Mumbai Crime News: भारतात घुसखोरी केल्याबद्दल खटला सुरू असलेले बांगलादेशी घुसखोर नव्या नावाने पुन्हा मुंबईत स्थायिक झाले, त्यांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केले आणि रिक्षा चालक, इलेक्ट्रिशिअन, भाजीवाला म्हणून मुंबईकरांच्या घरादारात त्यांचा सहजपणे वावरही सुरू आहे, अशी धक्कादायक माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या(एटीएस) तपासातून पुढे आली.
एटीएसच्या जुहू कक्षाने खात्रीशीर माहितीआधारे एका बांगलादेशी घुसखराला ताब्यात घेतले. या व्यक्तीला काही महिन्यांपूर्वीच घुसखोरीबद्दल मुंबईत अटक झाली होती, त्याच्या विरोधात खटला सुरू आहे, अशी माहिती पुढे आली.
खटल्याचे कामकाज पूर्ण झाले, घुसखोरी शाबीत झाल्यानंतरच संबंधित घुसखोराला त्याच्या देशात धाडले जाते. मात्र खटल्याचे कामकाज पूर्ण होईपर्यंत बराच काळ लोटतो. त्या दरम्यान घुसखोर जामीन मिळवतात. बनावट कागदपत्रांआधारे भारताच्या कोणत्याही राज्यातील अधिवासाचे पुरावे तयार करतात, त्याआधारे पारपत्र मिळवतात आणि पुन्हा मुंबईसारख्या महानगरात पाय रोवतात, ही कार्यपद्धती या कारवाईच्या निमित्ताने एटीएस पथकाला समजली.
घुसखोरीबद्दल खटला सुरू असलेल्या मात्र मुंबईत पुन्हा स्थायिक झालेल्या सुमारे १० ते १२ जणांची नावे एटीएस अधिकाऱ्यांना मिळाली. त्यापैकी रियाझ शेख, सुलतान शेख, इब्राहिम शेख आणि फारुख शेख या चार घुसखोरांना अटक करण्यात आली. तर अन्य घुसखोरांची शोधाशोध सुरू आहे, असे एटीएसकडून सांगण्यात आले.
यापैकी रियाझ अंधेरी लोखंडवाला भागात वास्तव्यास असून परिसरात इलेक्ट्रिशिअन म्हणून परिचित आहे. सुलतान मालवणी येथे राहतो आणि रिक्षा चालवतो. तर इब्राहिम माहुल गाव येथे भाजी विक्रेता आहे. या चौघांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याची माहिती पुढे येत आहे.
आशिया खंडातील अन्य देशांच्या मानाने भारतीय कुशल - अकुशल मजुरांना परदेशात अधिक पसंती आहे. हे लक्षात घेत बांगलादेशी घुसखोर भारताचे पारपत्र मिळविण्यासाठी धडपड करतात. या कारवाईत नावे समोर आलेल्यांपैकी बहुतांश घुसखोर भारतीय पारपत्रावर परदेशात नोकरीनिमित्त गेल्याची माहिती एटीएसला मिळाली.
भविष्यात बनावट पारपत्राआधारे परदेशात गेलेल्या बांगलादेशी घुसखोराने दहशतवादी कृत्य घडवल्यास किंवा अशा कृतीत सहभाग घेतल्यास जबाबदारी भारतावर येऊ शकेल, अशी चिंता एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ' सकाळ ' कडे व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.