नवी मुंबई : सध्या खऱ्याखुऱ्या फुलांच्या दागिन्यांबरोबरच कृत्रिम फुलांच्या दागिन्यांना पसंती दिली जात आहे. बाहुबली चित्रपटापासून तर या दागिन्यांनी कमालीची लोकप्रियता गाठली आहे. कृत्रिम फुले तसेच मोती, मौल्यवान खडे, दोरा यांनी सजवलेले हे दागिने विशेष करून डोहाळेजेवण (बेबी शॉवर) व हळदी समारंभासाठी आवर्जून वापरले जातात. आता तर खास वधूसाठीच्या खास कृत्रिम फुलांचे दागिने असाही नावलौकिक या दागिन्यांमुळे मिळू लागला आहे. सध्या जिप्सीपासून बनवलेल्या आभूषणांना अधिक मागणी असून, त्याचे दर हे बनावटीनुसार आकारले जात आहेत. तसेच दाक्षिणात्य बनावटीच्या ताज्या फुलांच्या आभूषणांनाही मागणी वाढली आहे.
वेगवेगळ्या रंगांची, सुगंधांची, आकाराची ताजी पाने-फुले वापरून दागिन्यांच्या असंख्य रचना सध्या तयार केल्या जात आहेत. यात मुख्यत्वे माथापट्टी, हातफूल, कमरपट्टा, बाजूबंद, राणीहार, चोकर हार, पायल या भारतीय, पारंपरिक दागिन्यांचा समावेश असतो. आता यात विविधता म्हणून बांगडी (ब्रेसलेट्स), मुकुट (टीआरा), केसांच्या सामानाची भर पडली आहे. एरवी फुलांचा राजा गुलाब, निशिगंधा, चमेली ही फुले असलेल्या दागिन्यांना पहिली पसंती आहेच; मात्र त्याचबरोबर जिप्सी, ऑर्चिड, कॉर्नेशन, ट्युलिप्स ही विविध फुले वापरूनही नवनवीन रचना तयार केल्या जात आहेत. ताज्या फुलांसाठी अडीच ते सहा हजार रुपये मोजावे लागतात. यामध्ये नववधू व डोहाळे जेवणासाठी लागणारा पूर्ण सेट दिला जातो. तसेच ताज्या फुलांच्या दागिन्यांसोबत धातू वापरून आकर्षित अशी आभूषणेदेखील बनवली जातात; मात्र त्याचे दर जास्त असतात. याशिवाय लग्नसोहळ्यात केसांच्या रचनेनुसार ब्रोज, दाक्षिणात्य पद्धतीचे गजरे, फुलांचा पट्टा, फुलांची वेणी यांनादेखील मागणी वाढली असून, त्यांचे दर हे ४०० पासून दोन हजारांपर्यंत असल्याचे फ्लोरल आर्टिस्ट अपर्णा पाटील यांनी सांगितले.
वजनाने हलके, सहज उपलब्ध होणारे
कृत्रिम फुलांपासून बनवलेले दागिने सध्या मोठ्या प्रमाणात
घातले जात आहेत. याचे कारण म्हणजे हे वजनाने कमी असतात.
ते कुठेही सहज घेऊन जाता येतात. या दागिन्यांचा सेट सहज उपलब्ध होतो. यासाठी दोन ते साडेतीन हजार मोजावे लागतात. याशिवाय आकर्षक मोती, खडे, लटकन यांच्यामुळे कृत्रिम फुलांच्या दागिन्यांना आणखीनच वेगळा लूक मिळतो. तसेच आकर्षक रंगसंगतीतही हे दागिने उपलब्ध होतात.
डोहाळे जेवण, हळदी समारंभासाठी विशेष वापर
हळदी समारंभासाठी गुलाबाची कृत्रिम फुले, मोत्याची गुंफण
असलेले दागिने अधिक खुलतात. पारंपरिक व नवीन दागिने या प्रकारात सहज उपलब्ध झाले आहेत. लाल, गुलाबी, निळा-हिरवा असे त्याच त्या रंगातील दागिने न घालता, पेस्टल रंगातील फुलांचे दागिनेही वेगळा लूक मिळवून देतात. सिंपल-सोबर लूकसाठी कानात झुमके व लालबुंद फुलांचे हातफूल पुरेसे ठरतात. बेबी पिंक रंगातील फुलांचे दागिने, सातलडी हार, वेगळ्या रंगातील हातफूल, फुलांची वेणी हे प्रकार नववधूला नक्कीच काही तरी वेगळे केल्याचे समाधान मिळवून देतात.
सध्या जिप्सीपासून बनवलेल्या आभूषणांना मागणी जास्त आहे. तसेच ताज्या फुलांपासून विविध आभूषणे बनवली जात असून, त्यांचाही खप वाढला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक आभूषण बनवताना त्याच्या रचनेनुसार दर आकारले जातात. कृत्रिम फुलांचे आभूषणदेखील अधिक विकले जातात. हळदी समारंभ व डोहाळे जेवणासाठी फुलांचे दागिने घालण्यास पसंती वाढली आहे.
- अपर्णा पाटील, फ्लोरल आर्टिस्ट, तुर्भे गाव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.