्ही अजिंठा चित्रपटामध्ये एकत्र काम केलं..त्यानंतर इतके वर्ष आमचे घरगुती संबंध होते. कुठठंही प्रोजेक्ट असलं तर ते मला नक्की लक्षात ठेवायचे. आम्ही आता एक महाराणा नावाचा हिंदी प्रोजेक्ट करीत होतो. तेव्हा त्यांचा मला फ़ोन आला की रिना यात एक भूमिका तू करतेस म्हणून. मला खरंच काय बोलावं समजत नाहीये.

मी आता फेब्रुवारीमध्ये त्यांच्या मुलीच्या लग्नात त्यांना भेटली होती. ते खूप स्ट्राँग होते. नेहमी हसत राहणारे, कितीही प्रॉब्लेम असली तरीही त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन असं कधीच दिसलं नाही. ते असं काही तरी करतील असं कधीच वाटलं नव्हतं.

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

विवेक अग्निहोत्री -

माझे जिवलग मित्र नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी ऐकून प्रचंड दुःख झाले. एक दिग्गज कलादिग्दर्शक, एक उत्तम दूरदृष्टी असणारा माणूस ज्याने एन. डी. स्टुडिओ बनवला. आम्ही एकत्र काम करत नसणाऱ्या चित्रपटांसाठीही त्यांनी मला कायमच मार्गदर्शन केले आहे. नितीन असं का केलंस, का?

रितेश देशमुख -

एक दिग्गज प्रॉडक्शन डिझायनर ज्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाढीमध्ये मोठे योगदान दिले आहे, त्यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप धक्का बसला. मी त्यांना वर्षानुवर्षे ओळखत होतो. अत्यंत मृदुभाषी, नम्र स्वभाव, महत्त्वाकांक्षी आणि दूरदृष्टी असणारा माणूस... माझ्या मित्रा तुझी आठवण येईल. ओम शांती

सिद्धार्थ बसू -

माझा मित्र आणि कलात्मक सहयोगी नितीन देसाई यांच्या निधनाबद्दल ऐकून धक्का बसला आणि दु:ख झाले. केबीसी, कमजोर कडी, हार्टबीट, ब्लफमास्टर, दस का दम, सच का सामना.. अशा आमच्या अनेक शोचे त्यांनी सेट बनवले. ओम शांती

परिणीती चोप्रा -

नितीन सरांबद्दल ऐकून मन हेलावलं. नितीन देसाई यांचे अतुलनीय कार्य, शहाणपण आणि कलात्मकता कायम स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

सुबोध भावे -

प्रिय नितीन, तुझ्याबद्दल अभिमान आणि प्रेम नेहमीच होतं आणि कायम राहील. पण तू इतकी टोकाची भूमिका का घेतलीस हा प्रश्न नेहमी छळत राहील. ज्या तणावातून तू जात असशील असा तणाव कुणाच्याही आयुष्यात न येवो. भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा. कलाक्षेत्रातील तुझी जागा कुणीच भरून काढू शकत नाही. ओम शांती.

मनोज मुंतशीर -

नितीन देसाई यांच्या अकाली निधनाने मला धक्का बसला आहे. चित्रपटसृष्टीला दुसरा नितीन देसाई पुन्हा मिळणार नाही! ओम शांति

हेमा मालिनी -

कला दिग्दर्शक नितीन देसाई राहिले नाहीत ही बातमी ऐकून धक्का बसला. अनेक प्रोजेक्टस् आणि नृत्यनाट्यांसाठी आम्ही एकत्र काम केले होते. खूप प्रेमळ माणूस, त्यांचे जाणे हे चित्रपटसृष्टीचे खूप मोठे नुकसान आहे. ते जिथे असतील तिथे त्यांना शांती मिळो.

संजय दत्त -

नितीन देसाई यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. एक उत्तम कला दिग्दर्शक आणि एक चांगला मित्र, भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. या कठीण काळात माझ्या सद्‌भावना त्यांच्या कुटुंब आणि मित्रांसोबत आहेत.

मनोज जोशी -

माझा मित्र आणि अत्यंत आदरणीय कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आकस्मिक निधनाने खूप धक्का बसला आहे. मनोरंजनाच्या जगतात त्यांच्या उदयाने अनेकांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या कुटुंबियांचे आणि प्रियजनांचे मी मनःपूर्वक सांत्वन करतो. ओम शांति

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT