मुंबई: कोविडची दुसरी लाट भारतात मे महिन्यांच्या मध्यवर्ती कहर करणार असल्याचे भाकित वर्तवले जात आहे. त्याचबरोबर ही लाट ओसरल्यानंतर तिसरी लाटही येण्याची शक्यता आहे. त्यासाठी महानगर पालिकेनं आतापासूनच तयारी सुरु केली आहे. मुंबईतच ऑक्सिजनची निर्मिती करण्याचे 16 प्रकल्प उभारले जाणार असून त्यासाठी निविदाही प्रसिद्ध करण्यात आला असून प्रकल्पांचा अंदाजित खर्च 90 कोटी रुपयांपर्यंत आहे.
हे प्रकल्प सुरु झाल्यानंतर रोज 43 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण केला जाणार असून सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाल्यानंतर महिन्याभरात हे प्रकल्प सुरु होणार आहेत. कोविडच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या वेगाने वाढू लागली आहे.
मुंबईत सध्या कोविड बाधितांसाठी 235 मेट्रिक टन वैद्यकिय ऑक्सिजनची गरज भासत आहे. तर मे महिन्यात मध्यापर्यंत संपूर्ण भारतात कोविडची दुसरी लाट कहर करणार असल्याचा अंदाज कानपूर आयआयटीच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मुंबईतील कोविडची दुसरी लाट आता स्थिरावू लागली असली तरी तिसरी लाट या लाटेपेक्षा भीषण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच तयारी सुरु केली आहे.
पालिकेनं कस्तूरबा रुग्णालय आणि जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयात पहिल्या लाटेच्या वेळेसच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले आहे. त्यामुळे आता 12 रुग्णालयात 16 प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदाही जाहीर करण्यात आल्या असून त्यातून रोज 43 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण केला जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी दिली. रुग्णालय कोविड केंद्रात कायमस्वरुपी प्रकल्प राहाणार आहेत. त्याच बरोबर सिलेंडर सांभाळणे, ते भरणे ही दगदग कमी होणार असून यंत्रणेवरील ताणही कमी होईल असेही पी.वेलरासू यांनी सांगितले.
15 वर्ष चालणार, खर्चही कमी
हे प्रकल्प एकदा उभारल्यावर 15 ते 30 वर्ष चालणार आहे. त्याच बरोबर या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या ऑक्सिजनचा दर द्रव प्राणवायू एवढाच आहे. जंम्बो सिलेंडरशी तुलना केल्यास त्याच्या निम्म्या पेक्षा कमी खर्च येतो, असा दावाही पालिकेनं केला आहे. कस्तुरबा रुग्णालयात रोज 500 घनमीटर आणि जोगेश्वरी ट्रॉमा केअरमध्ये 1 हजार 740घनमीटर क्षमतेचे प्रकल्प सध्या सुरु आहेत.
असा तयार केला जातो ऑक्सिजन
वातावरणातील हवा शोषून हवा संकलित केली जाते.
ही हवा शुद्ध करुन हवेतील तरंगते घटक, तेल, इंधन अतिसुक्ष्म कण अयोग्य घटक वेगळे केले जातात.
शुद्ध झालेली हवा 'ऑक्सिजन जनरेटर'मध्ये संकलित केली जाते.
जनरेटरमध्ये झिओलीट या रसायनाच्या मिश्रणातून हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे केले जातात.
वेगळा झालेला शुध्द ऑक्सिजन टाक्यांमध्ये साठवला जातो.
------------------
(संपादन- पूजा विचारे)
bmc will set up 16 oxygen generation plants at 12 municipal hospitals
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.