मुंबई : माझ्या ओटीपोटात द्रव जमा होत आहे, डॉक्टरांनी (doctor) दाखल होण्यास सांगितले. रविवारी मला प्रवेश मिळाला; पण तरीही बेड मिळाला नाही. मी जमिनीवर पलंगाखाली झोपून उपचार घेत आहे. बाहेर पडणे खूप गैरसोयीचे आहे; पण पर्याय नाही, असे नायर रुग्णालयात (Nair hospital) दाखल असलेले बोरिवलीचे रहिवासी रमेश रवानी (४७) म्हणाले. पालिका रुग्णालयातील (bmc hospital) औषधांच्या तुटवड्याचा (Medicine shortage) प्रश्न अद्याप सुटला नसताना नायरसारख्या आणखी एका मोठ्या रुग्णालयात खाटांच्या तुटवड्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
येथील औषध विभागाच्या (मेडिसिन) वॉर्डमध्ये रुग्णांना जमिनीवर गाद्या घालून दिल्या जात असून त्यावर उपचार केले जात असल्याची परिस्थिती आहे. ही समस्या नवीन नसली, तरी रुग्णालय प्रशासन यावर अजूनही ठोस पावले उचलत नसल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.
सद्यस्थितीत नायर रुग्णालयात रुग्णांसाठी खाटा उपलब्ध होत नसून रुग्णांना खाटांच्या खाली गाद्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत. कोविडनंतर पुन्हा एकदा पालिका रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढल्यामुळे या परिस्थितीला सामोरे जातानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
नायर रुग्णालयाच्या सातव्या आणि सहाव्या मजल्यावर असलेला औषध विभागाचा वॉर्ड रुग्णांनी खचाखच भरला होता. येथे रुग्णांना पोटदुखी, उलट्या, ताप आदी उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. गोवंडी शिवाजीनगर येथील मोहम्मद अल्ताफ यांना पोटदुखी, उलट्या होत असल्याच्या तक्रारीमुळे ओपीडीमधून वॉर्ड एच २२ मध्ये दाखल करण्यासाठी पाठवण्यात आले होते. अल्ताफने सांगितले की, तो सकाळपासून येथे आला आहे. खाटेअभावी त्यांच्यावर व्हीलचेअरवर उपचार सुरू आहेत. रे रोड येथील नसीम शाह या किडनीग्रस्त रुग्णाला या वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. खाटेच्या कमतरतेमुळे त्यांना जमिनीवर गादी देऊन झोपायला लावले आहे. असे अनेक रुग्ण सध्या याच परिस्थितीत उपचार घेत आहेत.
फोटो व्हायरल
आप या पक्षातर्फे नायर रुग्णालयाची सद्यस्थिती फोटोतून व्हायरल करण्यात आली आहे. या फोटोत एका वॉर्डात अनेक खाटा दिसत असून त्या प्रत्येक खाटेखाली आणखी एका रुग्णासाठी गादीची सोय केली गेली आहे. शिवाय खाटेवर रुग्ण उपचार घेत असून गादीवरही रुग्ण झोपलेले दिसतात.
उपचार देण्यास प्राधान्य
नायर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कल्पना मेहता यांनी औषध विभागाच्या वॉर्डमध्ये खाटांची कमतरता असल्याची कबुली दिली आहे. रुग्णालय प्रशासनाने उपचार देण्यावर भर दिला आहे. रुग्णांना उपचार देणे हे आमचे पहिले कर्तव्य आहे. येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दाखल करून उपचार देण्यास आमचे प्राधान्य असल्याकारणाने येणाऱ्याला परत पाठवू शकत नाही, असे स्पष्ट मत नायर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कल्पना मेहता यांनी व्यक्त केले.
डॉक्टर काय म्हणतात ?
या वॉर्डातील एका डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, ही समस्या आताची नाही. हा वॉर्ड नेहमीच रुग्णांनी भरलेला असतो. रुग्णांना गरजेनुसार खाटा दिल्या जातात. रुग्णांना डिस्चार्ज मिळताच किंवा त्यांच्या समस्या पाहून संबंधित वॉर्डात स्थानांतरित होताच त्यांना बेड उपलब्ध करून दिले जातात.
खाटा वाढवण्याचा प्रयत्न
पालिकेच्या प्रमुख रुग्णालयाच्या संचालिका डॉ. नीलम आंद्राडे यांनी सांगितले की, पूर्वीप्रमाणेच आजही रुग्ण रुग्णालयात येत आहेत. आम्ही पालिका रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना परत पाठवू शकत नाही. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यावर उपचार करणे हे आमचे ध्येय आहे. सध्या नायरमध्ये १६२३ खाटा आहेत. ही क्षमता वाढवून १८०० करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.