ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत आज पांचपाखाडी येथील तुळजाभवानी मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी मला माझा राम चराचरात, जनसेवेत आणि माझ्या कामात दिसतो, असे प्रतिपादन केले. दरम्यान, राष्ट्रवादीने आज शहरातील विविध मंदिरांमध्ये सुमारे दीड ते दोन लाख लाडूंचे वाटप केले.
अयोध्येत श्री रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात असल्याने ठाण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अनेक मंदिरात लाडू वाटप करण्यात आले. तसेच, मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला कळवा पूर्वेत भागात रामलल्लाची मिरवणूकही काढण्यात आली होती. आज दुपारी बारा वाजता पांचपाखाडी येथील तुळजाभवानी मंदिरात आरती करण्यात आली.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आज प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे, याबद्दल तमाम भारतीयांच्या मनात आनंद दाटून आला आहे. हा राम कुण्या एकाचा नाही तर हा राम भारत भूमीवर जन्माला आलेल्या प्रत्येकाचा आहे. त्यामुळेच आमच्या रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्यानेच आज आम्ही महाआरतीचे आयोजन केले होते. तसेच कळव्यात सुमारे 50 हजार झेंडे आणि एक लाख लाडूंचेही वाटप विविध मंदिरांमध्ये केले.
निमंत्रणाबाबत विचारले असता, निमंत्रण देणे हा कुणाचाच अधिकार नाही. तुळजाभवानी मंदिरात आयोजित महाआरतीचे निमंत्रण दिलेय का? देव हा सगळ्यांचाच आहे. त्यामुळे देवाच्या चरणी लीन होण्यासाठी निमंत्रण कशाला? देवाची मालकी सांगण्याचा जो प्रकार सुरू झालाय तो मनाला खटकण्यासारखा आहे. तरीही आपण या ठिकाणी सांगतो की आपणाला आपला राम कामात दिसतो; मला तो तुळजाभवानी मंदिरात दिसतो, असेही डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.
महर्षी वाल्मिकींमुळेच रामाची ओळख - डाॅ. आव्हाड
डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी रामायण रचिते महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या खारटन रोडवर येथील मंदिरात वंदन केले. एकीकडे अनेक नेतेमंडळी मोठमोठ्या मंदिरात जात असताना आपण वाल्मिकी मंदिरात वंदन करण्यासाठी आलात, असे विचारले असता डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, जेव्हा आपण रामाला वंदन करतो तेव्हा आपण महर्षी वाल्मिकी ॠषींना विसरूच शकत नाही. कारण, प्रभू रामाची ओळखच आपणाला महर्षी वाल्मिकी यांनी करून दिली आहे.
सर्व समाज बांधवांना एक करणारे, आदिवासी शबरीची उष्टी बोरे खाणारे, रावणाचा वध करून विभीषणाला सिंहासन देणारे, बालीचा वध करून सुग्रीवाला गादीवर बसवणारे प्रभू रामचंद्र आहेत. सर्वांना एकसंघ करणारे रामराज्य यावे, अशी आमची इच्छा आहे. तसे रामराज्य आणण्यासाठी सर्व समाजघटकांना एक करीत आहोत. प्रभू राम हे कोण्या एकाचे नाहीत. ते सर्वांचे आहेत, असे डाॅ. आव्हाड म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.