Bahujan Vikas Aghadi esakal
मुंबई

येत्या 15 दिवसांत महावितरणने 'या' समस्या सोडवल्या नाहीत, तर उग्र आंदोलन करणार; 'बविआ'चा स्पष्ट इशारा

सकाळ डिजिटल टीम

'येत्या 15 दिवसांत महावितरणने या समस्या सोडवल्या नाहीत. तर बहुजन विकास आघाडीच्या वतीने हजारो वीज ग्राहकांच्या उपस्थितीत उग्र आंदोलन करण्यात येईल.'

विरार : ‘काही ब्लॅकमेलर्स, माहिती अधिकार कार्यकर्ते महावितरणच्या अधिकाऱ्यांना नियम शिकवतात. त्यांच्या दबावाला बळी पडून किंवा त्यांच्या सहाय्यानेच नंतर तेच नियम दाखवत महावितरणचे अधिकारी अधिकृत इमारत धारक व सामान्य नागरिकांना त्रास देतात. निवडणुकांच्या तोंडावर असे प्रकार जाणीवपूर्वक करून जनसामान्यांना वेठीस धरले जाते,` असा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीचे (Bahujan Vikas Aghadi) संघटक सचिव अजीव पाटील यांनी करून विरार पूर्व परिसरातील वीज समस्यांवर महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

मागील आठ दिवसांपासून विरार पूर्व परिसरातील वीज सातत्याने खंडित होत आहे. परिणामी, या परिसरातील 40 हजारहून अधिक वीज ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संघटक सचिव अजीव पाटील व माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्या नेतृत्त्वात बहुजन विकास आघाडीच्या वतीने हजारो वीज ग्राहकांच्या उपस्थितीत विरार पूर्व महावितरण कार्यालयासमोर आज (8 जून) उग्र आंदोलन करण्यात येणार होते.

याबाबतची पूर्वकल्पना निवेदनाद्वारे महावितरण (Mahavitaran) व पोलीस प्रशासनाला देण्यात आलेली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीनिमित्ताने कायम असलेल्या आचारसंहितेचे कारण देत पोलीस प्रशासनाने अशा पद्धतीचे आंदोलन न करण्याची विनंती माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांना पत्राद्वारे केली होती. या विनंतीला मान देत अखेर संघटक सचिव अजीव पाटील यांच्या नेतृत्त्वात बविआच्या निवडक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विरार पूर्व उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मुकुंद देशमुख व अन्य अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

विरार पूर्व विभागात महावितरणचा ढिसाळ कारभार सुरू आहे. भरउन्हाळ्यात वेळी-अवेळी व सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. चुकीच्या पद्धतीने रीडिंग घेतली जात असल्याने ग्राहकांना अवाजवी बिले येत आहेत. ही बिले भरण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. वीजबिले न भरल्यास त्यांना पूर्वकल्पना न देताच ग्राहकांचे वीज मीटर कापले जात आहेत. शहरात हजारो फॉल्टी मीटर आहेत; ते अद्याप बदलण्यात आलेले नाहीत.

लोंबकळत असलेल्या वीजतारा बदलण्यात याव्यात, त्या ठिकाणी बंच कंडक्टर बसविण्यात यावेत, जुन्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविण्यात यावी, आवश्यक ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावेत, तसेच विरार-मनवेलपाडा येथील सब-स्टेशनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशा एक ना अनेक समस्यांचा पाढा महावितरणसमोर वाचून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी बहुजन विकास आघाडीच्या शिष्टमंडळाकडून या वेळी करण्यात आली.

तत्पूर्वी महावितरणचे अधिकारी काही ब्लॅकमेलर्स, माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या दबावाला बळी पडून अधिकृत इमारतधारक आणि त्यातील वीज ग्राहकांना नाहक त्रास देत असल्याचा पुनरुच्चार अजीव पाटील यांनी केला. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी हे प्रकार थांबवावेत. आणि सामान्य वीज ग्राहकांना होणारा त्रास थांबविण्यासाठी; त्यांना सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सज्जड दम महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला.

येत्या 15 दिवसांत महावितरणने या समस्या सोडवल्या नाहीत. तर बहुजन विकास आघाडीच्या वतीने हजारो वीज ग्राहकांच्या उपस्थितीत उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सरतेशेवटी संघटक सचिव अजीव पाटील यांनी दिला. विशेष म्हणजे माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्या नेतृत्वात याच समस्यांच्या अनुषंगाने 15 डिसेंबर 2023 रोजी महावितरणच्या वसई कार्यालयातील अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आलेले होते.

दरम्यान, अशा पद्धतीने महावितरणचे अधिकारी कुणाच्याही बळी पडणार नाहीत, अशी हमी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मुकुंद देशमुख यांनी बविआच्या शिष्टमंडळाला या प्रसंगी दिली. वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा देण्याकरता महावितरणच्या माध्यमातून अनेक योजना व कामे हाती घेण्यात आलेली आहेत. त्याच कामांसाठी काही वेळा वीजपुरवठा खंडित राहतो. तर काही वेळा वाढत्या वीज मागणीमुळे वीजपुरवठ्यावर ताण येत असल्याने वीजपुरवठा खंडित होतो, अशी खंत महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मुकुंद देशमुख यांनी या प्रसंगी व्यक्त केली. हे प्रकल्प व योजना पूर्ण झाल्यानंतर पुढील 20 वर्षांत वीज समस्यांबाबत अडचणी येणार नाहीत, असा विश्वास त्यांनी या वेळी शिष्टमंडळाला दिला. दरम्यान; आवश्यक गरजांकरता वीज ग्राहक व राजकीय पक्षांकडून मदतीची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

बहुजन विकास आघाडीच्या या शिष्टमंडळात माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत, माजी महिला व बालकल्याण सभापती माया चौधरी, माजी नगरसेविका चिरायू चौधरी, माजी नगरसेवक विलास चोरघे, बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते अतुल पाटील, जहीर शेख, किशोर भेरे, शिगवण, प्रणय चौधरी, प्रशांत लाड व कार्यकर्ते आणि महिला मंडळ यांचा सहभाग होता. तर महावितरणकडून बिलिंग इन्चार्ज संजय तिडके, सहाय्यक अभियंता शिंदे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वात लवकरच बैठक

सामान्य वीज ग्राहकांना येणाऱ्या अडीअडचणी, त्यांना जाणवणाऱ्या समस्या आणि त्या सोडविण्याच्या दृष्टीने लवकरच बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटक सचिव अजीव पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे विरार पश्चिमेकडील वीज वाहिन्यांची कामे करण्यासंदर्भात महावितरणला कळविण्यात आलेले आहे. परंतु पावसाळा असल्याने रस्ते खोदण्यास मनाई आहे. त्यामुळे ही कामे लांबणीवर पडल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. परंतु पावसाळा संपताच ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याकरता बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येणार आहे, अशी माहितीही अजीव पाटील यांनी या प्रसंगी दिली.

महावितरणला आवश्यक ते सहकार्य केले जाईल : अजीव पाटील

शहराची वाढती वीज मागणी लक्षात घेता ट्रान्सफॉर्मर व सब स्टेशन वाढविण्याची अपेक्षा महावितरणने व्यक्त केली आहे. मात्र त्यासाठी जागा मिळविण्यात अडचणी येत असल्याची खंत महावितरणच्या विरार पूर्व उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मुकुंद देशमुख आणि अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यावर; यासाठीच्या जागा मिळवून देण्यात अथवा अन्य अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून केले जाईल, असे आश्वासन संघटक सचिव अजीव पाटील यांनी महावितरणला दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT