किन्हवली : किन्हवली येथील विद्या प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलातील शिक्षकाची रोखण्यात आलेली वेतनवाढ पूर्ववत करण्यासाठी संचालक तथा सहसचिवाने वारंवार रक्कमेची मागणी केली होती, ती काल(दि. 14) सायंकाळी विद्यालयाच्या बाहेर स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी संचालकाला रंगेहात पकडले.
महाराष्ट्र विधीमंडळ पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार अरविंदआप्पा भानुशाली अध्यक्ष असलेल्या किन्हवलीतील विद्या प्रसारक मंडळाचा संचालक तथा सहसचिव चंद्रकांत हरिभाऊ धानके याने याच संस्थेच्या सोगाव विभाग माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षकाकडून(शिक्षक नाव :- अनंता दत्तात्रय विशे) त्याच्या दोन वर्षांच्या वेतनवाढी पूर्ववत करून थकीत रक्कम काढण्यासाठी लाच मागितली होती.
त्यासाठी एक लाख दहा हजारांची रक्कम ठरवण्यात आली होती. याबाबत संबंधित शिक्षकाने दि. 09 ऑक्टोबर रोजी ऍन्टी करप्शन ब्यूरो, ठाणे परिक्षेत्र यांचेकडे केलेल्या तक्रारीनुसार पडताळणी करून काल (दि. 14) सायंकाळी किन्हवली येथील शहा चंदुलाल सरुपचंद विद्यालया समोरच असलेल्या बसस्थानकाजवळ तक्रारदार यांच्या वाहनात बसून संस्थेचा सहसचिव धानके याने ठरलेल्या लाचेची रक्कम रुपये एक लाख दहा हजार स्विकारली.
याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी धानके यास रंगेहात पकडून अटक केली.संबंधित शिक्षकाकडून यापूर्वीही काही रक्कम व काही वस्तूरुपातील मदत विद्या प्रसारक मंडळाने घेतली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
सध्या ठाणे परिक्षेत्राचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे मुंबई एसीबीचे अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण, ठाणे एसीबीचे अपर पोलीस अधिक्षक गजानन राठोड, महेश तरडे, पोलीस उप अधिक्षक धर्मराज सोनके यांनी सदरची कारवाई केली असून या प्रकरणी रात्री उशिरा राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रार करण्यात आल्याने आणखी काही लोकांवर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.