मुंबई : भारतीय दिग्गज उद्योजक रतन टाटा यांच्या निधानानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. रतन टाटा यांचं माणूस म्हणून मोठेपण आणि व्यक्तीमत्व अफाट होतं, त्यामुळं त्यांच्या हयातीतच त्यांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवायला हवं होतं पण आता त्यांना मरणोत्तर का होईना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी सविस्तर पत्रच लिहिलं आहे.
राज ठाकरे पत्रात म्हणतात, "ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या ३ दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात, आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती.
पण भारतीय उद्योगजगाला, भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून जे त्यांचं मोठेपण आहे, ते अफाट होतं. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच 'भारतरत्न'सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवी अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे, तसंच तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही! Raj Thackeray latest news about Ratan Tata
काल रतन टाटांच्या निधनाची बातमी बाहेर आल्यावर अनेक ठिकाणचे कार्यक्रम लोकांनी स्वतःहून थांबवून श्रद्धांजली वाहिली, मुंबईत तर काही ठिकाणी दांडिया देखील अर्ध्यावर थांबवून लोक २ मिनिटं स्तब्ध उभे राहिले! आज सकाळपासून सोशल मीडियावर तमाम भारतीय उस्फुर्तपणे श्रद्धांजली वाहत आहेत आणि प्रत्येकाच्या मनातील भाव असा आहे की, आपल्या अगदी घरातील कोणीतरी व्यक्ती गेली आहे. अशा व्यक्ती ह्या 'भारतरत्न'च नाहीत तर मग अजून काय? त्यामुळे याबाबतीत तुम्ही संबंधितांना निर्देश देऊन यावर काही निर्णय घ्याल याची मला खात्री आहे.
तसंच भारत हा रत्नांची खाण आहे. पण या रत्नांचा सन्मान कुठल्याही नागरी सन्मानाने करताना तो त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर व्हावा. मुळात कोणाला मरणोत्तर सन्मान घोषित करायची वेळच येऊ नये. त्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती हयात असताना आणि शारीरिक दृष्ट्या उत्तम अवस्थेत असताना झालेला कधीही चांगला. आपण अनेकदा बघतो की एखाद्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना होतो, हे योग्य नाही. या विषयी काही निश्चित धोरण आपण आखाल याची मला खात्री आहे.
- राज ठाकरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.